Fri, Feb 28, 2020 00:15होमपेज › Kolhapur › ‘खाकी’ची सामान्यांवर दादागिरी!

‘खाकी’ची सामान्यांवर दादागिरी!

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 08 2018 1:56AMकोल्हापूर : दिलीप भिसे

‘आयएसओ’ आणि ‘स्मार्ट’ संकल्पनेद्वारे पोलिस दलाची प्रतिमा सुधारण्याचा, किंबहुना सर्वसामान्यांत विश्‍वासार्हता निर्माण करण्यासाठी धडपड सुरू असताना, दुसरीकडे मात्र या प्रयत्नांना खात्यांतर्गत कनिष्ठ यंत्रणेकडून कोलदांडा घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या गुंड-मवाल्यांच्या टोळ्यांवर कायद्याचा धाक निर्माण करण्याऐवजी सामान्यांवर भरचौकात बळाचा वापर करून दहशत माजविणार्‍या यंत्रणेला काय म्हणावे?

कोल्हापूर पोलिसांची पावलेही त्याच दिशेने पडू लागली आहेत की काय? अशी शंका येऊ लागली आहे. अनिकेत कोथळेच्या मृत्यूनंतर कोल्हापूर पोलिसही सांगलीचा कित्ता गिरवू पाहताहेत का? अशी शंका दाभोळकर कॉर्नरवर मध्यरात्री घडलेल्या घटनेवरून येऊ लागली आहे.   

खाकी वर्दीतल्या उन्मत्त दहशतीचा अनिकेत कोथळे बळी ठरल्यानंतर सांगलीच नव्हे, तमाम पोलिस यंत्रणा टीकेचा विषय ठरली होती. खात्यात कार्यरत राहून चांगुलपणा जोपासणार्‍या अनेक बड्या अधिकार्‍यांनाही रोषाला सामोरे जावे लागले होते. पोलिसांच्या डोळ्याला डोळा भिडविण्याची हिंमत नसणार्‍या समाजकंटकांनीही ‘डिव्हिजन’च्या नावानं कडाडा बोटे मोडली होती. ही वस्तुस्थिती आहे. 

सांगलीनंतर कोल्हापूर पोलिस दल चर्चेत

सांगलीतील घटनेमुळे नामुष्की पत्करावी लागलेल्या पोलिसांनी काही बोध घेतला असावा? अशी अटकळ होती. मात्र, रविवारी मध्यरात्री दाभोळकर कॉर्नरवर पोलिसांच्या अमानुष कृत्यामुळे सांगलीनंतर आता कोल्हापूर पोलिस दल चर्चेत आले आहे. 

वरिष्ठांनाच करावे लागणार आत्मपरीक्षण 

भरचौकात दहशत माजविणारे पोलिस नेमक्या क्षणी कोणत्या स्थितीत होते? मानसिक स्थिती काय होती?  दगड, विटांचा वापर करण्यामागे त्यांचा हेतू काय होता? कालांतराने या कारणांचा उलगडा होईलच; पण कायद्याच्या रक्षणकर्त्यांनीच भरचौकात उघडपणे कायद्याला आव्हान देणे कितपत योग्य आहे? याचे वरिष्ठाधिकार्‍यांनाच आत्मपरीक्षण करावे लागणार आहे, यात शंका नाही.

‘साहेब’ स्वत:च फिल्डवर

सामाजिक स्वास्थ्याला आव्हान देणार्‍या प्रवृत्तींविरुद्ध पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांना स्वत:ला फिल्डवर यावे लागते. जुगारीअड्ड्यांवरील कारवाईसाठी स्वत:कडील पोलिसांना रवाना करावे लागते. वरिष्ठाधिकार्‍यांचा यंत्रणेवर धाक नाही की काय? असा चर्चेचा सूर आहे.

असुरक्षिततेची भावना

जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख वाढतो आहे. घरफोडी, चोर्‍यांसह चेन स्नॅचिंगच्या घटनांमुळे असुरक्षिततेची भावना आहे. ‘डीबी’ पथकांच्या भानगडी चर्चेचा विषय ठरत आहेत. तलवारी चकाकत आहेत. हाणामार्‍या डोकेदुखीच्या ठरल्या आहेत. सावकारी टोळ्यांचा विळखाच पडला आहे. छेडछाडीमुळे युवती हैराण बनलेल्या आहेत. एकंदरीत जनतेमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

समाजातील सर्वच घटकांशी वर्तणूक सौजन्याची असावी, पोलिस ठाण्यात येणार्‍यांची विचारपूस करून त्यांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी, अशा पोलिस दलांतर्गत घटकांना सूचना असतानाही अधिकाराचा गैरवापर करून कायदाच हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. दाभोळकर कॉर्नरवर घडलेल्या घटनेची अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्यामार्फत चौकशी सुरू आहे. भरचौकातील प्रकार अयोग्य आहे. - संजय मोहिते, पोलिस अधीक्षक, कोल्हापूर

संबधित वृत्त- 

हाणामारी : सहा.फौजदारासह ३० जणांवर गुन्हे