Thu, Dec 03, 2020 06:06होमपेज › Kolhapur › विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा आजपासून

कोल्हापूर : विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षा आजपासून

Last Updated: Oct 27 2020 1:19AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना व नैसर्गिक आपत्तीमुळे पुढे गेलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या शेवटच्या सत्राच्या परीक्षा अखेर मंगळवार (दि. 27) पासून सुरू होत आहेत. विद्यापीठाने ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षांची तयारी पूर्ण केली आहे. 200 हून अधिक अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठ कार्यक्षेत्रातून सुमारे 71 हजार 667 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात 47 हजार 569 विद्यार्थी ऑनलाईन व 24 हजार 98 विद्यार्थी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार आहेत. तीन सत्रांत सकाळी 11 ते 12, 1.30 ते 2.30, 4 ते 5 यावेळेत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठ कार्यक्षेत्रात 293 परीक्षा केंद्रे असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी भरारी पथक नेमण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणार्‍या परीक्षार्थींना ई-मेल व एस.एम.एस.द्वारे यापूर्वी पाठविण्यात आलेले लॉगीन व पासवर्ड पूर्ण परीक्षेसाठी तेच कायम राहणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्यांना कोणतीही तांत्रिक अडचण उद्भवल्यास शिक्षण घेत असलेल्या  अधिविभागात, महाविद्यालयात ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार आहे. 

ऑफलाईन पद्धतीने परीक्षेस बसणार्‍या विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र महाविद्यालयाच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षेवेळी मास्क, सॅनिटायझरसह सर्व शासकीय नियमांचे पालन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र मिळाले नाहीत अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा इतर शासकीय ओळखपत्र पाहून परीक्षेस बसू द्यावे,  असे महाविद्यालयांना कळविण्यात आले आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी सकाळी परीक्षा विभागाच्या आढावा बैठकीत परीक्षा संदर्भात सूचना दिल्या आहेत. परीक्षा व मूल्यमापन विभागाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी सांगितले.

...तर फेरपरीक्षा घेणार!

विद्यापीठामार्फत मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांसह महावितरण कार्यालयास परीक्षा कालावधीत सेवा सुरळीत ठेवण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत. परीक्षेवेळी नेटवर्क, वीजपुरवठा खंडित होणे, अचानक सर्व्हर डाऊन होणे, अशी अडचण उद्भवल्यास परीक्षार्थींनी गोंधळून जाऊ नये. परीक्षार्थींनी संबंधित महाविद्यालय, अधिविभाग यांच्या माध्यमातून परीक्षा विभागास कळविल्यास संबंधित विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा आयोजित करण्यात येणार आहे.