Tue, Jul 14, 2020 13:04होमपेज › Kolhapur › 360 च्या कोनात ‘कोरोना’ उलगडणारा ‘पुढारी’चा वेबिनार आजपासून

360 च्या कोनात ‘कोरोना’ उलगडणारा ‘पुढारी’चा वेबिनार आजपासून

Last Updated: Jul 02 2020 11:28AM
  • ‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे, ‘एनईईआरआय’च्या ज्येष्ठ मुख्य संशोधिका डॉ. अत्या कपले गुंफणार पहिले पुष्प
  • ‘कोरोना प्रतिबंधक लस बाजारात कधी येणार?’ या यक्षप्रश्‍नाचा होईल उलगडा; उद्या डॉ. लहाने उलगडतील कोरोनाविरुद्ध महाराष्ट्राचा संघर्षपट
     

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना विषाणूने मानवी जीवनाचे एकूणच स्वरूप बदलून टाकलेले आहे. कालखंडनिहाय पाहिले तर कोरोनापूर्व जग आणि कोरोनोत्तर जग, अशी जगाची थेट विभागणी झाली आहे. हे एक अत्यंत मोठे स्थित्यंतर आहे आणि त्याला संसर्गापासून बचाव ते अंगभूत प्रतिकारकशक्‍तीतील वाढीच्या अंगाने एक व्यक्‍ती म्हणून सामोरे जाण्यासाठी प्रत्येकाने नेमकेपणाने काय करायला हवे आणि काय करायला नको, इथपासून ते कोरोनामुळे बळावलेला संशय आणि नैराश्य या मनोदौर्बल्यातून बाहेर कसे पडावे इथपर्यंत... 360 च्या कोनातून मार्गदर्शन प्राप्‍त व्हावे, या उद्देशाने व राष्ट्रीय, सामाजिक कर्तव्याच्या भावनेतून ‘पुढारी’तर्फे ‘पुढारी’च्या अधिकृत फेसबुक पेजवर खास वेबिनार 1 ते 4 जुलैदरम्यान दररोज सायंकाळी 6 वाजता सुरू होणार आहे.

एका वाक्यात सांगायचे, तर ‘पुढारी’ने सर्वांसाठी चार दिवसांचे हे सर्वंकष असे ‘कोरोना गाईडलाईन पॅकेज’ उपलब्ध करून दिले आहे. वेबिनारमध्ये आरोग्य विज्ञानातील शरीर विज्ञान, जीवाणू-विषाणू विज्ञान आणि मनोविज्ञान या क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे 6 दिग्गज या खास वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. कोरोना काय आहे, त्याचे स्वरूप कसे आहे, लागण का आणि कशी होते, परिणाम काय, हे आता जवळपास सगळ्यांना माहिती झालेले आहे. कोरोनाशी ‘जग कसे लढतेय’, ‘महाराष्ट्र कसा लढतोय’ याबद्दलच्या तपशीलवार माहितीपासून ते सर्वांनाच सध्या सतावत असलेल्या ‘लस कधी येणार?’ या कळीच्या प्रश्‍नाचे उत्तर ‘पुढारी’च्या या खास वेबिनारमधून मिळणार आहे. ‘कोरोना’मुळे निर्माण झालेल्या ‘नैराश्य’, ‘एकाकीपणा’ आदी मानसिक समस्यांचे समाधानही या खास वेबिनारमधून होणार आहे. 

‘सीएसआयआर’चे महासंचालक डॉ. शेखर मांडे आणि ‘सीएसआयआर’ तसेच ‘एनईईआरआय’च्या ज्येष्ठ मुख्य संशोधिका डॉ. अत्या कपले ही महनीय द्वयी वेबिनारचे पहिले पुष्प गुंफणार आहेत. सध्या सर्वांनाच पडलेल्या ‘कोरोना प्रतिबंधक लस  संशोधन आणि सद्यस्थिती’ या यक्षप्रश्‍नाचा उलगडा ते करतील. 1 जुलै रोजी ठीक सायंकाळी 6 वाजता हे पहिले पुष्प सुरू होईल. 2 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ‘डीएमईआर’चे महासंचालक डॉ. तात्याराव लहाने हे ‘महाराष्ट्र कोरोनाशी कसा लढतोय’ त्याची इत्थंभूत माहिती आपल्या उद्बोधनातून देतील. 3 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी हे ‘कोरोना आणि मानसिक आरोग्य’ याविषयी मोलाचे मार्गदर्शन करतील. सर्वांच्याच द‍ृष्टीने ते फायद्याचे असेल; पण कोरोनाबद्दल टोकाची मानसिक धास्ती घेतलेल्यांना डॉ. नाडकर्णी यांचे हे चिंतन औषध ठरणार आहे. वेबिनारचा समारोप 4 जुलै रोजी जागतिक आरोग्य केंद्रातील आंतरराष्ट्रीय डिजिटल आरोग्य तसेच ‘आय-डीएआयआर’चे संचालक अमनदीप गिल (जीनिव्हा) हे गुंफतील. ‘जग कोरोनाशी कसे लढतंय’ हा त्यांचा विषय असेल. थोडक्यात, कोरोना संकटाचा सामना ‘लोकल टू ग्लोबल’ कसा केला जातो आहे, त्याबद्दलची माहिती आणि व्यक्‍ती म्हणून तुमच्या पातळीवर हा सामना तुम्ही कसा करावा याचे संपूर्ण मार्गदर्शन ‘पुढारी’च्या या खास वेबिनारमधून उपलब्ध होणार आहे.

