Thu, Sep 24, 2020 16:11होमपेज › Kolhapur › शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : नारायण राणे

शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी : नारायण राणे

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 1:43AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचे काय योगदान आहे, असा खडा सवाल करत आता पूर्वीची शिवसेना राहिली नाही, सत्तेत राहून शिवसेनेनेच जनतेची फसवणूक केली, स्वत:च्या स्वार्थासाठी मराठी माणसालाच हद्दपार केले, शिवसेना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, तो टक्केवारी घेणारा पक्ष झाला आहे, अशी घणाघाती टीका शुक्रवारी माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी केली.

ऐतिहासिक दसरा चौकात पक्षाची पहिलीच जाहीर सभा झाली. यावेळी पक्षाच्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. लोककल्याणकारी राज्यासाठी आपल्या पक्षाला साथ द्या, असे आवाहन करत राजर्षी शाहूंच्या भूमीत ऊर्जा, प्रेरणा, ताकद मिळाली, ती घेऊन राज्यात पक्षाला सर्वात पुढे नेईन, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

बाळासाहेब बोलले ते केले

मजा म्हणून शिवसेना सोडली नाही, शिवसेना सोडताना खूप वेदना झाल्या, असे सांगत राणे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे जे बोलतील, ते-ते केले, कधीही जीवाची पर्वा केली नाही. उद्या जगू की नाही, हे कधी पाहिले नाही. निष्ठा आणि प्रामाणिकपणामुळेच साहेबांनी जवळ केले. शिवसेनेचा 1966 ला जन्म झाला, त्यावेळी वयाच्या 16 वर्षांपासून एक-दोन नव्हे 39 वर्षे शिवसेनेत राहिलो. शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी पदे साहेबांनी अशीच दिली असतील का? माझे काहीच योगदान नव्हते?

उद्धव हे देवळातील पुजारी
साहेबांना दु:ख दिले म्हणणारे हे उद्धव ठाकरे 1999 पर्यंत कोठे होते, असा सवाल करत उद्धव ठाकरे म्हणजे देवळातला पुजारी आहेत, ते देवाकडेही पाहतात, भक्‍ताकडेही पाहतात. मात्र, त्यांचे लक्ष भक्‍ताकडील पैशाकडेच असते. याखेरीज कशाशीही संबंध नसतो. जो पैसा आणून देईल, तो प्रिय असतो. कोल्हापूर जिल्ह्याने दहापैकी सहा आमदार दिले, त्या जिल्ह्याला एकही मंत्रिपद नाही! मग, मुंबईत सुभाष देसाई कोठून निवडून आले, रामदास कदम कोठून निवडून आले, त्यांचे काय कर्तृत्व? त्यांना मंत्रिपदे आणि ते निष्क्रिय मंत्र्यांच्या यादीत! 

एकदा लाथ मारा
कोल्हापुरात आले, सभा घेतल्या, कोल्हापूरच्या एका तरी प्रश्‍नावर बोलले? एअरपोर्टचा प्रश्‍न आहे, एमआयडीसीचा प्रश्‍न आहे, त्यातील विजेचा प्रश्‍न आहे. थेट पाईपलाईनबाबत काही बोलले? नाही. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी सत्तेला लाथ मारू, असे सांगितले. आता कितीवेळा झाले हे. एकदा लाथ मारा, असे सांगत राणे म्हणाले, सत्तेत आहात, कर्जमाफीचा प्रस्ताव आला होता, त्यावेळी तुमचे रावते होते, देसाई होते, कदम होते त्यांनी का हट्ट धरला नाही. यांचा हट्ट कशासाठी तर महापौर बंगल्यात बाळासाहेबांचे स्मारक करा, ‘मातोश्री’चे दोन मजले वाढवा, यासाठी. खरे तर जिल्ह्या-जिल्ह्यात बाळासाहेबांचे स्मारक व्हायला हवे होते; पण वैयक्‍तिक स्वार्थासाठी शिवसेना आहे. यांचा व्यवसाय काय, तर मुंबई महापालिका. 25 वर्षे यांची सत्ता. मुंबईचे शांघाय, सिंगापूर करणार होते. मात्र, त्यांनी मुंबई भकास केली. मिठी नदीतील गाळ निघाला नाही, तो टक्केवारीत अडकला. टेंडर काढायचे, त्याची टक्केवारी किती घ्यायची, हे माहीत आहे. मुंबईत घरांच्या किमती किती ठेवायच्या, हे यांना माहीत नाही. यामुळे मराठी माणूस मुंबईतून हद्दपार झाला. यांचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचेही राणे यांनी सांगितले.

