Mon, Jan 18, 2021 10:17होमपेज › Kolhapur › धक्‍कादायक... 657 शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही

धक्‍कादायक... 657 शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिटच नाही

Published On: Jul 05 2019 1:30AM | Last Updated: Jul 05 2019 12:35AM
कोल्हापूर : प्रवीण मस्के    

जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणार्‍या सुमारे 657 शाळांचे स्ट्रक्?चरल ऑडिट झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात मोठी घटना होऊन विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.  

दोन वर्षांपूर्वी महाड (जि. रायगड) येथील सावित्री नदीवरील बि—टिशकालीन पूल वाहून गेल्याने झालेल्या दुर्घटनेत अनेक निष्पापांचे जीव गेले. या पार्श्‍वभूमीवर त्यावेळी शिक्षण विभागाने परिपत्रक काढले. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांनी अतिवृष्टी, वादळी वार्‍याने शाळा इमारतीचे नुकसान होणार नाही, याची तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी. 

शाळा इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशा सूचना दिल्या होत्या. दि. 4 जुलै रोजी तिवरे धरण (जि. चिपळूण) फुटून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. तर 23 जण वाहून गेले आहेत. यानिमित्ताने पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

 जिल्हा परिषदेच्या सुमारे 1994 प्राथमिक शाळा आहेत. यातील 1300 ते 1400 शाळांचे प्राथमिक टप्प्यातील स्ट्रक्चरल ऑडिट झाले आहे. अद्याप सुमारे 600 शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. सर्वशिक्षा अभियानांतर्गत 232 वर्गखोल्या बांधण्यासाठी निधीची मागणी केली आहे. ‘डीपीडीसी’मधून 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. 5 कोटी रुपये शाळा दुरुस्तीसाठी निधी मिळाला आहे. जिल्ह्यात 688 माध्यमिक शाळा असून यातील बहुतांश खासगी व्यवस्थापनाच्या मालकीच्या असल्याने शिक्षण विभागाकडे त्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती उपलब्ध नाही; परंतु बहुतांश माध्यमिक शाळांचे स्ट्रक्?चरल ऑडिट झालेले नाही. शिक्षण विभागानेही नुकतेच विद्यार्थ्यांच्या जीवितास हानी पोहोचू नये म्हणून संस्थांना पत्र पाठवून दक्षता घेण्याची सूचना केली आहे. 

शहरात महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने 59 शाळा 
चालविल्या जातात. वापरात असणार्‍या शेठ रूईया विद्यालय व शेलाजी वनाजी संघवी विद्यालयाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यातील शेलाजी वनाजी संघवी विद्यालयाची इमारत पाडून ही शाळा दुसर्‍या इमारतीमध्ये चालविली जात आहे. गेल्या वर्षी 27 शाळांची दुरूस्ती करण्यात आली असून यावर्षी 8 शाळांचा दुरूस्तीसाठी प्रस्तावित आहेत. महापालिकेच्या 15 शाळा 30 वर्षाहून अधिक जुन्या आहेत. सृकृतदर्शनी शाळा धोकादायक वाटत नसल्या तरी शाळेच्या इमारती जुन्या आहेत. याबरोबरच शहरात अनुदानित, विनाअनुदानित, खासगी अनुदानित, स्वयंअर्थसहायित अशा सुमारे दोनशेहून अधिक शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांचे स्ट्रक्?चरल ऑडिट झाले नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषद व महापालिका शाळांचे स्ट्रक्चरल ऑडिट नसल्याने विद्यार्थांचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. 

शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा, गगनबावडा या अतिवृष्टी पडणार्‍या तालुक्यांसह इतर ठिकाणच्या प्राथमिक शाळांमधील सुमारे 459 वर्गखोल्या धोकादायक आहेत. याची प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन या वर्गखोल्या दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे.