Thu, Sep 24, 2020 07:40होमपेज › Kolhapur › साखरेच्या राजकारणाला उकळी!

साखरेच्या राजकारणाला उकळी!

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 11 2018 11:15PMबिद्री : टी. एम. सरदेसाई

बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद साखरेच्या दरावरून ‘बिद्री’ च्या कार्यक्षेत्रात पुन्हा राजकारणाने उचल खाल्ली आहे. सत्तारूढ व विरोधकांच्या परस्पर भूमिका व आरोप-प्रत्यारोपांनी बिद्री साखर कारखान्याच्या बिगर हंगामात साखरेच्या राजकारणाला उकळी फुटू लागली आहे.

बिद्री साखर कारखान्याचे 58 हजार 180 ‘अ’ वर्ग सभासद व संस्था गटाचे 1196 ‘ब’ वर्ग असे एकूण 59 हजार 376 सभासद आहेत. सत्तारूढ गटाने मागील पंधरा दिवसांत ज्या सभासदांचा ऊस पाच वर्षांत एकदाही आला नाही. तसेच पुढील हंगामात सभासदाने किमान सहा टन ऊस पुरवठा न केल्यास अशा सभासदांची सवलतीच्या दरातील साखर 10 रुपये किलोऐवजी 20 रुपये करण्याचा निर्णय बिद्री कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील व संचालक मंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे जे सभासद प्रामाणिकपणे कारखान्यास ऊसपुरवठा करतात त्यांना फायदा व्हावा व गेल्या पाच वर्षांत ज्या सभासदांनी एकदाही ऊसपुरवठा केला नाही असे सुमारे 23 हजार सभासद आहेत. मात्र, ते सवलतीच्या दरातील वर्षाला 65 किलो साखर उचल करतात. त्यामुळे एकप्रकारचा कारखान्यास आर्थिक तोटा होतो, असे स्पष्ट केले आहे.

यावर विरोधी गटाचे आमदार प्रकाश आबिटकर, माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, बी. एस. पाटील, दत्तात्रय उगले, के. जी. नांदेकर यांनी सभासदांना मिळणार्‍या सवलतीच्या साखरेचा दर किलोस 10 रुपयावरून 20 रुपये केला आहे. 

ही अन्यायी दरवाढ असून, या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांची भूमिका दुटप्पी आहे. ज्या सभासदांनी कारखान्याचे शेअर्स खरेदी केले आहेत. अशा सभासदांच्या जीवावर कारखाना व सहवीज प्रकल्पाची उभारणी झाली आहे. श्री पाटील यांनी सत्ता मिऴविण्यासाठी केवळ त्यांची मते घेतली. आता विविध कारणे पुढे करून त्यांच्या सोयी-सुविधा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्याचबरोबर अपात्र सभासदांच्या कायदेशीर बाबीपूर्ण करून कारखान्याच्या निवडणूकीनंतर दोन महिन्यात ‘त्या’ सभासदांची साखर सुरू करणार अशा वल्गना केल्या आहेत. त्यांच्या या वल्गना हवेतच विरल्या आहेत. सत्तारूढ गट केवळ खोटी आश्‍वासने देतो व प्रत्येकवेळी सत्ता मिळवितो. असा घणाघाती आरोप आमदार आबिटकर यांनी पत्रकार बैठक घेवून केला आहे.

यावर अध्यक्ष के. पी. पाटील यांनी आमदार आबिटकर व दिनकरराव जाधव जाधव यांनीत पूर्वीपासून साखर आयुक्तांना अर्ज करून जे सभासद ऊस पुरवठा करीत नाहीत. अशा सभासदांची सवलतीच्या दरातील साखर बंद करावी अशी यापूर्वी मागणी केली आहे. वाढीव सभासद वाठीवरून त्यांनी रान उटविले पण सुज्ञ सभासदांनी त्यांना निवडणूकीत नाकारले. त्यामुळे जनाधार नसलेल्या या मंडळींना साखर दर वाढीचा पुळका नसून सत्ता गेल्यानंतर लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रय्च्न आहे. त्यातून राजकीय पोळी भाजून घेत आहेत. असा पलटवार के. पी. पाटील यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व  कांही निवडक शिवसैनिकासह सभासदांच्या सवलत साखरेचे दर वाढीला विरोध करून ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी.  याबाबत ‘बिद्री’ चे अध्यक्ष पाटील यांना निवदेन दिले.