Wed, Apr 01, 2020 01:27होमपेज › Kolhapur › कोल्हापूर पहिला दिवस कोरा

कोल्हापूर पहिला दिवस कोरा

Published On: Sep 28 2019 1:28AM | Last Updated: Sep 28 2019 1:25AM
कोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्ह्यातील सर्वच दहा विधानसभा मतदारसंघात शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला. एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्याने पहिला दिवस कोराच गेला. दरम्यान, 118 जणांनी 196 अर्जांची खरेदी केली आहे.  सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, तसे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. यामुळे शनिवारी तसेच रविवारी आणि बुधवार दि. 2 ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघातील 118 जणांनी 196 अर्ज घेतले आहेत. शाहूवाडी मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे, कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून भाकपचे उमेदवार सतीशचंद्र कांबळे, करवीर मतदारसंघातून शेतकरी संघटनेचे माणिक शिंदे यांनी स्वत:साठी तर कागल मतदारसंघातून अकाराम बचाटे यांनी संजय घाटगे यांच्यासाठी, संतोष आगळे यांनी अंबरिशसिंह संजय घाटगे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज नेले.

काटकर म्हणाले, निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, निवडणूक कर्मचार्‍यांचे पहिले प्रशिक्षण उद्या शनिवार दि. 28 रोजी होणार आहे. रविवारीही (दि. 29) प्रशिक्षण होणार आहे. दि. 7 ऑक्टोबरला मतदारसंघातील उमेदवार निश्चित होणार आहेत. त्यानंतर प्रत्येक मतदारसंघात किती मतदान यंत्रे  लागणार हे स्पष्ट होईल. मात्र, जिल्ह्यात आवश्यक मतदान यंत्रापेक्षा अधिक (राखीव) मतदान यंत्रे उपलब्ध असून, त्यांची पहिल्या टप्प्यातील तपासणी पूर्ण झाली आहे.

निवडणुकीसाठी चार खर्च निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, ते जिल्ह्यात दाखल होत आहेत. प्रत्येकी दोन मतदार संघासाठी एक याप्रमाणे जनरल निवडणूक निरीक्षकांचीही नियुक्ती आयोगाने केली असल्याचे काटकर यांनी सांगितले. उमेदवारांच्या खर्चावर प्रशासनाच्या ‘शॅडो ऑब्झरर्व्हर’चे लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वच मतदारसंघात चुनावी पाठशालाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 लाख विद्यार्थ्यांकडून त्यांच्या पालकांचे मतदान करीत असल्याबाबत संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले. हॉटेल, रेस्टॉरंट आदी रात्री 11 नंतर बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, रेल्वे, बसस्थानक, रुग्णालयाची उपहारगृहे आदींना त्यातून सवलत दिली असल्याचेही काटकर यांनी सांगितले. 

जिल्ह्यात आचारसंहितेची  प्रभावी अंमलबजावणी केली जात असून, पोस्टर्स, बॅनर्स, फलक आदी काढून टाकण्यात येत असल्याचे काटकर यांनी सांगितले. 1 हजार 118 जणांपैकी आजअखेर 652 जणांनी शस्त्रे जमा केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे यांनी सांगितले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ उपस्थित होते.

मतदारसंघनिहाय अर्ज खरेदी अशी...

चंदगड मतदारसंघातून 12 जणांनी 18 उमेदवारी अर्ज घेतले. राधानगरी मतदारसंघातून 11 जणांनी 21 अर्ज घेतले. कागल मतदारसंघातून 5 जणांनी 17 अर्ज घेतले. कोल्हापूर (दक्षिण) मतदारसंघातून 6 जणांनी 14 अर्ज नेले. करवीर मतदारसंघातून 5 जणांनी 13 अर्ज घेतले. कोल्हापूर (उत्तर) मतदारसंघातून 6 जणांनी 8 अर्ज घेतले आहेत. शाहूवाडी मतदारसंघातून 13 जणांनी 33 अर्ज घेतले. हातकणंगले मतदारसंघातून सर्वाधिक 32 जणांनी 35 अर्ज नेले. इचलकरंजी मतदारसंघातून 16 जणांनी 22 अर्ज घेतले तर  शिरोळ मतदारसंघातून 12 जणांनी 15 अर्ज घेतले.