Wed, Sep 23, 2020 22:59होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : काँग्रेससमोर ‘भोपळा’ फोडण्याचे आव्हान

कोल्हापूर : काँग्रेससमोर ‘भोपळा’ फोडण्याचे आव्हान

Published On: Sep 27 2019 9:00AM | Last Updated: Sep 27 2019 9:00AM
कोल्हापूर : सतीश सरीकर 

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याने सर्वांच्या नजरा पक्षीय उमेदवारीकडे लागल्या आहेत. पक्षीय पातळीवर लीड घेऊन काँग्रेसने पहिल्यांदा इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. लवकरच उमेदवारांची नावेही जाहीर होतील; पण गटबाजी, अंतर्गत दुफळी व पाडापाडीच्या राजकारणाने काँग्रेसला ग्रासले आहे. परिणामी, 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा एकही उमेदवार आमदार झाला नाही. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेससमोर ‘भोपळा’ फोडण्याचे आव्हान आहे. 

सहकाराचे जाळे पसरलेल्या संपूर्ण जिल्ह्यावर काँग्रेसची सत्ता होती. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसला समांतर सत्ताधारी पक्ष निर्माण झाला. दोन्ही पक्षांत सत्ता विभागली गेली. परंतु, अंतर्गत राजकारणामुळे काँग्रेसची वाताहत होत गेली. एकेकाळी दहा आमदार असलेल्या काँग्रेसचा सद्यस्थितीत एकही विधानसभेचा आमदार नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील हे एकमेव विधान परिषदेचे आमदार आहेत. परिणामी, जिल्ह्यातील एकही विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात नाही. राष्ट्रवादीचे मात्र कागल व चंदगड विधानसभा मतदासंघात अनुक्रमे हसन मुश्रीफ व संध्यादेवी कुपेकर हे आमदार आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी होणार आहे. त्यांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी सहा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे राहणार आहेत. यात कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ मतदारसंघांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडे कागल, चंदगड, राधानगरी, पन्हाळा हे मतदारसंघ राहतील. इचलकरंजीतून गेल्यावेळी काँग्रेसमधून प्रकाश आवाडे लढले होते. मात्र, यंदा आवाडे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्याने या ठिकाणी नवख्या उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्या उमेदवाराची ताकद कितपत पुरेल हे 24 ऑक्टोेबरलाच कळेल. सा. रे. पाटील यांच्या निधनानंतर हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला असून, उल्हास पाटील आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीपैकी कुणालाही उमेदवारी मिळाली तरी या मतदारसंघात बंडखोरी ठरलेली आहे. परिणामी, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होणार हे निश्‍चित आहे. 

कोल्हापूर शहर हे 1985 पासून शिवसेनेचा  बालेकिल्‍ला झाले आहे. 2004 मध्ये मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमधून लढून येथे विजय मिळविला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्याविरुद्ध लढण्यासाठी तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने विधान परिषद आमदारांना विधानसभेत उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याने कोल्हापूर दक्षिण या सतेज पाटील यांच्या मतदारसंघातून ऋतुराज रिंगणात उतरणार आहेत. परिणामी, कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काँग्रेसकडे सद्यस्थितीत सक्षम उमेदवार नसल्याचे चित्र आहे. 

काँग्रेसचा झेंडा फडकावण्याची भिस्त कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगलेवर...

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ स्थापन झाल्यानंतर सतेज पाटील यांनी नेतृत्व केले होते. 2014 मध्ये भाजपकडून लढून अमल महाडिक यांनी तत्कालीन गृह राज्यमंत्री पाटील यांचा पराभव केला होता. आता पाटील यांचे पुतणे ऋतुराज काँग्रेसकडून रिंगणात उतरणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाची लढत हाय व्होल्टेज होणार हे निश्‍चित आहे. करवीर मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील लढणार आहेत. पाटील यांनी प्रचारही सुरू केला आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके यांच्याकडून पाटील यांचा अवघ्या 710 मतांनी पराभव झाला होता. नरके यांची हॅट्ट्रिक मोडून गेल्यावेळी चुकलेला विजयाचा गुलाल पाटील पुन्हा उधळणार हे निकालादिवशी स्पष्ट होईल. हातकणंगले मतदारसंघाचे नेतृत्व काँग्रेसचे माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी पाचवेळा केले आहे. परंतु, गेली दहा वर्षे या ठिकाणी आता शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर आमदार आहेत. डॉ. मिणचेकर यांची हॅट्ट्रिक रोखून आवळे यांचे चिरंजीव राजू आवळे हा मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे घेणार का? हे लवकरच कळेल. जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्यासाठी सद्यस्थितीत या तीन मतदारसंघांवर काँग्रेसची भिस्त आहे. 

