Sun, Aug 09, 2020 02:11होमपेज › Kolhapur › कोराणे, सावला, मुल्ला टोळीची हजार कोटींची मालमत्ता

कोराणे, सावला, मुल्ला टोळीची हजार कोटींची मालमत्ता

Last Updated: Dec 10 2019 1:16AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात आलेल्या मुंबईतील मटकाकिंग प्रकाश ऊर्फ पप्पू सावला, विरेल सावला, कोल्हापूर येथील मटकाबुकी सम्राट कोराणे, सलीम मुल्ला, इचलकरंजीतील अग्रवाल बंधू, सांगलीतील झाकीर मिरजकरसह 15 संशयितांच्या एक हजार कोटींच्या बेनामी मालमत्तेचा छडा लागला आहे. त्यापैकी 900 कोटींची मालमत्ता मुंबई, ठाण्यात; तर कोल्हापूर, सांगली व गोव्यात शंभरवर कोटींचे साम—ाज्य असल्याचे उघड झाले आहे.

मटकाबुकी प्रकाश ऊर्फ पप्पू, पुत्र विरेल सावलाच्या मालकीची मुंबई, ठाणे, वाशी खाडी पूल परिसर (मुंबई), पनवेल, राजस्थान व गुजरात येथील आलिशान फ्लॅट, प्लॉट, निवासी संकुले, मुंबईत मध्यवर्ती परिसरातील 6 अद्ययावत मॉल, वर्दळीच्या परिसरात 25 एकर क्षेत्राचे भूखंड अशी 900 कोटींची मालमत्ता फॉरेन्सिक ऑडिटच्या तपासणीत आढळून आली आहे, असे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी सांगितले.

गोवा, कर्नाटकात कॅसिनो, ऑनलाईन मटका जोमात

सम्राट कोराणे व साथीदारांनी काळ्या धंद्यातून दहा वर्षांत शहर व जिल्ह्यात मोठे बस्तान बसविले आहे. याशिवाय गोव्यात कॅसिनो व ऑनलाईन मटक्याच्या उलाढालीतून मोठ्या प्रमाणात मालमत्ता केली आहे. कर्नाटकातही स्वत: आणि साथीदारांच्या नावावर शेत जमिनी, फ्लॅट खरेदी केल्याचे चौकशीत उघड आले आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. कोराणे, सलीम मुल्ला, अग्रवाल बंधू, झाकीर मिरजकर व अन्य संशयितांची कोल्हापूर, सांगली, मिरजेसह गोवा व कर्नाटकात शंभरावर कोटींची मालमत्ता असल्याचेही निष्पन्न झाले आहे, असेही ते म्हणाले.

बँकांतील पाच वर्षांतील लेखाजोख्याचे डिटेल्स मागविले

कोराणे, मुल्ला, सावला टोळीतील 44 जणांवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारत विशेष मोका न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. प्रकाश सावला, सम्राट  कोराणे फरारी झाले आहेत. टोळीतील सर्वच साथीदारांच्या विविध बँक खात्यात पाच वर्षांतील उलाढालीचे डिटेल्स मागविण्यात आले आहेत. सर्वांची बँक खाती गोठविण्यात आली आहेत. सर्व बँकांच्या व्यवस्थापनांशी लेखी पत्रव्यवहारही करण्यात आला आहे, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

जिल्ह्यातील मटका, जुगाराचे रॅकेट उद्ध्वस्त करणार

 सलीम मुल्ला, सम्राट  कोराणेच्या साखळीतून आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यात इचलकरंजी, शहापूर, जयसिंगपूर, रायबाग येथील मटका बुकींच्या हालचालीवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संबंधितांचे मोबाईल कॉल डिटेल्स, सीडीआर तपासण्यात येत आहेत. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. मटका, जुगाराचे रॅकेट मोडीत काढण्यासाठी आवश्यक त्या सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

अ‍ॅड. पवनकुमार उपाध्ये यांची सनद रद्दसाठी ‘कौन्सिल’कडे प्रस्ताव 

इचलकरंजीतील तेलनाडे टोळीतील साथीदार अ‍ॅड. पवनकुमार उपाध्ये याच्याविरुद्ध खंडणी वसुली, बलात्कार, खुनी हल्ल्यासह अनेक गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड आहे. उपाध्ये यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे. उपाध्ये यांची वकिली सनद रद्द करण्यासाठी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलकडे कायदेशीर प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यावर 12 डिसेंबरला सुनावणी होत आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.