Wed, Aug 12, 2020 21:50होमपेज › Kolhapur › नमस्‍कार मंडळी : आबा घंगाळ वाजीव की..!

नमस्‍कार मंडळी : आबा घंगाळ वाजीव की..!

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:01AMलेखन : मधुकर भोसले, मारुती  घाटगे, विनायक सातुसे, पवन मोहिते, प्रवीण ढोणे

आबा घंगाळ वाजीव की..!

विनोदी किस्से कधी व कसे घडतील याचा काही नेमच नसतो. असाच एक मँचेस्टर नगरीमधील मुलीचा किस्सा हसून- हसून लोळवायला लावणाराच ठरला. मँचेस्टर नगरीतील मुलगीचे लग्न राधेच्या नगरीतील मुलाबरोबर वर्षभरापूर्वी झालं. बिचारी तिथल्या सवयीची. यंत्रमागाचा खडखडाट कानावर पडल्याशिवाय या मंडळींना झोपच लागत नाही. पण या विवाहितेने ग्रामीण शांत वातावरण उशिरा का असेना जुळवून घेतलं. ही विवाहिता बाळंतपणासाठी माहेरी म्हणजे मँचेस्टर नगरीमध्ये गेली. गोंडस मुलगा झाला. घरात आनंदीआनंद झाला. नियमाप्रमाणे सहाव्या महिन्यात बाळासह बाळंतीणीला गावाकडं आणलं. बाळालाही जणू मँचेस्टर नगरीतील यंत्राच्या खडखडाटाची सवय लागली होती. नुसतं रडून, रडून बाळानं घरदार डोक्यावर घेतलं. डॉक्टरांना दाखविलं, देवऋषी झालं, उतारंही टाकलं पण रडं काय थांबेना. शेवटी शेजारचं पिंट्या म्हणालं,‘ ये आबा, जरा घंगाळ वाजीव लाटणं घेऊन.’ आबानंही तसं केलं. घंगाळ वाजल तसं बाळ शांत झालं. आता आबा रोजच घंगाळ वाजीवतोय.

पण पोरगी कोण देतंय...?

महाराष्ट्र शासनाने डी. एड्.  झालेल्या उमेदवारांची पुन्हा (शिक्षक पात्रता परीक्षा) ‘टीइटी’ परीक्षा घेतली. शिक्षक पदाचा दोन वर्षाचा कोर्स पूर्ण केल्यानंतरही पात्र होऊन नोकरीच्या अमिषाने राज्यभरातून या परीक्षेसाठी लाखो डी. एड्. पदवीधारक बसले होते. कागल तालुक्याच्या एका गावातला तरुण परीक्षा देण्यासाठी गेला होता. त्याला तिथे जुने मित्र भेटले. काही जुन्या आठवणींना उजाळा दिलाच पण आताची डी. एड्. पदवीधरांना शिक्षकांची स्थिती आणि अवस्था याबद्दल मात्र खूप चर्चा रंगली. कोण शेती काम करतोय तर कोण कंपनीमध्ये आहे, तर कोण अजून शिक्षक भरती कधी निघेल याची वाट बघत आहे. तर मित्रांनी विचारलं, ‘मग आत्ता काय चालू आहे. काय करतोस?’  तेव्हा तो मोठ्या रागाने बोलला, ‘डी. एड्. केलं तितंच चुकलो. अजून किती दिवस सरकारी नोकरी मिळणार याची वाट बघायची ..? आता लगीन करुन मोकळं व्हायचं म्हणतोय पण पोरगी कोण देतंय कामावर नसल्यावर.’ असं बोलताच त्याच्या इतर मित्र मैत्रिणींनी अगदी मनातलं बोलला असं म्हणत निरुत्तरीत नजरेनं एकमेकांकडे पाहत होकारार्थी मान हलवली. 