डॉ. शेखर मांडे : नवी दिल्ली मुख्यालय असलेल्या ‘काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड अ‍ॅम्प  इंडस्ट्रियल रिसर्च’चे महासंचालक आहेत. प्रथिनांची रचना आणि कार्ये, प्रथिनांच्या संरचनात्मक विश्‍लेषणाच्या अंगाने सूक्ष्मजंतू क्षयाचे जीवशास्त्र अशा अनेक विषयांत त्यांचे संशोधन व ज्ञान सखोल आहे. ‘मॉलिक्युलर बायोफिजिक्स’ या विषयात त्यांनी डॉक्टरेट संपादन केली आहे. अमेरिका, नेदरलँडमधील नामांकित विद्यापीठांतून ‘सीनिअर फेलो’ म्हणून त्यांनी कार्य केले आहे.

डॉ. अत्या कपले : भारतातील या एक विख्यात पर्यावरणविषयक जनूक तज्ज्ञ आहेत. जागतिक महिला वैज्ञानिक संघटनेच्या त्या उपाध्यक्षा आणि समन्वयिका आहेत. 2019 च्या कुंभमेळ्यात गंगेच्या शुद्ध पाणी प्रकल्पात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कारखान्यांतून होणार्‍या कचर्‍यामुळे उद्भवणारे प्रदूषण कमी व्हावे म्हणून ‘मायक्रोऑर्गनिझम’चे सखोल अध्ययन त्यांनी केले आहे. 2000 मध्ये अखिल भारतीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ संघटनेतर्फे दिला जाणारा ‘यंग सायंटिस्ट’ पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे. 

डॉ. तात्याराव लहाने : नेत्र शस्त्रक्रियेच्या क्षेत्रातील विक्रमादित्य असलेले डॉ. लहाने मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज तसेच जे. जे. हॉस्पिटलचे निवृत्त अधिष्ठाता आहेत. 1 लाख 62 हजारांवर कॅट्रॅक्ट सर्जरीज्चा जागतिक उच्चांक त्यांच्या नावावर आहे. माकेगाव (ता. रेणापूर, जि. लातूर) येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लहाने यांनी आपल्या सेवाकेंद्रित कर्तृत्वाने मोठी कीर्ती संपादन केली. देशभर नेत्र शस्त्रक्रियेची शिबिरे त्यांनी घेतली आणि हजारो गरिबांना त्याचा लाभ झाला. लहाने यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘पद्मश्री’ने गौरविण्यात आले.
डॉ. आनंद नाडकर्णी : विख्यात मनोचिकित्सक, सिद्धहस्त लेखक आहेत. डॉ. नाडकर्णी यांनी मानसिक आरोग्याच्या क्षेत्राबद्दल मोठी जनजागृती केली. आपल्या अत्यंत व्यग्र अशा दैनंदिन व्यावसायिक नित्यक्रमातून वेळ काढत देशभरात हे कार्य त्यांनी केले. देशाची भावी पिढी मनोबलशाली व्हावी म्हणून पालक, शिक्षकांचे प्रबोधन केले. राष्ट्रीय योजना आयोगामध्ये सल्लागार म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली. ‘इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ’ ही संस्था म्हणजे देशाला त्यांची मोठी देणगीच होय.  

अमनदीप गिल : संयुक्‍त राष्ट्रे (युनो) सरचिटणीसांच्या डिजिटल सहकार्य उच्चस्तरीय पॅनलचे कार्यकारी संचालक म्हणून ऑगस्ट 2019 पर्यंत आंतरराष्ट्रीयस्तरावर मोलाची भूमिका गिल यांनी बजावली आहे. तत्पूर्वी, ते ‘युनो’तील भारताचे राजदूत होते. जीनिव्हातील नि:शस्त्रीकरण परिषदेचे ते कायम प्रतिनिधी होते. सध्या ते ‘ग्लोबल पब्लिक गुडस्’च्या कार्यकारिणीत सदस्य आहेत. ‘गव्हर्निंग हेल्थ फ्युचर्स 2030 : ग्रोव्हिंग अप इन अ डिजिटल वर्ल्ड’ हा दूरदर्शी उपक्रम राबविणार्‍या ‘लॅन्सेट/एफटी कमिशन’चे आयुक्‍त आहेत.