Sat, Jul 04, 2020 08:28होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण

कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण

Last Updated: Mar 30 2020 12:00AM
कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. मंगळवार पेठ परिसरातील भक्तिपूजा नगरमध्ये आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या 45 वर्षीय महिला नातेवाईकाला कोरोनाची लागण झाल्याचे रविवारी रात्री स्पष्ट झाले. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तीनवर गेली आहे. दरम्यान, 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 39 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात गुरुवारी (दि. 26) कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले. कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठ परिसरातील भक्तिपूजा नगरमधील एका 37 वर्षीय तरुणाला तसेच पेठवडगाव येथील एका तरुणीला कोरोनाची लागण झाली आहे. पेठवडगाव येथील युवतीवर मिरज येथे, तर भक्तिपूजा नगरमधील तरुणावर कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भक्तिपूजा नगर येथील कोरोनाबाधित तरुण पुण्याहून दि. 20 रोजी आपल्या बहिणीकडे आला होता. 25 मार्च रोजी त्याला त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले होते. 26 मार्च रोजी त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी सुरू करण्यात आली. आजअखेर या तरुणाच्या संपर्कात तब्बल 63 जण आल्याचे उघड झाले आहे. या तरुणाने पुणे ते कोल्हापूर हा प्रवास रेल्वेच्या जनरल डब्याने केल्याने काही सहप्रवासी त्याच्या संपर्कात आले आहेत. त्यांचाही शोध सुरू आहे.

दरम्यान, या बाधित तरुणाच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांची तपासणी करण्यात येत आहे. काहींचे स्वॅब घेण्यात आले होते. यापूर्वी स्वॅब घेतलेल्या रुग्णांपैकी 14 जणांचे अहवाल रविवारी रात्री जिल्हा प्रशासनाला उपलब्ध झाले. या अहवालात पहिल्या बाधित रुग्णाशी संबंधित 45 वर्षीय महिला नातलगाचाही अहवाल आला असून, तिला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरातील बाधितांची संख्या तीनवर गेली आहे. कोरोनाचे तीन रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी रात्री तातडीची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना दक्ष राहण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यानुसार आवश्यक उपाययोजनांबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला.

39 जणांचे अहवाल प्रलंबित

जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 224 जणांची प्राथमिक तपासणी झाली. यापैकी 8 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले. स्वॅब घेतलेल्या एकूण 71 जणांच्या अहवालापैकी 31 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता एकूण 39 स्वॅबचे अहवाल प्रलंबित आहेत.

जिल्ह्यात आज दिवसभरात 224 जणांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. सीपीआरमध्ये 189 नागरिकांनी तपासणी करून घेतली. इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयात 9 जणांची, तर गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयात 36 जणांची तपासणी केली. तपासणीत संशयित 8 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. हे नमुने रात्री तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (एनआयव्ही) पाठविण्यात आले. 

गेल्या दोन दिवसांपासून स्वॅब पाठविण्यात आलेल्या 71 रुग्णांपैकी 7 जणांचे अहवाल शनिवारी रात्री, तर रविवारी रात्री 25 अहवाल प्राप्त झाले. उर्वरित 39 अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. 

वृद्धेचा मृत्यू ‘कोरोना’ने नाही

श्वसनाशी संबंधित आजाराने पीडित एका 65 वर्षीय वृद्धेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ती पुण्याहून आल्याने आणि प्राथमिक लक्षणे असल्याने तिला त्या रुग्णालयातील कोरोना कक्षात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला होता. तिचा अहवाल प्रलंबित असल्याने तिच्या मृत्यूबाबत नेमके कारण स्पष्ट झाले नव्हते. शनिवारी रात्री उशिरा या महिलेसह एकूण 7 जणांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. हे सातही अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास टाकला.