Thu, Feb 27, 2020 23:47होमपेज › Kolhapur › टोकाची ईर्ष्या अन् निसटता विजय!

टोकाची ईर्ष्या अन् निसटता विजय!

Published On: Oct 03 2019 2:10AM | Last Updated: Oct 02 2019 10:24PM
कोल्हापूर : चंद्रशेखर माताडे

कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कायमच टोकाची ईर्ष्या पाहायला मिळते. ही ईर्ष्या एवढी टोकाला जाते की, जेथे हजारोंच्या मताधिक्याने आमदार निवडून येतात, ते मताधिक्यच कधी 11, कधी 388, तर कधी 710 एवढे घटल्याचे दिसते. याला कारण टोकाची ईर्ष्या, यातून एकमेकांना अडवा आणि एकमेकांची जिरवा यातून आडाखे बांधले जातात व उमेदवार निवडून येणार म्हणता म्हणता घरी जातो. तर घरी बसलेला उमेदवार गुलाल लावून निवडून आल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी येतो. 

1972 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत सदाशिवराव मंडलिक हे कागल मतदारसंघातून 1 हजार 624 मतांनी निवडून आले होते. हे त्या निवडणुकीतले सर्वात कमी मताधिक्य होते. मंडलिक यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. त्यांचे चिन्ह सिंह होते. या निवडणुकीत राधानगरीमधून कृष्णाजी गंगाराम मोरे व कागलमधून मंडलिक हे दोघेही अपक्ष म्हणून लढले होते व दोघांचेही चिन्ह सिंह होते. दोन्ही मतदारसंघ परस्परांना लागून आहेत. 

त्याच्या पुढच्याच म्हणजे 1978 साली झालेल्या निवडणुकीत चंदगड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार विठ्ठल भैरू (व्ही.बी.) पाटील हे निवडून आले. त्यांचे मताधिक्य केवळ 807 एवढे होते. 
1980 च्या निवडणुकीत दिनकरराव यादव हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार शिरोळ मतदारसंघातून निवडून आले होते. काँग्रेसच्या परंपरागत मतदारसंघात यादव यांनी ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार यांना पराभूत केले होते. त्यांचे मताधिक्य होते केवळ 2 हजार 687. यादव यांना काँग्रेसमधीलच कुंभारविरोधी गटाचा पाठींबा होता हे लपून राहीले नव्हते तर ज्येष्ठ नेत्यांचाही त्यांच्या उमेदवारीला आशीर्वाद होता.

1985 च्या निवडणुकीत कागल मतदारसंघाने यापूर्वीच्या सर्वच घटत्या मताधिक्क्याचे रेकॉर्ड आणखी घटविले. एस काँग्रेसच्या तिकीटावर सदाशिवराव मंडलिक यांनी काँग्रेसच्या विक्रमसिंह घाटगेंचा केवळ 231 मतांनी पराभव केला होता.

1990 च्या निवडणुकीत गडहिंग्लज मतदारसंघातुन जनता दलाचे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे केवळ 674 एवढ्या मताने विजयी झाले होते. तर 1995 च्या निवडणुकीत प्रकाश आवाडे हे चुरशीच्या लढतीत 2 हजार 443 मतांनी विजयी  झाले होते. 1999 च्या निवडणुकीत कागल मतदारसंघातुन नव्यानेच स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून हसन मुश्रीफ हे केवळ 2 हजार 881 मताने विजयी झाले होते. 

2004  च्या निवडणुकीत तर कोल्हापूर जिल्ह्याने घटत्या मताची पातळी थेट 11 पर्यंत नेऊन ठेवली. महापालिका व नगरपालिकाच नव्हे तर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतही यापेक्षा जास्त मताधिक्याने उमेदवार निवडून येत असताना विधानसभेसाठी मात्र केवळ 11 मतांनी उमेदवार विजयी झाल्याची आगळीवेगळी नोंद कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रात झाली. चंदगड मतदारसंघातुन जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर नरसिंग गुरूनाथ पाटील हे त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे भरमू सुबराव पाटील यांचा केवळ 11 मतांनी पराभव करून विधानसभेवर निवडुन आले होते. नरसिंग गुरूनाथ पाटील यांना 47 हजार 738 तर भरमू सुबराव पाटील  यांना 47 हजार 727 मते मिळाली होती. 

2009 साली झालेल्या निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातुन डॉ सुजित मिणचेकर हे केवळ 2 हजार 219 मतांधिक्कयाने विजयी झाले होते. त्यांनी जनसुराज्य शक्तीचे  तत्कालीन आमदार राजीव आवळे यांचा पराभव केला होता.

2014 साली झालेल्या निवडणुकीत करवीर व शाहूवाडी या मतदारसंघात राजकीय इर्षेने टोक गाठले होते.करवीर मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरूध्द काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील  यांच्यात चुरशीचे निवडणुक झाली होती. त्यामध्ये नरके हे केवळ 710 एवढ्या मताधिक्याने विजयी झाले. नरके यांना 1 लाख 7 हजार 998 मते मिळाली होती तर पाटील यांनी 1 लाख 7 हजार 288 मते मिळाली होती. 

शाहूवाडीत जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे विरूध्द शिवसेनेचे सत्यजित  पाटील असा कडवा संघर्ष होता. यामध्ये पाटील हे केवळ 338 मतांनी विजयी झाले होते.या मतदारसंघाने टोकचा राजकीय संघर्ष पाहीला. यामध्ये पाटील यांना 74 हजार 702 तर कोरे यांना  74 हजार 314 मते मिळाली होती. 

2019 च्या निवडणुकीतही जिल्ह्यात जोरदार राजकीय संघर्ष पहायला मिळत  आहे. बंडखोरीचे पीक येणार हे स्पष्ट आहे.एकमेकांची मते कापाकापीतुन विजयी कोण होणार हे ठरणार आहे. ही मतांची कापाकापी शेवटच्या क्षणीही एखाद्या विजयाच्या जवळ पोहोचलेल्या उमेदवाराला मागे ढकलू शकते.