कोल्हापूर : प्रतिनिधी
मराठा भवन उभारण्यासाठी सर्वस्थरातून मिळत असलेला उत्स्फूर्त पाठिंबा लक्षात घेता, दीड ते दोन एकर खासगी जागा खरेदी करून येत्या वर्षभरात कोल्हापूर शहरात मराठा भवन साकारण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. तसेच या भवनसाठी शहरातील इतर पेठापेठांमधून बैठका घेऊन निधी संकलन करण्याचे यावेळी ठरविण्यात आले.
मराठा स्वराज्य भवन ट्रस्ट उभारणीसाठी लागणार्या निधीबाबत चर्चा करण्यासाठी शिवाजी मंदिरात बैठक झाली. या बैठकीला पेठेतील सर्व मंडळांचे पदाधिकारी व प्रमुख नागरिक उपस्थित होते. ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव मुळीक म्हणाले, मराठा भवन उभा करण्यासाठी पाच ते सहा एकर जागेची आवश्यकता आहे. त्यासाठी सरकारकडून जागा मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण शासनाने सरकारी जागा न देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे जागा मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. तरीही मराठा भवन हे शिव-शाहू विचारांचे असेल. या भवनात दोन हजार लोक बसू शकतील, असे सभागृह, मुलांसाठी वसतिगृह, सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका अशा प्रकारे शैक्षणिक संकुल असेल. यासाठी पाच ते सहा एकर जागेची आवश्यकता आहे. ही जागा मिळविण्यासाठी शासनाकडे परिपूर्ण असा प्रस्ताव पाठविला आहे. भवन उभारण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, उद्योजक, वकील, डॉक्टर्स निधी देण्यासाठी तयार आहेत.
शासनाने सरकारी जमीन खासगी ट्रस्ट किंवा अन्य कारणासाठी न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकारी जागेवर अवलंबून न राहता प्रसंगी खासगी व्यक्तीकडून दीड ते दोन एकर जागा खरेदी करू आणि मराठा भवन उभा करू. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, निधी जमविण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. त्यासाठी नियोजन करा आणि कोल्हापूर शहरातील पेठापेठांमधून बैठका घेऊन पेठांतील मंडळांच्या अध्यक्षांना निधी संकलन करण्याची जबाबदारी द्यावी. घरोघरी जाऊन निधी संकलन करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. मराठा भवनसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही निधी मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.
यावेळी सुजित चव्हाण, इंद्रजित माने, विलास पोवार, उदय जाधव यांची भाषणे झाली. स्वागत नीलेश साळोखे, प्रास्ताविक विकास जाधव यांनी केले. या बैठकीला डॉ. संदीप पाटील, अजित खराडे, शिवाजी जाधव, लालासाहेब गायकवाड यांच्यासह अन्य प्रमुख मान्यवर उपस्थित होते.