Sat, Jul 04, 2020 01:46होमपेज › Kolhapur › करवीर, ‘दक्षिणे’त पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच रंगणार सामना

करवीर, ‘दक्षिणे’त पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांतच रंगणार सामना

Published On: Sep 30 2019 1:49AM | Last Updated: Sep 30 2019 2:11AM
कोल्हापूर : संतोष पाटील

जिल्ह्यात सर्वाधिक लक्षवेधी ठरणार्‍या कोल्हापूर शहर दक्षिणमध्ये भाजपचे आ. अमल महाडिक आणि काँग्रेसचे ऋतुराज पाटील तर करवीरमधून शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके आणि काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील या पारंपरिक प्रतिस्पर्धी गटांतच सामना रंगणार आहे. काँग्रेस आणि शिवसेनेने जाहीर केलेल्या उमेदवारी यादीतून रविवारी हेे स्पष्ट झाले. जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरविणार्‍या या दोन मतदारसंघातील लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पी. एन. पाटील यांना ‘करवीर’मधून तर आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांना कोल्हापूर शहर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे जाहीर झालेल्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झाली. करवीर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके व काँग्रेसचे पी. एन. पाटील हे विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने येत आहेत. तर ‘दक्षिणे’त भाजपचे आमदार अमल महाडिक यांच्याविरोधात काँग्रेसचे ऋतुराज पाटील अशी लक्षवेधी लढत रंगणार आहे. 

विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी निश्‍चित मानली जाते. आघाडीचे जागा वाटपाचे सूत्रही ठरल्याचे सांगितले जाते. त्यानुसार दोन्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रत्येकी 125 जागा तर उर्वरित 38 जागा ह्या घटक पक्षांना सोडण्यात येणार आहेत. या आघाडीत माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सहभाग असावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 2009 च्या सूत्रानुसार आघाडीत कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी सात जागा काँग्रेसला, तर तीन जागा राष्ट्रवादीला जातील, असे सुत्रांनी सांगितले. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने जिल्ह्यातील सर्व दहा जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत.

करवीर, कोल्हापूर दक्षिण व उत्तर, शाहूवाडी, हातकणंगले, शिरोळ व इचलकरंजी हे मतदारसंघ काँग्रेसकडे राहतील. त्यापैकी शिरोळसाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. कागलमधून आमदार हसन मुश्रीफ यांची राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी निश्‍चित मानली जाते. राधानगरी-भुदरगडची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला असली तरी माजी आमदार के. पी. पाटील आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील या मेव्हण्या-पाहुण्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. ‘स्वाभिमानी’ आघाडीत आल्यानंतर काँग्रेसला शिरोळची जागा सोडावी लागेल. शाहूवाडी व इचलकरंजीत सद्य:स्थितीत काँग्रेसकडे  प्रबळ उमेदवार नसल्याचे चित्र आहे.