मी ‘गंडीव फशीव’ संघटनेचा अध्यक्ष होतो

शुक्रवार दुपारची वेळ, जिल्हाधिकारी कार्यालयात एक नागरिक दुसर्‍याची वाट बघत होता. वारंवार तो फोन करून तो संबंधिताला कधी येणार विचारत होता. समोरून वेगळी उत्तरे ऐकायला मिळत होती. भेटायला येणारा मनुष्य मी पावसात अडकल्याचे सांगत होता. त्याला मध्येच थांबवत अशानच कोल्हापुरातला पाऊस पळाला, असे वाट बघणार्‍याने सुनावले. एवढ्यावरच न थांबता तो म्हणाला, ‘मी 2000 ते 2010 हेच काम केलंय. गंडीव फशीव संघटनेचा अध्यक्ष होतो.’ त्याचे हे उत्तर मात्र जवळच्यांना हास्यकल्लोळात घेऊन गेले.

गळतं कोटाचं अन् ताजमहालाचं..!

हमीदवाडा परिसरातील एका मुख्य रस्त्याने प्रवास करत असताना जोरदार पाऊस आल्याने विनाकोट असणारे चार - पाच मोटारसायकलस्वार एका झाडाच्या आडोशाला थांबले. त्यांच्यात पाऊसपाण्याच्या गप्पा रंगलेल्या असतानाच रेनकोटने पॅक असणारा एक मोटारसायकलस्वार येऊन थांबला. त्याच्याकडे पाहत अगोदर आलेल्या विना रेनकोटवाल्या एका मोटारसायकलस्वाराने प्रश्‍न केला ‘पाव्हणं रेनकोट बी हाय, आणि थांबलासा का?’ यावर तो कोटवाला म्हणाला, ‘काय करायचं, यंदा भारीतला 1200 रुपयांचा कोट आणलाय तरी बी गळतं हायच म्हणून जरा जोरात पाऊस बघूनच थांबुया म्हटलं.’ यावर तेथे उपस्थित एक विनाकोटवाला म्हणाला, ‘पाव्हणं तुमचं म्हणणं बरोबर हाय. रेनकोट कितीबी भारीतला घ्या, तो गळतोयच. गळतं कोटाचं असू दे न्हायतर ताजमहालाचं ते काय निघत नाही बघा..!’ या खुमासदार विश्‍लेषणावर तिथे हशा पिकला व सर्वांनीच होकारार्थी माना डोलावत त्याच्या सुरात सूर मिसळला.

पेढा, बासुंदी कर पण जरा लवकर...

दूध दरवाढीच्या संपामुळे ग्रामीण भागातील दूध संकलन थांबले होते. दूधउत्पादकांच्यात गंभीर प्रश्‍न हा निर्माण झाला की, एवढ्या दुधाचं करायचं काय? संप काळातील वातावरणाने आठवडाभर तरी संप मिटणार नाही असं चिन्ह होतं. कागल तालुक्याच्या पश्‍चिम सीमेवरील एका संवेदनशील गावातील महिलेनं आपल्या धन्याला विचारलं. ‘दुधाचे  पेढे करू की बासुंदी...?’ 

एरवी घरात कमी पडलं तर चालेल पण जास्तीतजास्त दूध डेअरीला घालणारी ती गृहिणी चक्क पेढे करू की, बासुंदी हे विचारत होती. या बोलण्यावरून धनी मात्र आवाक झाला आणि मान डोलवत म्हणाला,  ‘तुला जे काही करायचं ते कर, पण संप मिटण्याआधी कर; नाहीतर पुढच्या संपाची वाट बगाय लावशील?’ यावर ऐकणार्‍यांच्यात एकच खसखस पिकली.

पाव्हणं आमच्या आडवं का येता?

आगामी होणार्‍या  आमदारकीच्या निवडणुकीसाठी इच्छुक असलेले राधानगरीतील दूधगंगा काठावरील एक नेते निवडणूकपूर्व फेरफटका चाचपणी करण्यासाठी भागातून फिरत होते. त्यावेळी अचानक समोरून भुदरगड तालुक्यातील कार्यकर्ता समोरून येताना दिसला. त्याला पाहून नेते म्हणाले, ‘अहो भुदरगडवाले पाव्हणं तुम्ही आमच्या आडवं सारखं सारखं का येता?’ त्यावर  क्षणाचाही विलंब न करता  म्हणाला, ‘साहेब  आमी तुमच्या आडवं न्हवं मागंच उभं  हाय!’ असं म्हणताच नेत्यासह कार्यकर्त्यांमध्ये हास्याचा मोठा धमाका उडाला...