Sun, Jul 05, 2020 16:10होमपेज › Kolhapur › ऑनलाईन लग्‍नघटिकेसाठी ‘डिटेक्टिव्ह’चा आधार!

ऑनलाईन लग्‍नघटिकेसाठी ‘डिटेक्टिव्ह’चा आधार!

Published On: Dec 08 2017 1:37AM | Last Updated: Dec 08 2017 1:37AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पूनम देशमुख

चहा - कांदापोह्यांचा कार्यक्रम झाला. मुलगा - मुलगी एकमेकांस पसंत पडली की उडवा लग्‍नाचा बार, म्हणजेच चट मंगनी पट ब्याह अशी सर्वसाधारण लग्‍न सोहळ्याचं स्वरूप. पण सध्या लग्‍नाचा ट्रेंड बदलत चाललाय.  पूर्वी मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यामार्फत लग्‍न ठरवली जात. बदलत्या काळानुसार मॅरेज ब्युरोचा आधार घ्यावा लागला आणि सध्या तर  मॅट्रोमोनी साईटस्वरूनही लग्‍न ठरवली जात आहेत. 

मात्र, अशा पद्धतीने लग्‍न ठरवताना समोर व्यक्‍तीबाबत खरीखुरी माहिती उपलब्ध होईल याविषयी शंका असते. यामुळे सध्या लग्‍नाच्या बाजारात आता ‘मॅरेज डिटेक्टिव्ह’चा ट्रेंड  वाढू लागलाय. याअंतर्गत मुलगा अथवा मुलगीची ‘डिटेल’ माहिती घेऊनच होकार कळवला जातोय. जेणेकरून लग्‍नानंतर कसलीही फसगत व्हायला नको. कुणासाठी स्थळ सुचवायचे दिवस आता जवळ - जवळ शहरात तरी राहिलेले नाहीत. 

सध्या लग्‍न जमवण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली जाते. एका क्‍लिकवर हजारो स्थळे डोळ्यांसमोर येतात, अनेकदा प्रत्यक्ष कुणी कोणाला पाहिलेलं नसते. सुरुवातीस काल्पनिक वाटावेसे सर्व काही असते. प्रोफाईलला दिलेली माहिती खरी आहे. याची शाश्‍वती कोण देणार? ऑनलाईन लग्‍न जमवणे आणि ऑनलाईन शॉपिंग यात मोठा फरक आहे. भावी वधू अथवा वराने ऑनलाईन शेअर केलेली माहितीची खातरजमा करण्यासाठी मग आता ‘डिटेक्टिव्ह’ ची मदत घेतली जाऊ लागली आहे. कॅरॅक्टर, जॉब प्रोफाईल, फॅमिली मेंबर्स, स्थावर मालमत्ता आदींची खडा न् खडा माहिती मिळाल्यानंतर ऑनलाईन वर अथवा वधू परीक्षणाला ‘ग्रीन सिग्‍नल’ मिळतोय. डिटेक्टिव्ह नेमताना आणखी एक सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कारण तोतया ‘मॅरेज डिटेक्टिव्ह’ चा सुळसुळाट  झालाय. त्यामुळे लग्‍न जमवताना पारखून लग्‍नगाठ पक्‍की करा, आणि सावध राहूनच शुभमंगल उरकून टाका.