Tue, Jan 19, 2021 22:43होमपेज › Kolhapur › वेबसाईटवर बंदी घातल्यास ऑनलाईन जुगारवर पायबंद शक्य

वेबसाईटवर बंदी घातल्यास ऑनलाईन जुगारवर पायबंद शक्य

Published On: Dec 09 2017 1:44AM | Last Updated: Dec 08 2017 10:22PM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

चिठ्ठीद्वारे मटक्याचे बेटिंग घेण्याची जुगार पद्धत आजही सुरू असली तरी संगणक आणि इंटरनेटचा वापर करून जुगार चालवणे सोपे झाल्याने ऑनलाईन कॅसिनोकडे बड्या धेंडांनी मोर्चा वळवला आहे. ऑनलाईनमुळे कॅसिनो विशेषत: रुलेट मोबाईलवर किंवा संगणकावर आणि तेही ऑफिस किंवा घरातून अशा कोठूनही खेळता येत असल्याने जुगारींचाही ऑनलाईन रुलेट (चक्री) खेळण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे ऑनलाईन जुगारात दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. वेबसाईटवर बंदी घालून हा जुगार बंद करणे शक्य असतानाही पोलिस यंत्रणा त्याकडे कानाडोळा करीत आहे.

इंटरनेटमुळे  जुगार चालवणे अधिकच सोेपे झाल्याने मटका व्यवसायातील बड्या धेंडांनी आपला मोर्चा ऑनलाईन जुगार अर्थात कॅसिनोकडे वळवला आहे. तसा ऑनलाईन जुगारालाही पोलिसांचा आशीर्वाद लागतोच. त्यामुळे त्यांच्या पूर्वपरवानगीनेच कोल्हापूर व लगतच्या जिल्ह्यांत ऑनलाईन जुगाराने चांगलेच हातपाय पसरले आहेत.

हा जुगार सुरू करण्यासाठी एजंटांना काही संगणक व इंटरनेटचे कनेक्शन घ्यावे लागते. इंटरनेटवर कॅसिनो सॉफ्टवेअर उपलब्ध आहे. ते डाऊनलोड केल्यानंतर डीलरकरवी बॅलन्स घ्यावा लागतो. या बॅलन्समधून जुगारींना त्यांनी दिलेल्या पैशाइतका बॅलन्स दिला जातो. त्या बॅलेन्समधून जुगारी बेटिंग लावू शकतो. विनिंग झाल्यास बॅलन्समध्ये वाढ होते तर न झाल्यास पैसे वजा होतात.

मटका बंद करण्याची वल्गना पोलिस अधिकारी अनेक वेळा करतात; पण तो बंद झालेला नाही, हे वास्तव आहे. ऑनलाईन कॅसिनो प्रकारात मात्र पोलिसांनी मनावर आणले तर हा जुगार बंद करणे शक्य आहे; पण पोलिसांनी अद्याप तरी मनावर घेतलेले नाही. ऑनलाईन जुगाराच्या साईटस् ओळखून त्यावर बंदीसाठी पाठपुरावा करणे पोसिसांना सहज शक्य आहे. त्यामुळे वेबसाईटवर बंदी घालणे आणि या व्यवसायातील बड्या धेंडांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

विद्यार्थीही फसले मायाजालात
ऑनलाईन जुगार पाहून पैसे दुप्पट-चौपट करणे सहज शक्य आहे, असे सर्वसामान्यांसह सर्वांनाच वाटते; पण संगणकाची करामत करुन जुगारींना फसवण्याचा हा उद्योग लवकर लक्षात येत नाही. पूर्ण पाकीट रिकामे झाल्यानंतरच त्याचे डोळे उघडतात. या जुगाराच्या मायाजालात विद्यार्थीही अडकले आहेत. काही विद्यार्थ्यांनी लालसेतून शैक्षणिक शुक्‍लही ऑनलाईन जुगारावर उधळल्याचे किस्से घडले आहेेत. अशा प्रकारानंतर काही विद्यार्थी नेत्यांनी हस्तक्षेप करून रक्‍कम परत करण्यास भाग पाडले व स्वत:चेही उखळ पांढरे करून घेतले. जुगारचालकांना तोंडे गप्प कशी करायची, याची चांगलीच जाण असल्याने ऑनलाईन जुगाराचे पेव वाढतच चालले आहे.