Tue, Dec 10, 2019 23:39होमपेज › Kolhapur › जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूविकास बँकेच्या कर्मचार्‍यांचे ‘संसार मांडो’ आंदोलन

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भूविकास बँकेच्या कर्मचार्‍यांचे ‘संसार मांडो’ आंदोलन

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:22AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भूविकास बँक कर्मचार्‍यांची देणी द्यावीत, बँकेच्या इमारतीवरील बीट्युनिअरचा प्रस्ताव मागे घ्यावा, या मागणीसाठी भूविकास बँक ज्येष्ठ कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाच्या निषेधार्थ सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संसार मांडो आंदोलन करण्यात आले. यावेळी शासन आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले; पण या आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही. यामुळे उद्या मंगळवारपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे श्रीकांत कदम यांनी सांगितले. 

भूविकास बँक कर्मचार्‍यांची देणी शासनाने देणे बाकी आहे. यासाठी शासनाने बँकेची मालमत्ता विक्री करून कर्मचार्‍यांची देणी भागवा, अशी सूचना सहकार खात्याला केली आहे. त्यानुसार बँकेची कोल्हापुरातील इमारत विक्रीसाठी अवसायकांनी निविदा काढली आहे; पण इमारतीच्या जागेवर बिट्युनिअरचा प्रस्ताव आहे. त्यामुळे ही इमारत विक्री होऊ शकत नाही. यासंदर्भात संघटनेच्या वतीने गेल्या आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्र्यांनी मुंबईत चर्चा करू, असे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे संघटनेने आंदोलन मागे घेतले होते; पण पालकमंत्र्यांनी चर्चा केली नाही, यामुळे संघटनेने पुन्हा आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात सहभागी झालेले सर्व ज्येष्ठ कर्मचारी आहेत. या ज्येष्ठ कर्मचार्‍यांचा विचार करून शासनाने या कर्मचार्‍यांचा प्रश्‍न तातडीने सोडवा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. आंदोलनात श्रीकांत कदम, रावसो चौगुले, भारत पाटील, नंदकुमार पाटील व कर्मचारी सहभागी झाले आहेत.