होमपेज › Kolhapur › जखमी पै. नीलेशची मृत्यूशी झुंज अपयशी

जखमी पै. नीलेशची मृत्यूशी झुंज अपयशी

Published On: Apr 07 2018 2:00AM | Last Updated: Apr 07 2018 1:45AMबोरपाडळे : वार्ताहर

बांदिवडे (ता. शाहूवाडी) येथे मैदानात कुस्ती खेळताना जखमी झालेल्या नीलेश विठ्ठल कंदूरकर (रा. बादेवाडी, ता. पन्हाळा) या वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्राच्या मल्लाची गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर शुक्रवारी पहाटे व्यर्थ ठरली.

जोतिबा यात्रेनिमित्त बांदिवडे येथे कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानात खेळताना पैलवान नीलेश हा मानेवर पडल्याने मणक्याला व स्पायनल कॉडला गंभीर इजा झाली होती. त्याला तातडीने कोल्हापुरात एका खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते; पण प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अजयसिंह काटकर यांच्या सहकार्याने मंगळवारी पुढील उपचारासाठी त्याला मुंबईला नेण्यात येत होते. परंतु, वाटेतच प्रकृती अधिक खालावल्याने त्याला कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर  उपचार सुरू होते. परंतु, शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली.

नीलेश हा वारणा दूध संघाचा मानधनधारक मल्ल व वारणा महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. कराडवरून त्याचे पार्थिव वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे कुस्ती केंद्रात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. तेथून वेखंडवाडी ते बादेवाडीतील त्याच्या घरापर्यंत फुलांनी सजवलेल्या वाहनातून त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. यामध्ये कुस्ती शौकिनांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. लहानपणापासून ज्या आखाड्यात कुस्तीचे धडे गिरवले, त्या आखाड्याजवळच नीलेशच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रूनयनांनी वारणा महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर.आर. पाटील, पन्हाळा तहसीलदार रामचंद्र चोबे, पन्हाळा सभापती पृथ्वीराज सरनोबत आदी यावेळी उपस्थित होते. नीलेश हा मनमिळावू स्वभावाचा होता. त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कंदूरकर यांच्या कुटुंबीयांची लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील भेट घेणार आहेत. त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून सर्वतोपरी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री सहायता निधी कोल्हापूरचे समन्वयक विजय जाधव यांनी सांगितले.

घराण्याला कुस्तीची परंपरा
नीलेशच्या घराण्याला कुस्तीची परंपरा आहे. त्याचे आजोबा गणपती कंदूरकर व वडील विठ्ठल, मोठा भाऊ सुहास हे देखील परिसरातील नावाजलेले मल्ल आहेत. त्यामुळे हे घराणे कुस्तीपटूंचे घराणे म्हणून ओळखले जाते.
 

Tags : kolhapur, wrestlers, Nilesh Kandurkar