पाटगाव (जि. कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा
पाटगाव (ता. भुदरगड) येथे विरार वरून आलेल्या आणखी एका 32 वर्षीय तरुणाचा अहवाल शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणासोबत सहा जणांनी विरारमधून कागलमार्गे गारगोटी असा प्रवास केला आहे. यामध्ये शिवडाव येथील दोन तरुणींचाही समावेश आहे. यापूर्वी गुरुवारी विरार वरून आलेली एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती.
आज, शनिवारी पॉझिटिव्ह आलेला तरुण इतर 5 जणांसोबत विरारहून दि. 14 मे रोजी रात्री निघाला होता. दि.15 रोजी गारगोटी येथील कोरोना सेंटरवर तपासणीसाठी हे सर्वजण आले होते. तेथे गर्दी असल्यामुळे एक दिवस गारगोटी येथे मुक्काम करून दि. 16 रोजी कोरोना सेंटर येथे त्यांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पाटगाव येथे पाठवले होते. त्यापैकी आज एकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या सहाजणांपैकी चारजण पाटगाव येथील असल्याने त्यांना केंद्रीय प्राथमिक शाळा, पाटगाव येथे इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले होते. तर दोघीजणी शिवडाव गावच्या रहिवासी असल्याने तेथे त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केले होते.
पॉझिटिव्हच्या संपर्कात सातजण
पाटगाव येथील चौघांनी खासगी वाहनाने गारगोटी ते पाटगाव असा प्रवास केला आहे. तर शिवडाव येथील तरुणींनी दुसर्या वाहनाने शिवडावपर्यंत प्रवास केला आहे. या प्रवासावेळी आणखी एका तरुणीने त्यांच्यासोबत गारगोटी ते शिवडाव असा प्रवास केला आहे. याबरोबरच त्यांच्या घरातील आणखी एक तरुण या तरुणींच्या संपर्कात आल्याने एकूण सातजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत. या सर्वांची गारगोटी येथे तपासणी होणार आहे. पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाला कोरोनाची कोणतीच लक्षणे अथवा त्रास जाणवत नाही. या सर्वांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केल्यापासून पाटगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी आनंद वर्धन, आरोग्यसेवक कपिलदेव ढोणुकसे, आरोग्य सहायक एस. डी. भोईटे हे आरोग्यविषयक माहिती घेत होते.