1980 च्या विधानसभेत काँग्रेसचे बारापैकी दहा आमदार जिल्ह्यातून निवडून गेले होते. यात कल्‍लाप्पाण्णा आवाडे (इचलकरंजी), जयवंतराव आवळे (वडगाव), बाबासाहेब पाटील (शाहूवाडी), श्रीपतराव बोंद्रे (सांगरूळ), हरिभाऊ कडव (राधानगरी), लालासाहेब यादव (कोल्हापूर), दिग्विजय खानविलकर (करवीर), विक्रमसिंह घाटगे (कागल), शिवलिंग घाळी (गडहिंग्लज), व्ही. के. चव्हाण-पाटील (चंदगड). 1985 विधानसभा - सरोजिनी खंजिरे (शिरोळ), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), जयवंतराव आवळे (वडगाव), यशवंत एकनाथ पाटील (पन्हाळा), दिग्विजय खानविलकर (करवीर), व्ही. के. चव्हाण-पाटील (चंदगड). 1990 विधानसभा - रत्नाप्पाण्णा कुंभार (शिरोळ), जयवंतराव आवळे (वडगाव), यशवंत एकनाथ पाटील (पन्हाळा), श्रीपतराव बोंद्रे (सांगरूळ), दिग्विजय खानविलकर (करवीर), सदाशिवराव मंडलिक (कागल), नरसिंग गुरुनाथ पाटील (चंदगड). 

1995 च्या विधानसभेत काँग्रेसमधून रत्नाप्पाण्णा कुंभार (शिरोळ), कल्‍लाप्पाण्णा आवाडे (इचलकरंजी), जयवंतराव आवळे (वडगाव), यशवंत एकनाथ पाटील (पन्हाळा), दिग्विजय खानविलकर (करवीर), सदाशिवराव मंडलिक (कागल), बाबा कुपेकर (गडहिंग्लज) विजयी झाले होते. बारापैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. 1999 मध्ये सा. रे. पाटील (शिरोळ), प्रकाश आवाडे (इचलकरंजी), जयवंतराव आवळे (वडगाव), संजयसिंह गायकवाड (शाहूवाडी), बजरंग देसाई (राधानगरी). 2004 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे तिघे निवडणूक आले. यात मालोजीराजे छत्रपती (कोल्हापूर शहर), पी. एन. पाटील (सांगरूळ), प्रकाश आवाडे (इचलकरंजी). 2009 मध्ये विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना झाली. त्यांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात बाराऐवजी दहा विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आले. 2009 च्या विधानसभेत जिल्ह्यातून फक्‍त सतेज पाटील (कोल्हापूर दक्षिण) व सा. रे. पाटील (शिरोळ) हे दोघेच विजयी झाले होते.

सतेज, पी.एन., आवळे यांच्यावर जबाबदारी

एकेकाळी काँग्रेसमध्ये नेते अन् कार्यकर्त्यांची मांदियाळी होती. परंतु, पाडापाडीच्या राजकारणात काँग्रेसचे अस्तित्व संपत गेले. प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील, जिल्हाध्यक्ष सतेज पाटील व माजी मंत्री जयवंतराव आवळे यांच्यावर जिल्हा काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यापैकी पी.एन. स्वतः निवडणूक रिंगणात आहेत. तर पाटील व आवळे हे अनुक्रमे पुतण्या आणि मुलगा यांच्या विजयासाठी झटणार आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे नेतृत्वही तिघांना करावे लागणार आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यात राजकीयद‍ृष्ट्या शिवसेना-भाजपने वर्चस्व मिळविले आहे. जिल्ह्यातील दोन्ही खासदार आणि सहा आमदार शिवसेनेचे आहेत. भाजपचे दोन आमदार आहेत. राष्ट्रवादीने दोन विधानसभा मतदारसंघांत विजय मिळवून पक्ष अस्तित्वात ठेवला आहे. त्यामुळे पी.एन., सतेज व आवळे यांच्यावर यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना उभारी देण्याबरोबरच पक्षाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी झटावे लागणार आहे. 

1980 पासून काँग्रेस आमदारांची संख्या
1980...........................10
1985 ............................ 6
1990 ............................ 7
1995 ............................ 7
1999 ............................ 5
2004 ............................ 3
2009 ............................ 2
2014 ............................ 0