टक्का वाढला! जिल्ह्यात 30 हजार नवमतदार

Last Updated: Jan 23 2021 12:20AM
Responsive image


कोल्हापूर : अनिल देशमुख

जिल्ह्याची मतदार संख्या 31 लाखांवर गेली असून, निवडणूक आयोगाने नवी मतदार यादी 15 जानेवारीला प्रसिद्ध केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक वाढ कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात झाली आहे. चंदगड आणि शिरोळ तालुक्यांत मात्र गेल्या वर्षीपेक्षा मतदार संख्या कमी झाली आहे. जिल्ह्यात एकूण 34 हजार 369 मतदारांनी नवी नोंद झाली. मात्र, दोन मतदारसंघात 4 हजार 425 मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात एकूण 29 हजार 944 मतदारांची वाढ झाली.

मतदार नोंदणी, मतदार यादीतील दुरुस्ती याचा निरंतर कार्यक्रम सुरू होता. मात्र, कोरोना आणि त्यामुळे काही महिने असलेले लॉकडाऊन यामुळे मतदार नोंदणी कमी होईल अशी शक्यता होती. मात्र, ग्रामपंचायत आणि महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या महामारीतही चांगली मतदार नोंदणी झाली.

जिल्ह्यात जानेवारी 2020 मध्ये एकूण 30 लाख 91 हजार 962 मतदार होते. यावर्षी ते 31 लाख 21 हजार 906 इतके झाले आहेत. यामध्ये 16 लाख 538 पुरुष, तर 15 लाख 21 हजार 290 महिला मतदारांचा समावेश आहे. ट्रान्स जेंडर (इतर) या वर्गवारीत यावर्षी 78 मतदारांनी नोंद केली आहे. मात्र, गेल्यावर्षी हाच आकडा 81 इतका होता. 

चंदगडमधील 3, करवीरमधील 1, इचलकरंजीत 1 आणि शिरोळमधील 1 अशी आठ जणांची नावे कमी झाली तर कोल्हापूर दक्षिण,उत्तर आणि शाहुवाडीत प्रत्येकी 1 नाव वाढले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार कोल्हापूर दक्षिण मतदार संघात वाढले. या मतदार संघात 8 हजार 884 मतदार वाढले. सर्वात कमी कागल मतदार संघात 2 हजार 48 मतदारांची वाढ झाली. चंदगडमध्ये 218 नी मतदार संख्येत घट झाली. गेल्यावर्षी 3 लाख 19 हजार 129 मतदार होते. नव्या यादीत 3 लाख 18 हजार 911 मतदार आहेत. शिरोळ मतदार संघात 4 हजार 207 मतदारांची नावे कमी झाली आहेत. गेल्या वर्षी 3 लाख 12 हजार 685  मतदार होते, नव्या यादीत ही संख्या 3 लाख 8 हजार 478 इतकी झाली आहे.

 महापालिकेसाठी आठ हजार नवे मतदार

कोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे आठ हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघात 4 हजार 686 मतदार वाढले. कोल्हापूर दक्षिण मतदार संघात 8 हजार 884 मतदारांची वाढ झाली आहे. दक्षिण मतदार संघात कोल्हापूर महापालिकेचेही काही प्रभाग येतात. यामुळे महापालिका क्षेत्रात सुमारे 8 हजार मतदार वाढले आहेत.

 महापालिकेसाठी ही मतदार यादी ग्राह्य धरणार

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक मार्च अथवा मे महिन्यात होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी प्रसिध्द केलेली हीच मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. याच मतदार यादीच्या आधारावर प्रभाग निहाय मतदार याद्या तयार केल्या जाणार आहे.

कोल्हापूर दक्षिणमध्ये सर्वाधिक वाढ 

चंदगड, शिरोळमध्ये झाली घट

जिल्ह्याची मतदार संख्या 31 लाखांवर 

जिल्ह्यातील मतदार संख्येवर दृष्टिक्षेप...

मतदारसंघ    जानेवारी 2020    जानेवारी 2021     वाढ    घट

चंदगड           3,19,129             3,18,911          -    218

राधानगरी         3,25,617           3,28,861       3,244    -   

कागल              3,22,629           3,24,677    2,048    -

कोल्हापूर दक्षिण     3,23, 766    3,32,650    8,884    -

करवीर                  3,02,848    3,07,187    4,338    -

कोल्हापूर उत्तर     2,86,322    2,91,008    4,686    -

शाहूवाडी              2,87,638    2,92,007    4,369    -

हातकणंगले           3,18,046    3,21,170    3,124    -

इचलकरंजी           2,93,282    2,96,958    3,676    -

शिरोळ               3,12,685    3,08,478    -    4,207