Tue, Jul 14, 2020 01:38होमपेज › Kolhapur › उत्पन्‍नवाढीसाठी प्रयत्न करून प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा : डॉ. प्रतापसिंह जाधव 

उत्पन्‍नवाढीसाठी प्रयत्न करून प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा : डॉ. प्रतापसिंह जाधव 

Last Updated: Nov 22 2019 1:43AM

कोल्हापूर : दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा करताना महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते. शेजारी सभागृह नेता दिलीप पोवार, राजू लाटकरकोल्हापूर : प्रतिनिधी 

महापालिकेचे उत्पन्न मर्यादित असल्याने त्याचा विकासकामांवर परिणाम होत आहे. परिणामी, उत्पन्नवाढीसाठी ठोस प्रयत्न करून थेट पाईपलाईनसह शहराचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावा. कोल्हापूर खड्डेमुक्‍त करण्यास प्राधान्य द्या, अशी सूचना दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी नूतन महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांना गुरुवारी केली.

महापौर अ‍ॅड. लाटकर व उपमहापौर मोहिते यांनी दै. ‘पुढारी’ कार्यालयास भेट देऊन डॉ. जाधव यांचे आशीर्वाद घेतले. थेट पाईपलाईन योजनेसह शहरातील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन मार्गदर्शन करावे, अशी विनंती महापौर लाटकर व उपमहापौर मोहिते यांच्यासह सभागृह नेता दिलीप पोवार, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली. 

2-3 वर्षांचा अ‍ॅडव्हान्स घरफाळा भरण्यासाठी सवलती द्या

कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाली नसल्याने निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेने आता उत्पन्नवाढीसाठी ठोस पर्याय शोधावेत. शहरातील हजारो प्रॉपर्टींना अद्यापही घरफाळा लावला नसल्याचे महापालिकेच्या सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्या सर्व प्रॉपर्टींना तत्काळ घरफाळा लागू करावा. शहरवासीयांनी पुढील तीन-चार वर्षांचा घरफाळा अ‍ॅडव्हान्स भरण्यासाठी विविध सवलती द्याव्यात. त्यातून मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्यास मदत होईल, अशी सूचना डॉ. जाधव यांनी केली. 

पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी निर्भय योजना सुरू करा

पाणीपट्टी थकबाकी वसुलीसाठी निर्भय योजना सुरू करावी. त्यामुळे थकबाकी वसूल होऊन महापालिकेकडे कोट्यवधी रुपये जमा होतील. महापालिकेने राज्य शासनाकडे शहरातील रस्त्यासाठी 178 कोटींचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, राज्य सरकार अस्तित्वात नसल्याने भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करू, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी महापौर लाटकर व उपमहापौर मोहिते यांना दिली.