Fri, Jul 03, 2020 02:31होमपेज › Kolhapur › कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी

Last Updated: May 30 2020 10:24PM

file photoकोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. याच दरम्यान आज, शनिवारी गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ येथील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यातील हा कोरोनाचा पाचवा बळी आहे. 

जिल्ह्यात आज, शनिवारी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत नवीन ५८ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ५६२ वर पोहोचला आहे.

गडहिंग्लज तालुक्यात शनिवारी (ता.३०) दिवसभरात २७ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून, सायंकाळी सात वाजेपर्यंत एकूण ६५ रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये तब्बल ५२ रुग्णांची भर पडली आहे. शुक्रवारी रात्री १२ नंतर हेब्बाळ जलद्याळ, शिप्पूर तर्फ आजरा व मुंगूरवाडी येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला. शनिवारी दुपारच्या सत्रात शिप्पूर तर्फ नेसरी येथे दोन तर महागाव, डोणेवाडीत प्रत्येकी एक रुग्ण सापडला. पुन्हा सायंकाळच्या अहवालात तब्बल १९ रुग्णांची भर पडली. यात नरेवाडी ५, हेब्बाळ जलद्याळ ५, बड्याचीवाडी ३, लिंगनूर क। नूल, हसूरवाडी, हनिमनाळ, शिप्पूर तर्फ आजरा, हरळी बुद्रुक, कडगावात प्रत्येकी एक रुग्ण समोर आला.

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होईना. गेल्या तीन दिवसांपासून त्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शुक्रवारी उच्चांकी ६८ रुग्ण आढळून आले होते. चंदगड तालुक्यात काल दिवसभरात सर्वाधिक १७ रुग्ण आढळून आले. कोरोनाने मृत्यू झालेल्या यमेहट्टी (ता. गडहिंग्लज) येथील ५२ वर्षीय व्यक्‍तीच्या चौघा नातेवाईकांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येने जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढत चालले आहे. गडहिंग्लज, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहे.