Fri, Jul 10, 2020 02:44होमपेज › Kolhapur › खर्‍याखुर्‍या अन् तोतया पोलिसांचीही धास्ती

खर्‍याखुर्‍या अन् तोतया पोलिसांचीही धास्ती

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 11 2018 10:06PMकोल्हापूर : गौरव डोंगरे

खून, खंडणी आणि लाचखोरीसारखे कारनामे खर्‍याखुर्‍या पोलिसांकडून घडत असताना, आता तोतया पोलिसांनीही लूटमार सुरू केल्याने दाद मागायची तरी कोणाकडे? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

जिल्ह्यात चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे, दागिने घालून फिरू नका. तुमचे दागिने काढून रुमालात ठेवा, पुढे चेकिंग सुरू आहे... अशी बतावणी करून तोतया पोलिसांकडून लुबाडणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. खर्‍याखुर्‍या पोलिसांबरोबरच तोतया पोलिसांची बनवेगिरी डोकेदुखी बनली आहे. पोलिस दलातील ‘स्वच्छते’बरोबरच तोतया पोलिसांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिस प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. 

आपटेनगरातील मेनरोडवर 4 मार्चला शिवाजी साठे यांना पोलिस असल्याची बतावणी करून एका तोतयाने त्यांच्याजवळील सोनसाखळी लंपास केली. तर त्याच दिवशी रूईकर कॉलनीत शिवाजी लायकर यांना लूटमार सुरू असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोनसाखळी, अंगठी, महागडे घड्याळ असा सुमारे साडेतीन लाखांचा ऐवज एकाने लूटला. या दोन्ही घटनांतील इसमांनी आपण पोलिस असल्याचे खोटे सांगून हा प्रकार केला. 

मंगळवार पेठेतील क्रीडा संकुल परिसरात तरुणाला अडवून पोलिस असल्याचे सांगून अंगझडती घेण्याच्या बहाण्याने 38 हजारांची रोकड घेऊन दोघे पसार झाले होते. या चोरट्यांजवळ असणार्‍या दुचाकीच्या चावीला ‘महाराष्ट्र पोलिस’ असे किचेन होते. तर फायबरची काठीही अडकवलेली होती. यामुळे संबंधित तरुणाचा त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. गोपनीय तपासासाठी पुण्याहून आल्याचे सांगून

एका भामट्याने हॉटेल व्यावसायिकाला 17 हजाराला गंडा घातला. डीवायएसपी असल्याचे सांगून तपासाच्या नावाखाली 18 दिवस शाहूपुरीतील हॉटेलमध्ये राहिला होता. केवळ नावाचा उल्‍लेख असलेले बोगस ओळखपत्र त्याने हॉटेलमालकाला दाखविले. शहरात एकापाठोपाठ घडलेल्या या घटनांनी पोलिस दलाची प्रतिमा कलंकित करण्याचे काम केले आहे. यापैकी बहुतांशी घटनांत पोलिसांच्या वापरातील साहित्य वापरण्यात आले होते. यामुळे काहीजण सहज त्यांच्या बोलण्याला बळी पडले. नागरिकांनीही अशा भामट्यांच्या बोलण्यावर सहज विश्‍वास न ठेवता संबंधित पोलिस ठाण्याकडे याबाबत तक्रार केली पाहिजे. 

पोलिस हा सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आहे. याचा गैरफायदा कोणी घेत असेल, तर त्याची गय केली जाणार नाही. पोलिस असल्याची बतावणी करून नागरिकांना लूटणार्‍या तोतया पोलिसांचा शोध घेऊन त्यांना शासन केले जाईल. नागरिकांनी अशा लोकांच्या बोलण्याला बळी पडू नये. 
- संजय मोहिते, पोलिस अधीक्षक