Mon, Jul 13, 2020 12:34होमपेज › Kolhapur › चविष्ट कोल्हापूर गुळाची बदनामी नको 

चविष्ट कोल्हापूर गुळाची बदनामी नको 

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 11 2018 9:49PMकोल्हापूर : डी. बी. चव्हाण 

गूळ उत्पादनाबद्दल अन्‍न आणि औषध प्रशासनाच्या घेतलेल्या पवित्र्यामुळे शनिवारी झालेल्या कार्यशाळेत शेतकर्‍यांनी असंतोष व्यक्‍त केला. यावेळी गुळातील भेसळीवर  जोरदार चर्चा झाली. राजर्षी शाहू महाराजांनी दूरद‍ृष्टी ठेवून गूळ उद्योगाला उभारी दिली. हा इतिहास लक्षात ठेवून शेतकर्‍यांनी गुळाचे  चांगल्या दर्जाचे उत्पादन घेणे आणि अन्‍न आणि औषध प्रशासनाने कारवाई करताना शहानिशा करण्याची गरज आहे. यातून चविष्ट कोल्हापूर गुळाची बदनामी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

कोल्हापूर शेती उत्पन्‍न बाजार समितीनेही शेतकर्‍यांचा गूळ अडत दुकानात ठेवून घेणे आणि त्याची लिलावाद्वारे विक्री करणे या एकतर्फी प्रेमातून बाहेर येऊन शोधक वृत्तीने गुळाच्या बाजारपेठेचा लौकिक वाढविण्यासाठी  प्रयत्न करण्याची गरज आहे; अन्यथा शेतकर्‍यांनी कष्टातून मिळविलेला कोल्हापुरी गूळ हा ब्रँड आपल्या हातातून कधी निघून गेला, हे बाजार समितीच्या लक्षात येणार नाही.

शनिवारी झालेल्या कार्यशाळेत गूळ खाल्ल्याने कोणाचा मृत्यू झाला का, कोल्हापूरच्या गुळाला बदनाम का करता, अन्य घटकांमध्ये भेसळ होत नाही का, असे अनेक प्रश्‍न शेतकर्‍यांनी उपस्थित केले. गूळ कणीदार होण्यासाठी शेतकर्‍यांकडून हायड्रॉस पावडरीचा अवलंब केला जातो. त्याविषयी चर्चा झाली. हायड्रॉस पावडरीचा अतिवापर हाही मानवी आरोग्यास हानिकारकठरू शकणार नाही का, याचाही उत्पादकांनी विचार करणे गरजेचे आहे. सरकारी मापदंडानुसार गुळाचे उत्पादन करताना 35 ग्रॅम हायड्रॉस पावडर वापरता येतो; परंतु अनेक गूळ उत्पादक त्यापेक्षा जास्त या पावडरीचा वापर करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे जादा पैशाच्या हव्यासापोटी जर कोणी अशा पावडरीचा वापर करत असेल, त्याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच हायड्रॉस पावडर मर्यादेत टाकण्याचा सल्‍ला देत असताना अन्‍न आणि औषध प्रशासनाने गुळात अन्य कोणता सेंद्रिय पदार्थ वापरावा यासाठी यासाठी मार्गदर्शनही करण्याची गरज आहे.

कोणत्याही सरकारी यंत्रणेने उत्पादित गुळावर कारवाई केली की लगेच दुसर्‍या दिवशी बाजारपेठ बंद केली जाते. लिलाव थांबवले जातात, दर 300 ते 400 रुपयांनी कमी होतात. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसतो, अशा कारणांमुळे शेतकरी गूळ उत्पादनाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत  गुर्‍हाळघराच्या संख्येत घट झाली आहे. सहा वर्षांपूर्वी 25 ते 26 लाख रव्याची आवक या बाजार समितीत होत असे, आता त्यात 5 लाख घट झाली आहे. 

हंगाम सुरू झाला की अनेक कारणांनी कधी अडते, कधी व्यापारी, तर कधी दरासाठी शेतकरी गुळाची बाजारपेठ बंद पाडतात. आता या सर्वात नवीन दुखणे समोर आले आहे ते म्हणजे अन्‍न आणि औषध प्रशासनाच्या नोटिसांचे. त्यामुळे तर गुळाच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातील ऐतिहासिक गूळ व्यापारपेठ टिकवण्यासाठी राज्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालण्याची वेळ आली आहे.