Tue, Oct 20, 2020 11:23होमपेज › Kolhapur › प्रा. दाभोळेंच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन 66 लाख लुटले

प्रा. दाभोळेंच्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन 66 लाख लुटले

Last Updated: Sep 19 2020 1:16AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

लेखक आणि प्रा. ज. रा. दाभोळे यांच्या पत्नी रेखा जगन्नाथ दाभोळे (वय 75, रा. नागाळा पार्क) यांना गुंगीचे औषध देऊन त्या उपचारासाठी दाखल असताना त्यांच्या घरातून 66 लाखांची रक्कम परस्पर लंपास केल्याप्रकरणी अनिल सुभाष म्हमाणे (रा. रविवार पेठ) याच्यावर शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.19 जून ते 4 जुलै 2020 या कालावधीत हा प्रकार घडल्याची फिर्याद रेखा जगन्नाथ दाभोळे यांनी पोलिसांत दिली.

फिर्यादी रेखा दाभोळे यांच्या तक्रारीनुसार, लेखक ज. रा. दाभोळे व अनिल म्हमाणे यांची पुस्तक छपाईच्या कामातून ओळख झाली होती. या कारणाने म्हमाणे हा त्यांच्या घरी येत होता. नोटा बंदीनंतर सरकार लोकांच्या रकमा जप्त करणार आहे, अशी भीती म्हमाणे याने दाभोळे यांना घालून विविध बँकांतील त्यांचे पैसे काढण्यास भाग पाडले. ही रक्कम 66 लाख रुपये होती. 

फिर्यादी रेखा दाभोळे यांनी ही रक्कम घरातील बेडरूममध्ये ठेवली होती. दरम्यान, संशयित म्हमाणे याने दाभोळे यांच्या घरी जाऊन एकवेळा चहा बनवून, तर एकवेळा दूध-भाकरीतून गुंगीची औषधे दिली. त्यामुळे रेखा दाभोळे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. या वेळेत म्हमाणे याने दाभोळे यांच्या घरी जाऊन प्रा. ज. रा. दाभोळे यांची नजर चुकवून 66 लाखांची रक्कम असलेली बॅग चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक राहुल वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

 "