Thu, Sep 24, 2020 07:31होमपेज › Kolhapur › वाड्या-वस्त्यावर उगवणार विकासाची पहाट!

वाड्या-वस्त्यावर उगवणार विकासाची पहाट!

Published On: Jan 25 2018 8:32PM | Last Updated: Jan 25 2018 9:28PMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील 32 वाड्या-वस्त्यांसाठी उद्याचा 68 वा प्रजासत्ताक दिन वेगळा आनंद घेऊन येणारा ठरणारा आहे. वर्षानुवर्षे पिढ्यान्पिढ्या दिव्याच्या प्रकाशात आयुष्य कंठीत केलेल्या या कुटुंबांमध्ये आजपासून विजेचे बल्ब दिसणार आहेत. 

जिल्हा नियोजन समितीने दिलेल्या चार कोटींच्या निधीतून महावितरणने ही वीज पोहोचवली असून त्याला राधानगरी-भुदरगड मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा पाठपुरावा लाखमोलाचा ठरला आहे.

2011 साली झालेल्या जनगणनेत जिल्ह्यातील 32 वाड्या-वस्त्या नव्याने अस्तित्वात आल्याचे निदर्शनास आले. एकही घर विजेपासून वंचित राहू नये असे धोरण असल्याने या वाड्या-वास्त्यासाठी वीज पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू झाले. यातील 25 वाड्यांपर्यंत विजेचे खांब टाकण्यात आले, उर्वरित 7 वाड्या मात्र वनविभागाच्या कार्यक्षेत्रात असल्याने परवानग्यावरून गेल्या दोन वर्षांपासून वेगळेच त्रांगडे निर्माण झाले होते. 

निधी मंजूर करवून घेण्याला जितका त्रास झाला नाही तितका त्रास वनविभागाच्या परवानगीसाठी झाला. मंत्रालयापर्यंत सातत्याने वार्‍या करून आमदार प्रकाश आबिटकर यांनी याचा पाठपुरावा सुरूच ठेवला. यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांमध्ये जोरदार वादाच्या फैरी झडल्या होत्या. पण, अखेर निधी मंजूर होऊन कामास सुरुवात झाली. 

या सात वाड्यांमध्ये भुदरगडमधील 5 तर राधानगरी व शाहूवाडीतील प्रत्येक एका वाड्याचा समावेश आहे. शाहूवाडीतील नांदारी धनगरवाडा, भुदरगडमधील मेघोली धनगरवाडा, चिक्केवाडी, मानोपे,

खरीवडे धनगरवाडा, वादळे चाफोडी, भैरीचा धनगरवाडा यांचा समावेश आहे. चंदगड तालुक्यातील इब्राहिमपूर धनगरवाडा, कानूर धनगरवाडा, बंद्राळ, नागरगाव. भुदरगड तालुक्यातील वासनोळी धनगरवाडा, कोलवण धनगरवाडा, पाटीलवाडी सोनबाचा वाडा, रमणवाडी धनगरवाडा, सोळांकूर हरिजन वस्ती, हेदवडे धनगरवाडा, नवी वाडी, सावर्डेवाडी, गिरगाव धनगरवाडा, ममदापूर नवीन वस्ती, हंड्याचा वाडा, बेडीव व  येरंडपे धनगरवाडा. राधानगरी तालुक्यातील सावंतवाडी धनगरवाडा, लिंदाडे वस्ती, खोतवाडी म्हासरंग, पाटील वस्ती तळाशी या वाड्या वस्त्या आजपासून विजेच्या प्रकाशात उजळून निघणार आहेत. वर्षानुवर्षाचा अंधार दूर होणार असून विकासाची नवी पहाट ही प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उगवणार आहे.