Fri, Feb 28, 2020 23:32होमपेज › Kolhapur › मोबाईल चोरट्यांचा ‘गृहप्रवेश’

मोबाईल चोरट्यांचा ‘गृहप्रवेश’

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 28 2017 11:41PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : गौरव डोंगरे

सुट्टीच्या दिवसांत घरफोडीच्या घटना घडत असताना थेट घरात घुसून मोबाईल, लॅपटॉप चोरीच्या घटना वाढल्या आहेत. उघड्या दरवाजातून, खिडकीतून महागडे मोबाईल लंपास होण्याच्या गुन्ह्यांची नोंद शहरातील सर्वच पोलिस ठाण्यांकडे झाली आहे. या प्रकारातून चोरट्यांचा झालेला ‘गृहप्रवेश‘ नागरिकांची चिंता वाढविणारा आहे. 

ताराबाई पार्क, सम्राटनगर, टाकाळा परिसर, राजारामपुरी, न्यू पॅलेस परिसर आदी परिसरात अनेक प्रशस्त बंगले आहेत. अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नाहीत. सकाळी अनेकजण मॉर्निर्ंंगवॉकला बाहेर जातात. याचवेळात घराचा दरवाजा उघडा असताना घरात प्रवेश करून किमती ऐवजांवर डल्‍ला मारला जातो. दोन महिन्यांपूर्वी नागाळा पार्क परिसरात अशाप्रकारे चोरी करण्यात आली होती. 

पंधरवड्यात चार घटना

ताराबाई पार्कातील सुर्वे कॉलनीत राहणारे अरुण पळणीटकर यांच्या घरात 23 डिसेेंबरला दुपारच्या वेळेत चोरट्याने प्रवेश करून 10 हजारांचा मोबाईल पळवला. 13 डिसेंबरला सायबर चौकातील अंबाई डिफेन्समध्ये राहणारे अभिषेक पुरोहित यांच्या घराच्या उघड्या दरवाजातून येऊन अज्ञाताने 55 हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल चोरून नेला. कसबा बावड्यातील हॉटेलमधून निखील पुरंदरे यांचा 50 हजार रुपयांचा मोबाईल चोरीस गेला. तर ताराबाई पार्कातील सुलोचना पार्कातील कार्यालयातून भरदुपारी 2 च्या सुमारास लॅपटॉप लंपास करण्यात आला. 

कारटेप चोरट्यांचा सुळसुळाट
अपार्टमेंटच्या पार्किंगमधील मोटारी देखील चोरट्यांचे लक्ष्य झाल्या आहेत. 15 डिसेंबरच्या मध्यरात्री चोरट्यांनी ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, पाच बंगला परिसर, न्यू पॅलेस परिसर, महावीर कॉलेज, सोमवार पेठेतील पार्किंगमधील मोटारीत असणारे कारटेप व किमती साहित्य चोरून नेले. एका रात्रीत 4 ते 5 लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

नागरिकांत घबराट
दिवाळीच्या सुट्टीत गावी जाणार्‍या नागरिकांचे फ्लॅट, घरे फोडण्याचे प्रकार घडतात. पण भरदिवसा घरात प्रवेश करुन झालेल्या या चोर्‍यांनी नागरिकांची चिंता वाढविली आहे. महिन्याभरापूर्वी पाचगावातील वृद्ध दाम्पत्याला घरात घुसून धमकावून 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास करण्यात आले होते. यातील सर्व संशयितांना पोलिसांनी पकडले. मात्र, अशा घटनांनी नागरिकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सीसीटीव्हींची आवश्यकता
शहरातील अनेक कॉलनी, गल्ल्या, अपार्टमेंटमध्ये अद्याप सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. वाढत्या चोर्‍यांमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. अशावेळी सीसीटीव्हीद्वारे पोलिस तपासाला गती मिळते. वर्गणीतून आपापल्या परिसरात सीसीटीव्ही बसविणे शक्य असल्याने नागरिकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.