Sat, Dec 07, 2019 12:10होमपेज › Kolhapur › भाजप सरकारच्या पापात शिवसेना पन्नास टक्के वाटेकरी : जयंत पाटील

..तर आ. सतेज पाटील यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात

Published On: Mar 24 2019 4:46PM | Last Updated: Mar 24 2019 5:47PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

काँग्रेस व राष्ट्रवादीत स्थानिक संदर्भानुसार मतभेद जरुर आहेत. चुकाही झाल्या आहेत. पण आता समज-गैरसमज विसरुन शेतकरी, कामगार व गरिबांना उद्ध्वस्त करणारे भाजप आघाडीचे सरकार दिल्लीतून घालवायचे आहे. यासाठी शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना मानणा-या कॉंग्रेस-राष्ट्रवादी मित्रपक्षांच्या उमेदवारांना निवडूण आणूया, असा निर्धार रविवारी कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या संयुक्त बैठकीत सर्व नेत्यांकडून करण्यात आला. 

देशाची राज्यघटना न मानणा-या भाजप सरकारने पाच वर्षात फक्त थापा मारल्या आहेत. शेतक-यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करुन त्यांची चेष्टा केली आहे. पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले तर चातुर्वर्ण्य व्यवस्थेकडे देशाची वाटचाल होणार असल्याचा इशारा यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. संयुक्त बैठकीस कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, आमदार हसन मुश्रीफ, विद्यमान खासादार धनंजय महाडिक, महापौर सरिता मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची घोषणा झाल्याणनंतर आजची संयुक्त बैठक म्हणजे प्रचाराची सुरवातच आहे. मी कॉंग्रेसचे नेत आणि कार्यकर्त्यांशी चर्चा केली. सर्वांना विनंती करण्यासाठी कॉंग्रेस कमिटीत आलो आहे. आता गेल्या पाच वर्षातील समज, गैरसमज संपवूया. बहुजन समाजाच्या हितासाठी आघाडीच्या उमेदवारांना निवडूण आणण्यासाठी सर्वांनीच ताकदीने  कामाला लागावे.

याउपर काही शंका-कुशंका असतील तर खासादर महाडिक व आमदार मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन त्यांना पूर्णविराम देण्यासाठी प्रयत्न करावा. भाजप सरकारच्या पापात शिवसेना पन्नास टक्के वाटेकरी आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांनी पाच वर्षे भाजपला भीती दाखवण्याचे नाटक केले. शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे हे शेतक-यांच्या कर्जमाफीला महाघोटाळा म्हटले आहेत. शिवसेनेने कोल्हापूर हिताचे काहीही केलेले दिसत नाही. त्यामुळे शिवसेनेला मतदार नाकारतील. 

..तर आ. सतेज पाटील यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात

मी आ. सतेज पाटील यांच्याशी बोललो आहे. त्यांनी प्रचारात सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्यांनी स्थानिक प्रश्‍न माझ्यासमोर मांडले. पुन्हा त्यांना भेटून आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करावा हे सांगणार आहे. व्यक्तीपेक्षा राजकारणात विचार महत्वाचे आहेत, हे त्यांनी समजून घ्यावे. त्यांचा भविष्यकाळ उज्वल आहे. त्यामुळे स्थानिक मतभेदात त्यांनी अडकून पडू नये. अन्यथा त्यांना भविष्यात अडचणी येऊ शकतात, असा स्पष्ट इशारा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर दिला.    

महाडिक कर्तबगार, बोलणारे खासदार : पाटील

महाडिक हे कर्तबगार आहेत. त्यांच्यासारखा बोलणारा खासदार पून्हा लोकसभेत जाणे आवश्यक आहे. राजकारणात एक-दोन गोष्टी इकडे-तिकडे होतात. पण आता त्यावर पांघरुन घालून एकत्र राहून एकसंघपणे खा. महाडिक व खा. राजू शेट्टींचा प्रचार करुया, असे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणाले.

सुभा राखण्याच्या नादात भांडणे : जयंत पाटील

लोकसभेनंतर आगामी विधानसभेतही आघाडी कायम राहिल. कारण पाच वर्षे सत्तेबाहेर राहून कशी ससेहोलपट होते हे आता दोन्हीकडील मंडळींना समजून चुकले आहे. आपला सुभा राखण्याच्या नादात स्थानिक नेत्यांत भांडणे झाली असल्याचे प्रदेशाध्यक्ष पाटील म्हणताच आ. मुश्रीफ म्हणाले आम्ही जिल्ह्यांत  महापालिका, जिल्हा परिषदेत एकत्रच आहोत. यावर एकत्र आहात पण सर्वांनाच सोबत घेऊन पुढे चला असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी म्हणताच उपस्थितांनी या कलगीतु-याला टाळ्या वाजवून दाद दिली. 

अधिक वाचा : 

►दुखावलेली मने दोन दिवसांत दुरुस्त करू : खासदार महाडिक

►महायुतीच्या तोफा आज कोल्हापुरातून धडाडणार 

►आ. सतेज पाटील आघाडीचे ऐकत नसतील तर...