होमपेज › Kolhapur › ‘पाटाकडील’ची ‘प्रॅक्टिस’वर 5-3 ने मात

‘पाटाकडील’ची ‘प्रॅक्टिस’वर 5-3 ने मात

Published On: May 14 2018 1:41AM | Last Updated: May 13 2018 11:56PMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

यजमान पाटाकडील तालीम मंडळाने आपल्या नावलौकिकाला साजेशी खेळी करत प्रॅक्टिस फुटबॉल क्‍लबचा 5 विरुद्ध 3 अशा गोलफरकाने पराभव करून  ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धेच्या साखळी फेरीत पहिल्या विजयासह 3 गुणांची कमाई केली.  पाटाकडील तालीम मंडळ व डी.वाय.पाटील ग्रुप आयोजित ही स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. स्पर्धेच्या साखळी फेरीस रविवारी प्रारंभ झाला. 

पहिला सामना प्रॅक्टिस क्‍लब ‘अ’ विरुद्ध पाटाकडील तालीम यांच्यात झाला. सुरुवातीपासूनच सामन्यावर पाटाकडीलची मजबूत पकड होती. पहिल्याच मिनिटाला झालेल्या चढाईत अकिमच्या पासवर ऋषिकेश मेथे-पाटील याने गोल नोंदवून आघाडी मिळविली. 15 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत अकिमने डी बाहेरून उत्कृष्ट फटक्यावर नेत्रदीपक गोलची नोंद केली. 34 व्या मिनिटाला ऋषिकेश मेथे-पाटील याने वैयक्तिक दुसरा आणि संघाकरिता तिसर्‍या गोलची नोंद केली. पाठोपाठ 36 व्या मिनिटाला ओंकार पाटीलच्या पासवर ऋषिकेशने चौथा गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 4-0 अशी भक्‍कम आघाडी मिळविली. 

चार गोल्सची आघाडी मिळाल्याने बेसावध झालेल्या पाटाकडीलवर प्रॅक्टिसकडून उत्तरार्धात जोरदार चढायांचा अवलंब करण्यात आला. 44 व्या मिनिटाला इंद्रजित चौगुलेच्या कॉर्नर किकवर सागर चिले याने पहिला गोल केला. 50 व्या मिनिटाला तेजस शिंदेच्या पासवर कैलास पाटीलने दुसर्‍या गोलची परतफेड केली. दरम्यान, पाटाकडीलही पुन्हा चार्ज झाली. 51 व्या मिनिटाला ओंकार जाधवच्या पासवर अकिमने वैयक्तिक दुसरा आणि संघाकरिता पाचवा गोल केला. यामुळे सामन्यात पाटाकडीलला 5-2 अशी आघाडी मिळाली. प्रॅक्टिसकडून 68 व्या मिनिटाला राहुल पाटीलने तिसरा गोल केला. उर्वरित गोलची परतफेड त्यांच्याकडून न झाल्याने पाटाकडीलने सामना 5-3 असा जिंकला. सामन्यात ऋषभ ढेरे, अक्षय मेथे-पाटील, माणिक पाटील, राहुल पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला.