Fri, Oct 30, 2020 18:54होमपेज › Kolhapur › ...अन् कोरोना रुग्ण गहिवरले

...अन् कोरोना रुग्ण गहिवरले

Last Updated: Aug 04 2020 1:32AM
कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले 

‘बहीण नाही तर काय झाले... मलाच बहीण माना’, असे शब्द कानावर पडताच कोरोनामुळे अलगीकरण कक्षात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे मन हेलावून गेले. शहरातील काही अलगीकरण कक्षात या रुग्णांवर उपचार करणार्‍या नर्स तसेच अन्य महिला कर्मचार्‍यांनी राखी बांधून बहीण-भावाचे नाते अधिक दृढ केले. या अनोख्या रक्षाबंधनाने कोरोना रुग्ण गहिवरून गेले.  शहरातील मेट्रो हॉस्पिटलमध्ये काम करणार्‍या सोनाली रत्नाकर, पूजा साजणेकर, वेधा पाटील या नर्सनी कोरोनावर उपचार घेणार्‍या रुग्णांना राखी बांधली. 
बहीण-भावाचे नाते वृद्धिंगत करणारा रक्षाबंधण सण सोमवारी अनेक घरात साजरा झाला.  पण  अलगीकरण कक्षात असलेल्या बहीण-भावांची कोरोनाने ताटातूट केली. कोणाचा भाऊ तर कोणाची बहीण कोरोना कक्षात उपचार घेत होते. राखी बांधायला मिळणार नाही, या विचाराने अनेकांचे डोळे पाणावले होते. कोरोनामुळे काहीजण कोरोना कक्षात तर काही अलगीकरण  कक्षात क्‍वारंर्टाइन झाले आहेत. 

कोरोनामुळे कोणालाही अशा रुग्णांजवळ सोडले जात नाही; पण डोळ्यांत प्राण आणून काही जण आापल्याला राखी बांधायला कुणीतरी येईल या प्रतीक्षेत होते. अलगीकरण कक्षात असणारी बहीण आपल्या भावाला राखी कशी बांधायची, याचा विचार करत होती. पण कोरोनाबाधित तसेच  अलगीकरण कक्षातील रुग्णांना काही ठिकाणी सुखद धक्‍का देणार्‍या घटना घडल्या. काही हॉस्पिटलमध्ये या विभागात काम करणार्‍या  महिला नर्सनी उपचार घेणार्‍या पुरुषांच्या हातावर राखी बांधून भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ केले. कोण कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा याचा विचार न करता राखीच्या पवित्र धाग्यात बहीण-भावाची नाती आकाराला आली. 

काही हॉस्पिटलमध्ये पुरुष कर्मचार्‍यांनी पुढाकार घेऊन कोरोनाचे उपचार घेणार्‍या महिलांकडून राखी बांधून घेतली. या अनोख्या रक्षाबंधनाने कोरोनाबाधित रुग्णांचे मन हेलावून गेले. क्षणभर रक्‍ताचे नाते नसले तरी राखीच्या बंधनातून तयार झालेल्या या अनोख्या बंधनात स्वत:ला बांधून घेत रक्षाबंधनाचा हा अनोखा सण साजरा केला.   

 "