Mon, Jan 25, 2021 15:21होमपेज › Kolhapur › रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे 

रायगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी खा. संभाजीराजे 

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:44AM

बुकमार्क करा

नागपुर : प्रतिनिधी

नागपुर येथे किल्ले रायगड प्राधिकरणाची घोषणा आज करण्यात आली असून त्याच्या अध्यक्षपदी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची निवड महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या दुर्गराज रायगडाचे संवर्धन करण्यासाठी आता शासनाच्यावतीने रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. रायगड संवर्धन जगातील दुर्ग अभ्यासकांसाठी एक आदर्श ठरावा आणि त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खा. संभाजीराजे छत्रपती यांची प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. खा. संभाजीराजे यांनीच 6 जून रोजी दुर्गराज रायगडावर शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेक सोहळा भव्य प्रमाणात साजरा करण्यास सुरूवात केली. या सोहळयाची मुहुर्तमेढ रोवल्यानंतरच काही वर्षात हा सोहळा लोकोत्सव बनला आणि पुढे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील शिवभक्तांच्या उपस्थितीमुळे ‘राष्ट्रीय सणा’कडे मजल मारू लागला. 2005 पासून हा सोहळा भव्य प्रमाणात साजरा होत असून, या माध्यमातूनच खा. संभाजीराजे यांनी रायगड किल्ल्याचे जतन व संवर्धन करण्याची मागणी सरकारकडे केली होती. याच पाश्र्वभूमीवर रायगडावर 2016 च्या शिवराज्याभिषेक सोहळयास मा.मुख्यमंत्री उपस्थित असताना त्यांनी रायगड व परिसर संवर्धनासाठी 600 कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली होती.

शिवछत्रपतींच्या विचारांचे वारसदार असलेल्या खा.संभाजीराजे छत्रपती यांचा दुर्गराज रायगड व शिवराज्याभिषेक सोहळा हा अत्यंत जवळचा विषय आहे. त्यांनी आजवर गडकिल्ल्यांच्या जतन, संवर्धनासाठी सर्वसमावेषक गोष्टींचा विचार करून रायगडाबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा व भुदरगड किल्ल्यांसाठी 10 कोटीचा विशेष निधी मंजूर करून आणला त्‍यामुळे या किल्‍ल्‍यांच्या संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. गड किल्ले जतन, संवर्धन व संरक्षण ही आता आपली सर्वांची जबाबदारी आहे या विचाराने पुढाकार घेऊन गड किल्ले संवर्धनाचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर झाल्यानंतर संभाजीराजे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातील शिवरायांच्या 103 गडकोटांवर एकाच दिवशी स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते.

आजवर रायगडावर 6 जून रोजी साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा, रिकाम्या मेघडंबरीत शिवछत्रपतींची शिवभक्तांच्या पाठिंब्यावर बसवलेली शिवमूर्ती तसेच युनेस्को या जागतिक वारसा जतन व संवर्धन संस्थेच्या पदाधिका- यांना कोल्हापूरात आमंत्रित करून महाराष्ट्रातील शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश युनेस्कोच्या यादीत व्हावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. राज्यसभेतही त्यांनी शिवछत्रपतींच्या गडकोटांचा समावेश जागतिक वारसा यादीत व्हावा यासाठी आवाज उठविला आहे.  

पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी खासदार संभाजीराजे आग्रही आहेत. यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पाच किल्ल्यांचे संवर्धन करून नव्या पिढीला प्रेरणा देण्यासाठी संभाजीराजे यांनी पुढाकार घेतला आहे. रायगडाचे जतन व संवर्धन योग्य प्रकारे कसे व्हावे यासाठी 6 जून 2017 च्या शिवराज्याभिषेक सोहळयाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 5 जून रोजी त्यांनी संवर्धनाबाबत देशातील तज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थितीत तसेच शिवभक्तांचे विचार व सुचनांच्या आधारे ‘संवर्धन रायगडाचे,मत शिवभक्तांचे’ हा परिसंवाद आयोजित केला होता. महाराष्ट्रात 350 हून अधिक गड, सागरी किल्ले आहेत त्यात विशेष महत्व सिंधूदुर्ग किल्ल्याला आहे. हा किल्ला स्वत: शिवरायांनी बांधला असून, त्यानंतर त्या किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले शिवरायांचे मंदिर, त्या मंदिरा समोरील राजर्षि शाहु महाराज यांनी बांधलेला सभा मंडप, किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवरायांच्या पायाचा व हाताचा ठसा अशा अनेक गोष्टींमुळे या किल्ल्याला विशेष महत्व आहे. या किल्ल्याचे व शिवराजेश्वर मंदिराचे जतन, संवर्धन होण्यासठी हा सिंधूदुर्ग किल्ला ही संभाजीराजेंनी विशेष प्रयत्न करून रायगड प्राधिकरणात सामाविष्ट करून घेतला आहे.  

                या सोहळयासाठी देशभरातून येणा-या शिवभक्तांसह इतिहास अभ्यासक,संशोधकांची संख्या पाहून गतवर्षी रायगडाच्या संवर्धनासाठी हा निधी जाहीर झाला. रायगडाच्या संवर्धनाचे काम व्हावे ही सर्व शिवभक्तांची तीव्र इच्छा होती. शिवभक्तांच्या इच्छेनुसार केंद्राच्या पुरातत्व विभागाने नियम शिथिल करून या निधीस परवानगी दिली. रायगडाचे संवर्धन योग्य प्रकारे होण्यासाठी तसेच पर्यटनाच्या दॄष्टीने जगाच्या नकाशावर रायगड येण्यासाठी शासनाच्या वतीने रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

भारताचा मानबिंदू व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या रायगडाचे संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे रायगड विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे सोपविण्यात आली असून सर्व शिवभक्तांच्या वतीने मी ही जबाबदारी स्विकारत आहे. रायगड हा आपल्या सर्वांचा असून रायगडाच्या संवर्धन कार्यात प्रत्येक शिवभक्तांचे योगदान मह्त्वाचे आहे अशी प्रतिक्रीया खासदार  संभाजीराजे छत्रपती यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

या समितीमध्ये रायगड जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, कोकण आयुक्त श्री. जगदीश पाटील, प्रिंसिपल सेक्रेटरी टुरिझम आणि कल्चर श्री. नितीन गद्रे, माजी कोकण आयुक्त श्री. प्रभाकर देशमुख, ए. एस.आय.  रिजनल जनरल डॉ. एम. नंबीराजन, ए. एस. आय.  डिरेक्टर जनरल डॉ. उषा शर्मा, मॅनेजिंग डिरेक्टर एम. टी. डी. सी.  विजय वाघमारे, कार्यकारी अधिकारी जि. प. रायगड श्री. अभय यावलकर,ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास संशोधक श्री.पांडुरंग बलकवडे, दुर्ग अभ्यासक श्री. भगवान चिले, श्री. रघूजी आंग्रे,इतिहास अभ्यासक श्री. राम यादव, श्री. सुधीर थोरात  आदींचा सामावेश करण्यात आला आहे.

­­