Sat, Jul 11, 2020 19:49होमपेज › Kolhapur › कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आशीर्वाद द्यावेत

कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी आशीर्वाद द्यावेत

Published On: May 29 2019 2:10AM | Last Updated: May 29 2019 2:10AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

हातकणंगले लोकसभा मतदार संघात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील भाग येतो. खासदार म्हणून या दोन्ही जिल्ह्यातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी आपला मौलिक सल्‍ला, मार्गदर्शन आणि आशीर्वाद द्यावेत, अशी विनंती हातकणंगले लोकसभा मतदार संघातील महायुतीचे खासदार धैर्यशील माने यांनी दै. ‘पुढारी’चे  मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना केली.  खा. माने यांनी मंगळवारी ‘पुढारी’च्या मुख्य कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी दै. ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव उपस्थित होते. 

जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी दै. ‘पुढारी’चे मोठे योगदान आहे. माझ्या खासदारकीच्या विजयात आपले मार्गदर्शन व सल्‍ला महत्त्वाचा आहे. मी ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदेपर्यंत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रश्‍नांची जाण आहे. हे प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी आपला आशीर्वाद महत्त्वाचा आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या विकासासाठी कृती आराखडा करायचा आहे. त्याचे मार्गदर्शन तुम्ही करावे. मतदारसंघातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी मार्गदर्शन करावे, अशी विनंती खा. माने यांनी केली. यावेळी माने यांनी विविध विषयांवर चर्चा केली. 

जिल्ह्यातील प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी दिली. यावेळी दै. ‘पुढारी’चे  व्यवस्थापकीय संपादक डॉ. योगेश जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन धैर्यशील माने यांचा सत्कार केला. दै. ‘पुढारी’चे  संस्थापक डॉ. ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेस धैर्यशील माने यांनी अभिवादन केले. यावेळी समर जाधव, शिवसेना जिल्हा प्रमुख पुंडलिक जाधव, अमरसिंह पाटील, झाकीर भालदार उपस्थित होते.