Sat, Feb 29, 2020 17:52होमपेज › Kolhapur › वैष्णोदेवीच्या चरणी पैजेचे 51 हजार अर्पण

वैष्णोदेवीच्या चरणी पैजेचे 51 हजार अर्पण

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:25AMरूकडी : वार्ताहर

कर्नाटक राज्यात भाजप - काँग्रेस या दोन पक्षांमधील ‘काँटे  की  टक्कर’ ठरलेल्या विधानसभा  निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारील हे सांगता येत नव्हते. पण, माणगाव (ता. हातकणगंले) येथे उपसरपंच राजू मगदूम व  सामाजिक कार्यकर्ते व पद्मावती पाणी पुरवठा संस्थेचे माजी चेअरमन नेमगोंडा मगदूम यांनी या निवडणुकीच्या निकालासाठी 51 हजार रुपयांची पैज लावली होती. या पैजेबाबत ‘निवडणूक कर्नाटकात तर पैज माणगावत’ अशी जोरदार चर्चा  परिसरासह तालुक्यात सुरू होती. यात  भाजपची आघाडी व  काँग्रेसची  पिछाडी झाल्याने नेमगोंडा मगदूम यांनी पैज जिंकली. त्यामुळे राजू मगदूम यांनी ठरल्याप्रमाणे  आपली  पैजेची 51 हजार रुपये   वैष्णोदेवीच्या  चरणी अर्पण केले.

येथील  विद्यमान उपसरपंच राजू मगदूम हे आवाडे समर्थक आहेत.  नेमगोंडा  मगदूम हे  जुने जाणकार  विविध पक्षाशी संबधित आहेत. कर्नाटकातील  विधानसभा निवडणुकीत   काँग्रेस  पक्षच  बाजी मारेल यावर उपसरपंच मगदूम तर हरहुन्नरी नेमगोंडा मगदूम हे भाजप बाजी मारणार यावर ठाम होते. याप्रमाणे तसा  पैजेचा  लेखी मसुदा ठरला होता. दोघांनी 51 हजार रुपयांची पैज लावण्याची व ही पैज कोण जिंकेल त्याने ही रक्कम येथील वैष्णोदेवी मंदिराच्या विकासाकरिता देण्याचा लेखी करार सात साक्षीदारांचे सहीने झाला होता. या करारावर गणेश जोग, राजगोंडा पाटील, विजय नलवडे, सतीश महाजन, शशिकांत कांबळे, प्रशांत तांदळे, उमेश जोग यांच्या सह्या होत्या. या पैजेची चर्चा रूकडी, माणगावसह तालुक्यात जोरदार सुरू होती. मंगळवारी सकाळपासून राजू मगदूम व  नेमगोंडा  मगदूम यांच्या  मित्रपरिवाराचे निकालाकडे  लक्ष  होते. यात भाजपच्या विजयाने  नेमगोंडा मगदूम यांनी  पैज  जिंकली.   राजू  मगदूम  यांनी  कराराप्रमाणे  51 हजार रुपये माता वैष्णोदेवीच्या  चरणी  अर्पण  केले.