Thu, Sep 24, 2020 06:42होमपेज › Kolhapur › मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार : डॉ. प्रतापसिंह जाधव

मुख्यमंत्र्यांचे जाहीर आभार : डॉ. प्रतापसिंह जाधव

Published On: Jan 21 2019 5:23PM | Last Updated: Jan 21 2019 5:48PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरात उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन करावे, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे जाहीर आभार मानतो, असे उद‍्गार ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी आज काढले. टोल आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी टोल रद्द करून शब्द पाळला होता, असे सांगून सहा जिल्ह्यांतील जनतेच्या वतीने आपण त्यांचे आभार मानत असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगितले.

कोल्हापूर सर्किट बेंच स्थापनेची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांना याबाबतचे पत्र दिले आहे. या यशाचे श्रेय दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे आहे. डॉ. जाधव यांचे आम्ही जाहीर आभार मानत आहोत, अशा भावना जिल्हा बार असोसिएशन व खंडपीठ नागरी कृती समिती पदाधिकार्‍यांनी सोमवारी व्यक्‍त केल्या.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी सकाळी डॉ. प्रतापसिंह जाधव यांना पत्राची प्रत ऑनलाईन पाठवली.  सर्किट बेंच स्थापनेचा विषय आता मुख्य न्यायमूर्ती पाटील यांच्या अधिकारकक्षेत आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन व खंडपीठ नागरी कृती समितीच्या शिष्टमंडळाद्वारे मुख्य न्यायमूर्ती पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती करण्याचा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्णयाची माहिती डॉ. जाधव यांनी जिल्हा बार असोसिएशन, खंडपीठ नागरी कृती समितीला देताच, पदाधिकार्‍यांनी दै.‘पुढारी’ कार्यालयात धाव घेतली. अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, उपाध्यक्ष अ‍ॅड. आनंदराव जाधव, खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, शिवाजीराव राणे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी डॉ. प्रतापसिंह जाधव यांची भेट घेऊन त्यांचा गौरव केला. डॉ. जाधव यांच्यामुळेच अंतिम टप्प्यातील लढ्यात सर्वात मोठा विजय आहे, अशी भावनाही  पदाधिकार्‍यांनी व्यक्‍त केली.

३५ वर्षांपासून लढा : डॉ. जाधव
यावेळी बोलताना डॉ. जाधव म्हणाले, दै.‘पुढारी’चे मुख्य संपादक आणि स्वत: वकील या नात्याने कोल्हापुरात सर्किट बेंच व्हावे, यासाठी मनात तळमळ होती. 35 वर्षांपासून आपण या लढ्यात आहोत. सर्किट बेंचसह कोल्हापुरातील अनेक प्रलंबित प्रश्‍नांना न्याय मिळावा, यासाठी आपला पाठपुरावा असतो. सर्किट बेंचसाठी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी वारंवार चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली.

केवळ कोल्हापूरचा उल्‍लेख
सर्किट बेंचसाठी मुख्य न्यायमूर्तींना दिलेल्या पत्रात केवळ कोल्हापूरचा उल्लेख आहे. त्यामुळे आता कोणतीही अडचण येणार नाही. कोल्हापूरसाठी हा ऐतिहासिक निर्णय असला, तरी मुख्य न्यायमूर्तींनी शिक्‍कामोर्तब केल्यानंतर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील 60 हजारांवर पक्षकार, वकील, समाजातील सर्व घटकांना न्याय मिळणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला

डॉ. जाधव म्हणाले, सर्किट बेंचसह कोल्हापूरच्या अन्य प्रश्‍नांबाबत फडणवीस यांच्याशी अनेकवेळा चर्चा झाली. टोल आंदोलनानंतर सर्किट बेंच स्थापनेबाबत दिलेला शब्दही मुख्यमंत्र्यांनी पाळला आहे. कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील जनतेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्‍त करणे कर्तव्य आहे. वकिलांच्या शिष्टमंडळाने मुख्य न्यायमूर्ती पाटील यांची भेट घेऊन त्यांना विनंती करावी, असेही त्यांनी आवाहन केले.

लढ्यात डॉ. जाधव यांची मोलाची भूमिका : चिटणीस
बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस म्हणाले, सर्किट बेंचसाठी वकिलांच्या तीन पिढ्यांचा संघर्ष आहे. लढ्यात दै.‘पुढारी’चे डॉ. जाधव यांनी मोलाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे यश येत आहे. डॉ. जाधव यांचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत. डॉ. जाधव यांचा कोल्हापुरात भव्यदिव्य नागरी सत्कार करण्याचा सहा जिल्ह्यांतील बार असोसिएशन, खंडपीठ नागरी कृती समिती, पक्षकार संघटनांनी निर्धार केला आहे.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळेच सर्किट बेंचसाठी पत्र
खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार म्हणाले, डॉ. जाधव यांच्यामुळे शहर, जिल्ह्यातील अनेक प्रश्‍नांना चालना मिळाली आहे. सर्किट बेंचच्या लढ्यात खांद्याला खांदा लावून त्यांचा सहभाग आहे. केवळ डॉ.जाधव यांच्यामुळे सरकारला मुख्य न्यायमूर्तींना पत्र द्यावे लागले आहे. सर्किट बेंचचे सर्व श्रेय डॉ. जाधव यांचे आहे.

१९८५ पासून खांद्याला खांदा लावून लढ्यात सहभाग
महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, खंडपीठाच्या लढ्यात डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा सिंहाचा वाटा आहे. 1985 मध्ये तत्कालीन विधी व न्यायमंत्री रामराव आदिक यांच्या उपस्थितीत कराड येथे झालेल्या परिषदेतही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी खंडपीठाच्या प्रश्‍नावर लक्ष वेधले होते. आजवरच्या लढाईत डॉ.जाधव यांनी शासन दरबारी जनतेची बाजू मांडण्याचा प्रभावी प्रयत्न केला आहे. त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही.

जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे म्हणाले, सर्किट बेंचप्रश्‍नी डॉ. जाधव यांचा फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा होता. त्यामुळे हा प्रश्‍न कोणत्याही स्थितीत सुटणार, याची आम्हाला खात्री होती. नेमके तेच झाले. मुख्यमंत्र्यानी मुख्य न्यायमूर्तींकडे पत्र सोपविल्याची गोड बातमी डॉ. जाधव यांच्याकडून समजल्यानंतर, मन भरून आले.यावेळी झालेल्या चर्चेत बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, प्रकाश मोरे, सुशांत गुडाळकर, युवराज शेळके, स्वाती तानवडे, जयदीप कदम, ओंकार देशपांडे, संजय मुळे, विजय पाटील आदी सहभागी झाले होते.

पदाधिकार्‍यांच्या घोषणांनी  वातावरण भारावले
सर्किट बेंच स्थापनेसाठी मुख्यमंत्र्यांनी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्याकडे पत्र दिल्याचे डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी जाहीर करताच, उपस्थित पदाधिकार्‍यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, महादेवराव आडगुळे, आर. के. पोवार, शिवाजीराव राणे, विवेक घाटगे, बाबा पार्टे यांनी डॉ. जाधव यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. यावेळी वातावरण भारावले होते.