Mon, Jul 06, 2020 05:38होमपेज › Kolhapur › नगरसेवकांकडून सोयीचे राजकारण

नगरसेवकांकडून सोयीचे राजकारण

Published On: Apr 04 2019 1:55AM | Last Updated: Apr 04 2019 12:49AM
कोल्हापूर : सतीश सरीकर

सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतील नगरसेवक मात्र पक्षीय भूमिकेला बगल देऊन स्वत:च्या राजकीय सोयीत गुंतले आहेत. काही नगरसेवक नेत्यांच्या प्रेमापोटी, तर काही नगरसेवक भविष्यातील स्वत:ची राजकीय जोडणी म्हणून प्रचारात उतरले आहेत. 

महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली, तरी काँग्रेसचे नगरसेवक भाजप-शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात, तर भाजप-ताराराणी आघाडी असूनही ताराराणी आघाडीचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारात दंग आहेत. भाजपचेही काही नगरसेवक छुप्या, तर काही उघडपणे राष्ट्रवादीचा प्रचार करत असल्याचे चित्र आहे. 

निवडणूक खासदारकीची असली, तरी नगरसेवकांना डिमांड आले आहे. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यांची आघाडी व शिवसेना-भाजप यांची युती असली, तरी नेमके त्याच्या उलटे चित्र कोल्हापुरात पाहावयास मिळत आहे. कुणी, कुणासाठी भांडायचं... म्हणून आपापली वाट धरत आहेत. महापालिका निवडणुकीत आपल्याला विरोध केला होता, मग तुम्हाला मदत कशी करायची? असे थेट बोलून दाखविले जात आहे.  नगरसेवकांच्या भूमिकेने त्या-त्या पक्षाचे नेतेही चक्रावले आहेत.  

81 नगरसेवक असलेल्या महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता आहे. त्यांच्याकडे 44 नगरसेवक आहेत. त्यापैकी दोघे अपात्र ठरल्याने ही संख्या 42 झाली आहे. विरोधी भाजप-ताराराणी आघाडीचे संख्याबळ 33 आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक सभागृहात आहेत. महापालिका सत्ताकारणात आघाडी व युती असली, तरी त्याच्या नेमके उलटे काम लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष व नगरसेवकांकडून केले जात आहे. 

राष्ट्रवादीचे खासदार असूनही महाडिक यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे नगरसेवक येत नसल्याचे वास्तव आहे. तसेच खा. महाडिक यांनी महापालिका निवडणुकीत सहकार्य केले नसल्याचा आरोप करून राष्ट्रवादीचे नगरसेवकही अद्याप प्रचार यंत्रणेपासून लांब आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे. 

भाजप-ताराराणी आघाडीचीही तीच अवस्था झाली आहे. राज्यात शिवसेना-भाजप महायुती असली तरी भाजपचे बहुतांश नगरसेवक राष्ट्रवादीचे उमेदवार महाडीक यांचा प्रचार करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच भाजपने काही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीसाही बजावल्या आहेत. 

महापालिकेतील भाजपचा मित्रपक्ष ताराराणी आघाडी पूर्णपणे महाडीक यांच्या पाठिशी  आहे.  काँग्रेसचे  नगरसेवक  प्रा. मंडलिक यांना निवडूण द्या, असे आवाहन करत उघडपणे  प्रचारात उतरले आहेत. किंबहुना मंडलिकांच्या प्रचाराची सूत्रे काँग्रेस-राष्ट्रवादीचे आजी-माजी नगरसेवकच हलवित आहेत. परिणामी कोल्हापूर शहरात अभावानेच पक्षीय राजकारण पहायला मिळत आहे. दुसरीकडे शिवसेनेचा उमेदवार मैदानात असुनही सेनेचे चार नगरसेवक फारसे सक्रीय दिसत नाहीत.   

लोकसभा निवडणुकीत नगरसेवकांकडून सोयीचे राजकारण सुरू असल्याचे चित्र आहे. भाजप, ताराराणी आघाडीचे नगरसेवक काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक यांच्या प्रचारात, तर काँग्रेस नगरसेवकांच्या ‘हातात’ भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक  यांचा ‘धनुुष्यबाण’ दिसत आहे.