Mon, Jul 13, 2020 06:01होमपेज › Kolhapur › शालार्थ प्रणाली ऑफलाईनच!

शालार्थ प्रणाली ऑफलाईनच!

Published On: May 22 2018 1:25AM | Last Updated: May 22 2018 12:15AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

सरकारकडून डिजिटल इंडियाचा नारा देत सर्व व्यवहार डिजिटल पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, शिक्षण विभागाच्या शालार्थ सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड पाच महिने होऊन गेले तरी दुरुस्त झालेला नाही. वारंवार आदेश काढून शिक्षकांचे वेतन ऑफलाईन करण्याची नामुष्की शिक्षण विभागावर आली आहे.

खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन मार्च 2014 पासून शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने होत आहे. जिल्ह्यात माध्यमिकचे 11 हजार व प्राथमिकचे सुमारे 1,300 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आहेत. शाळांकडून वेतन देयके वेतन पथकाकडे ऑनलाईन पद्धतीने येतात. वेतन पथकाकडून देयके एकत्रित करून ती जिल्हा कोषागार कार्यालयाकडे पाठविली जातात. त्यानंतर बँकेत धनादेश जमा केला जाऊन शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार होतात. परंतु, 12 जानेवारी 2018 पासून या प्रणालीच्या डाटाबेस सॉफ्टवेअरमध्ये बिघाड झाला आहे. शालार्थ वेतन प्रणाली अद्यापही सुरू नसल्याने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे वेतन ऑफलाईन पद्धतीने काढण्यात येत आहे. 

जुलै महिन्यापर्यंतचे वेतन ऑफलाईन पद्धतीने आदा करण्यासंदर्भात शिक्षण विभागाने नुकताच 18 मे रोजी सुधारित आदेश काढला आहे. शिक्षक संघटनांकडून आंदोलने करून निवेदने देऊनही यात सुधारणा झालेली नाही. 

शिक्षण विभागास शालार्थ प्रणालीतील बिघाड अद्याप दुरुस्त करता आलेला नाही. यामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांचे पगार वेळेत होत नाहीत. शालार्थ प्रणालीत नावे समाविष्ट नसलेल्या शिक्षकांसमोर अडचणी वाढल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी प्रणाली सुरू न केल्यास बेमुदत आंदोलन करणार आहे. - राजेश वरक, अध्यक्ष, महानगर जिल्हा माध्य. शिक्षक संघ