Sun, Jul 12, 2020 17:09होमपेज › Kolhapur › ग्रामीण भागात  हृदयविकार रुग्णांची संख्या अधिक

ग्रामीण भागात  हृदयविकार रुग्णांची संख्या अधिक

Published On: Sep 29 2018 1:38AM | Last Updated: Sep 29 2018 12:00AMकोल्हापूर : एकनाथ नाईक 

हृदयरोग होणे अथवा हृदयविकाराचा झटका येऊन अचानक मृत्यू होणे ही बाब एखाद्या विशिष्ट वयानंतर होऊ शकते, असे आता राहिलेले नाही. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास 1 लाख हृदयरुग्णांपैकी वर्षाला 173 नागरिकांचा मृत्यू  होतो. भारतात 34  टक्क्यांनी हृदयरोग्यांची संख्या वाढली असल्याची माहिती सीपीआरचे हृदयरोग विभागप्रमुख अक्षय बाफना यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यात 40 वर्षार्ंच्या वयोगटात याचे प्रमाण 21 तर, 40 वर्षांवरील नागरिकांत 32 टक्के असे प्रमाण आहे. 

व्यसनी नागरिकांत हृदयरोग होण्याची शक्यता अधिक असते. गरजेपेक्षा जास्त खाणे, साखर-मीठ व चरबीयुक्त पदार्थांचे अतिसेवन आणि ताण घेणे ताबडतोब बंद करावे; अन्यथा या सर्व बाबींमुळे हृदयरोगाला निमंत्रण मिळते. ग्रामीण भागात हृदयरोग्यांचे प्रमाण वाढत असल्याचा निष्कर्ष राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील हृदयरोग तज्ज्ञांच्या संशोधनातून पुढे आला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तंबाखू, धूम्रपान, निष्काळजीपणा आणि रुग्णालयात पोहोचण्यास होणारा विलंब होय. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ग्रामीण भागातील 40 टक्के रुग्णांचा मृत्यू होत आहे. 20 ते 30 वयोगटातील तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण 6 टक्क्यांवरून 9.1 टक्क्यांवर पोहोचले आहे.

बदलती जीवनशैली, तंबाखू आणि धूम्रपानाचे सेवन हृदयरोगाचे मुख्य कारण आहे. तरुणांमध्ये तंबाखूचे सेवन करण्याचे प्रमाण वाढले असून, दिवसेंदिवस तरुणही हृदयरोगाचे बळी ठरत आहेत. सकस आहाराचे सेवन नागरिकांनी केले पाहिजे. नियमित व्यायाम हादेखील महत्त्वाचा घटक आहे.
डॉ. अक्षय बाफना, सीपीआरचे हृदयरोग विभागप्रमुख