Thu, Sep 24, 2020 11:16होमपेज › Kolhapur › निपाणी-मुरगूड मार्ग बनला धोकादायक!

निपाणी-मुरगूड मार्ग बनला धोकादायक!

Published On: Feb 27 2018 2:04AM | Last Updated: Feb 27 2018 12:33AMनानीबाई चिखली : भाऊसाहेब सकट

निपाणी - राधानगरी राज्य मार्गावर वाहने सुसाट वेगाने जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अर्जुननगर ते मुरगूड दरम्यानच्या मार्गावर गेल्या एकदीड वर्षात 8 जणांचा बळी गेला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांवर वेग मर्यादेचा आणि  शिस्तीचा बडगा  उगारण्याची गरज निर्माण झाली आहे.

या मार्गावरील कर्नाटक हद्दीतील निपाणी ते लिंगनूर या रस्त्याचे अत्यंत दर्जेदार असे काम रुंदीकरणासह झाले आहे. या ठिकाणी वाहनधारकांचा वेग प्रचंड असतो. निपाणी - राधानगरी राज्यमार्गावर निपाणी बाहेरील राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाण पुलापासून या रस्त्यावर गायकवाडीनजीकचा गतिरोधक वगळता इतरत्र कोठेही गतिरोधक नाहीत. त्यामुळे या रस्त्यावर वाहनांचा वेग कमी होत नाही. अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद कॉलेजसमोर तर अधूनमधून अपघात होतच असतात. याठिकाणी असणार्‍या रस्त्यावर  बालवाडीपासून पदव्यूत्तर शिक्षण घेणार्‍या मुलांची ये - जा सुरू असल्यामुळे मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर गतिरोधक करण्याची मागणीही परिसरातील नागरिकांनी  वेळोवेळी केली आहे, पण अद्याप गतिरोधक केलेले नाहीत.

या रस्त्यावरील श्रीनगरनजीकची बाळूमामा स्वागत कमान, संभाजीनगर व बसवाननगरला जोडणारा एम. डी. विद्यालय चौक, गायकवाडीजवळील नवीन पूल, महाराष्ट्र - कर्नाटक सिमेनजीकचा परिसर, हमिदवाडा कारखाना जुनी व नवीन कमान परिसर, कुरूकली, सुरुपली या ठिकाणी झालेल्या विविध अपघातात 8 जणांना  आपला प्राण गमवावा लागला आहे. काहींना कायमचे अपंगत्वही आलेले आहे. यापूर्वीही  हा रस्ता अरुंद असताना अनेक अपघात झाले आहेत. अनेकांचा बळी अपघातात गेला आहे. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले, पण अपघात कमी होण्याऐवजी वाढतच आहेत.

त्यामुळे सुसाट वेगाने जाणार्‍या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी भरारी पथक नेमावे, अशी मागणी होत आहे. बर्‍याच वेळा पोलिसांच्या समोरूनच वाहने सुसाट वेगाने धावत असल्याचे चित्र पहावयास मिळते. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे वाहनचालकांवर अंकुश राहत नाही.