Mon, Aug 10, 2020 04:40होमपेज › Kolhapur › निखिल खाडे विरोधात १०.६५ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

निखिल खाडे विरोधात १०.६५ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा

Published On: Dec 13 2017 1:54AM | Last Updated: Dec 13 2017 1:35AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी 

येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणातील मास्टरमाईंड निखिल ऊर्फ भाऊ बाबुराव खाडे (रा. घालवाड ता. शिरोळ) याने आपण पोलिस असल्याची बतावणी करून पोलिस भरती करण्यासाठी 10 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पोलिसांत मंगळवारी दाखल झाला आहे. विनायक पांडुरंग सातवेकर (रा. मेतके, ता. कागल) याने पोलिसांत फिर्याद दिल्याची माहिती शिरोळचे स.पो.नि. समीर गायकवाड यांनी पत्रकारांना दिली 

माने आत्महत्या प्रकरणानंतर संशयित खाडे याचे कारनामे उघडकीस येत आहेत. आजअखेर त्याच्या विरुद्ध फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. मयत माने याच्या फिर्यादीवरून तपास सुरू असताना मंगळवारी फसवणूक प्रकरणाचा तिसरा गुन्हा संशयित खाडे याने केल्याचे उघडकीस आले आहे खाडे व फिर्यादी सातवेकर यांची ओळख मिरज ते कोल्हापूर रेल्वे प्रवासादरम्यान नोव्हेंबर 2016 मध्ये झाली होती. यावेळी झालेल्या चर्चेत खाडे याने आपण करवीर पोलिस ठाण्यात शिपाई असल्याचेे सांगितले. यावेळी फिर्यादी याने मी होमगार्ड भरतीसाठी प्रयत्न करीत आहे, असे सांगितले. यावर खाडे याने माझी पोलिस खात्यातील कदमसाहेब यांच्याशी ओळख आहे, मी तुम्हाला पोलिस भरती करतो. मी बर्‍याच जणांची पोलिस भरती केली असून यासाठी पैसे खर्च करावे लागतील, असे सांगितले. सातवेकरांचा मोबाईल नंबरही खाडे याने घेतला. चार दिवसांनंतर खाडे याने मोबाईलवरून फोन करून पोलिस भरतीसाठी चार जागा आहेत तुमचे तर भरतीचे काम होईल, पण आणखी कुणाचे काम करायचे असेल तर सांगा, असे सातवेकर यांना सांगितले होते.

संशयित खाडे याने विश्‍वास संपादन करून फिर्यादी सातवेकर याचे 2 लाख, साक्षीदार सिद्धराम पाटील यांचे 1 लाख 25 हजार, अवधूत चव्हाण यांच्याकडून 2 लाख 50 हजार, अमोल चव्हाण यांच्याकडून 2  लाख रुपये तसेच प्रवीण माळी याच्याकडून 2 लाख 90 हजार रुपये असे मिळून वेळोवेळी  10 लाख 65 हजार रुपये घेऊन संशयित आरोपी निखिल खाडे याने घेतले आहेत. फिर्यादीसह साक्षीदार यांची फसवणूक केली आहे .