राणेंची चौकशी करणार, असे वारंवार सांगता, मग घाबरता का? तुमची सत्ता आहे, करा चौकशी असे आव्हान देत राणे म्हणाले, आपण कोणाला घाबरत नाही. पूर्वीपासून व्यवसाय आणि राजकारण करत आलो आहे. 1983 पासून इन्कम टॅक्स भरतोय. लोकांसाठी आंदोलन केले, त्याच्या केसेस आहेत, त्यांना गुन्हेगार ठरवता? उद्धव ठाकरे यांच्या नावावर एक तरी केस आहे का? खोट्या केसेस घालून आम्हाला धमकावता, किती बदनामी कराल? गुन्हेगारीचे एक तरी उदाहरण द्या, असे सांगत तुमच्या कुंडल्या माझ्याकडे आहेत. आता स्वत:ला धुतल्या तांदळासारखे म्हणता तर एकदा होऊ जाऊ दे. बाळासाहेबांना सर्वाधिक दु:ख उद्धवनीच दिले. ‘मातोश्री’त काय काय झाले हे देखील एकदा बाहेर येईल, ती वेळ उद्धवनीच आणली आहे, असेही राणे यांनी सांगितले.

काँग्रेसवर टीका
यांनीच उभे करायचे आणि यांनीच पाडायचे. विलासराव देशमुख यांना मुख्यमंत्री म्हणून बदलण्याची वेळ आली, त्यावेळी तीन नावे पुढे आली. आपण, अशोक चव्हाण आणि राधाकृष्ण विखे-पाटील. सर्वाधिक आमदारांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. नावही जाहीर होणार होते. काहींनी शुभेच्छाही दिल्या; पण नंतर अशोक चव्हाणांचे नाव जाहीर झाले. आपल्याला पुढच्या वेळी नक्‍की विचार करू, असे सांगितले. असे काँग्रेसने एकवेळा नव्हे तर तीनवेळा फसवले, इतकी मानहानी झाल्यानंतरही सारे सहन कसे करायचे? असे सांगत लोककल्याणासाठी सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी नव्या पक्षाला जन्म द्यावा लागला, असेही राणे यांनी सांगितले. हा पक्ष तुमचा आहे. शब्द पडू न देणारा मी आजपर्यंत ते पाळतही आलो आणि भविष्यातही पाळणार आहे. यामुळे या राज्यातील जनतेला सुखी आणि समाधानी करण्यासाठी या पक्षाला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

मराठा आरक्षण कोणी रोखू शकणार नाही
ज्या समाजात जन्माला आलो, त्या समाजाला न्याय देण्याची संधी मिळाली. मराठा आरक्षणासाठी 17 लाख कुटुंबांचा सर्व्हे केला. नियमात बसवून, सरकारला अहवाल दिला. त्यावेळी कॅबिनेटमधील 96 कुळी असणार्‍यांनी साथ दिली नाही, उलट विरोधच केला; पण आरक्षणासाठी एकजूट झाली आहे. यामुळे मराठा आरक्षण कोणी रोखू शकणार नाही, असेही राणे यांनी सांगितले.

वाचा :
जिल्ह्यातील शिवसेना झीरो करणार : नारायण राणे