Thu, Jan 21, 2021 00:16होमपेज › Kolhapur › पुरात घरांची पडझड पाहून कुरूंदवाडवासीयांना अश्रू अनावर

पुरात घरांची पडझड पाहून कुरूंदवाडवासीयांना अश्रू अनावर

Published On: Aug 14 2019 4:27PM | Last Updated: Aug 14 2019 4:25PM
कुरुंदवाड : प्रतिनिधी 

कुरूंदवाड शहरातील व्हॅडा भाग, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व गोठणपूर परिसर वगळता शहरातील पुराचे पाणी ओसरले आहे. पुराचे पाणी ओसरेल तसे अनेकांच्या घराची पडझड झालेली पाहून, अश्रू अनावर होत आहेत. बाजारपेठेतील धान्य दुकानात पाणी शिरल्याने कुजलेल्या धान्याचा उग्र वास सुटला आहे, तर मुख्य रस्त्यावर घाण साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.

दरम्यान मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांना शहरातील स्वच्छता करण्याच्या कामाला लावले असून, कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.

येथील मोमीन गल्ली शिवतीर्थ गोठणपूर, ढेपणपूर परिसर, दलित वस्ती हे परिसर वगळता शहरातील पुराचे पाणी ओसरले आहे. बागवान गल्ली, बाजारपेठ, पोलिस स्टेशन रस्ता, जुने बस स्थानक रस्त्यावर पुराचे पाणी ओसरल्यानंतर पाण्याबरोबर आलेली घाण रस्त्यावर तुंबून राहिली आहे, तर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने कुजलेल्या धान्याचा उग्र वास सुटला आहे.

काही स्वयंसेवी संस्थे बरोबरच पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शहर स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा गतिमान केली आहे. जेसीबीच्या साहाय्याने कचरा उठाव केला जात आहे. पूर ओसरेल तसे घरांची झालेली पडझड आणि नुकसान नजरेसमोर येत आहे. अनेक नागरिकांच्या घराची पडझड झाली आहे. प्रापंचिक साहित्य वाहून गेले आहे. पडझड झालेली घरे पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत.