Sat, Feb 29, 2020 12:13होमपेज › Kolhapur › पवारांचे ‘कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना’

पवारांचे ‘कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना’

Published On: Apr 30 2019 1:56AM | Last Updated: Apr 29 2019 8:58PM
सुरेश पवार

लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा संपत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भावी पंतप्रधान कोण, याचे भाकीत केले आहे. तेलगू देसमचे सर्वाधिकारी आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी या तिघांपैकी एकजण पंतप्रधान होईल, असे सूतोवाच शरद पवार यांनी केले आहे. पवार यांच्या या वक्‍तव्यामागे नेमका त्यांचा हेतू काय, याविषयी राजकीय निरीक्षक तर्क-वितर्क व्यक्‍त करीत आहेत. 

पवार हे उघड बोलतात, त्यापेक्षाही वेगळेच त्यांच्या मनात असते, असा सातत्याचा अनुभव आहे. ‘कहीं पे निगाहे, कहीं पे निशाना’ ही पवार यांची नेहमीचीच खेळी आहे. त्यामुळे या तिघांची नावे पंतप्रधानपदासाठी पुढे करताना, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना शह देण्याचा आणि आपल्याच गळ्यात पंतप्रधानपदाची माळ कशी पडेल, याचीही चाचपणी करण्याचा त्यांचा हेतू असावा काय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

शरद पवार यांच्या मते लोकसभा त्रिशंकू होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत मिळणार नाही. स्वाभाविक संमिश्र सरकार सत्तेवर येईल, असा पवार यांचा आडाखा आहे. भाजपप्रणीत ‘रालोआ’ला बहुमत मिळणार नाही, असा अंदाज पवार व्यक्‍त करतात, त्याचवेळी काँग्रेस पक्षाच्या जागा वाढणार, हे उघडच आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसला 2014 च्या तुलनेत तिप्पट म्हणजे 130 जागा मिळतील, असा अंदाज व्यक्‍त केला आहे. अशावेळी काँग्रेस आणि समविचारी पक्ष एकत्र येऊन, सरकार बनवण्याचा दावा करू शकतात. तिसर्‍या आघाडीच्या कडबोळ्यापेक्षा तीन आकडी संख्या गाठण्यात पक्ष हा केव्हाही स्थिर सत्ता देण्यात अधिक सक्षम ठरू शकतो.

अर्थात 50 वर्षे संसदीय राजकारणात मुरलेल्या शरद पवार यांना हे साधे गणित कळले नसेल, असे म्हणणे अवघड आहे. तथापि, आपण नाही, तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अथवा काँग्रेसमधील अन्य कोणी नेताही नाही, असा शह देण्यासाठीच शरद पवार यांनी म्हैस पाण्यात आहे, तोवरच या तीन नेत्यांची नावे पुढे केली असण्याचीच अधिक शक्यता आहे, असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.

बरोबर वीस वर्षांपूर्वी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वेगळी चूल मांडली आणि सोनिया गांधी यांना सरकार बनवण्यात अडथळा आणला होता. तशाच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याचा पवार यांचा मनसुबा असावा, असा तर्क त्यांच्या या वक्‍तव्यावरून व्यक्‍त केला जात आहे.

घोडे दामटण्याचा प्रयत्न

एका बाजूला राहुल गांधी, काँग्रेस नेत्यांना शह देताना चंद्राबाबू यांच्यासह तिघांची नावे पुढे करीत आपलेही घोडे पुढे दामटण्याचा पवार यांचा प्रयास असल्याची चर्चा आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांनी लोकसभा लढवणार नाही, असे घोषित केले होते; पण तरीही यावेळी माढ्यातून लढण्याची चाचपणी त्यांनी केली होती. नातू पार्थ पवार यांनी, आजोबा पंतप्रधान व्हावेत, यासाठी मी निवडणूक लढवीत आहे, असे जाहीरपणे सांगितले होते. पंतप्रधानपदाची पवार यांची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यामुळे आपण तिघांची नावे पुढे आणली, तरी त्यावर एकमत होणार नाही आणि मग आपले नावही रेसमध्ये येईल, अशी पवार यांची अटकळ असल्यास आश्‍चर्य वाटायला नको.

उंट आणि हत्ती

मध्ययुगीन काळामध्ये गडकिल्ल्यांचे दरवाजे अतिशय मजबूत असत. दरवाजांना हात-हातभर लोखंडे उलटे खिळे ठोकलेले असत. त्यामुळे दरवाजा फोडणे कठीण होत असे. अशावेळी प्रथम दरवाजावर उंटाची चाल केली जाई. दरवाजावर उंट अडकला, की मग दरवाजावर हत्तीकडून धडक दिली जाई. त्यात हत्तीला यश मिळे. दरवाजा तुटत असे. शरद पवार यांनी जी नावे पुढे आणली आहेत, त्यांचा उंटाप्रमाणे वापर करावा आणि ते अपयशी ठरले तर मग आपले मोहरे पुढे आणावे, असाही पवार यांचा मनसुबा असू शकतो. पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी प्रांजळपणाचा आविर्भाव आणला असला, तरी त्यांचा हेतू उघड झाल्याशिवाय राहात नाही. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीनंतर त्रिशंकू लोकसभा झाल्यास नाट्यमय घडामोडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पवारांनी पगडी फिरवली

रविवारी पवारांनी पंतप्रधानपदाचे दावेदार कोण, याचे भाकीत केले आणि सोमवारी लगेच पगडी फिरवली. आपल्या विधानाचा विपर्यास केला, असे सांगत त्यांनी हात झटकले. पण त्यांच्या मनात काय, हे बाहेर पडलेच. नंतर खुलासा करण्याने संशयाचे निरसन होणे शक्यच नाही. आपली विधाने बदलण्याबाबत पवार प्रसिद्धच आहेत.