Tue, Jun 15, 2021 12:43होमपेज › Kolhapur › आम्हाला काय कुणाची भीती!

आम्हाला काय कुणाची भीती!

Published On: May 20 2018 1:42AM | Last Updated: May 20 2018 12:49AMकोल्हापूर : विजय पाटील 

दुकानात  जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून  सुर्‍या बिल्डर वन वे असणार्‍या रस्त्याचा वापर करतो. समोरून येणार्‍याने जर सुर्‍या बिल्डरला हटकला तर तो त्यालाच दंडाची बेडकुळी फुगवून तराटणी देत निघून जातो. टॉम्या शायनर तर एकाही सिग्‍नलला थांबत नाही. त्याच्या या पराक्रमाचं (?) कौतुक कॉलेज कॅम्पसमध्ये त्याच्या मैत्रिणीही करतात म्हणे. अशी फुकाची मर्दुमकी दाखवणारे कोल्हापुरात पायलीला पन्‍नास सापडतात. आम्हाला काय कुणाची भीती! असं वागणं असणार्‍यांना दोन-चार दिवस तुरुगांची हवा खायला मिळाली तरच कदाचित हे सुधारतील आणि नियमांचा सन्मान करतील. 

सुरक्षित आणि विना त्रास प्रवासाचा आनंद वाहतुकीचे नियम पाळणार्‍यांना दोनशे टक्के होतो हे उघड आहे, पण सहज नियम मोडण्याची स्पर्धा असल्यासारखे वर्तन करणार्‍यांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्यामुळेच अपघातांची संख्या वाढत चालली आहे. वाहतूक कोंडी तर सगळ्यांनी मान्य केलेली समस्या बनली आहे. लाल मुंग्याचं निरीक्षण केले तर दिसेल त्या कशा शिस्तबद्ध रांगेत आपले काम करतात. त्यांच्या शिस्तीमुळे हजारो मुंग्या असतानाही गर्दी दिसत नाही की गोंधळ वाटत नाही. हाच वाहतुकीचा प्रमुख नियम आहे. 

लायसन्स काढताना वाहतुकीचे नियम माहिती असणे आवश्यक असते. सरळ आणि सोपे हे नियम असतात, पण बहुतांश जण हे नियम पाठ करण्यापेक्षा एजंटाला गाठून लायसन्स मिळवून रिकामे होतात. हे नियम आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी असतात हेच विसरले जाते. 
    
आजचं ठळक...

आज सव्वाअकराच्या सुमारास एक तरुण पार्वती टॉकीज सिग्‍नल चौकात सिग्‍नल तोडून सुसाट गेला. पुढच्या चौकातील सिग्‍नल तोडून तसाच पुढे जाताना एका वाहनधारकाने त्याला हळू जा की कोर्टात तारीख आहे काय? असा टोला मारला असता या बहाद्दराने तुझं काम बघ. माझ्या नादाला लागू नकोस, असा दम भरला आणि पुन्हा सुसाट निघून गेला. या पठ्ठ्याने एकूण चार सिग्‍नल तोडले. याचाच अर्थ त्याने चार माणसे मारली असती, असा होऊ शकतो; पण पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या प्रसंगावधनाने त्यांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्यावर कारवाई केली आहे, पण अशा मंडळींवर कडक कारवाई केली तरच अशांची गुर्मी उतरेल, अन्यथा यांच्यामुळे अपघात ठरलेला आहे.

16 लाखांचा दंड भरूनही...
गतवर्षी  कुठेही पार्किंग करून वाहतुकीला अडथळा करणार्‍या शहरातील 7 हजार वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून 16 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दंड करूनही अडथळा करणार्‍यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. 

नियम पाळलेच पाहिजेत
वनवेतून उलट्या दिशेने वाहन नेणार्‍यांपैकी 65 टक्के लोकांचा अपघात होत असल्याचे वाहतूक जागृती सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे, तर अतिवेगाने वाहन चालवणार्‍यांपैकी 57 टक्के लोकांचा प्रवास जीवघेणा आणि धोकादायक ठरू शकतो, असेही हे सर्वेक्षण सांगते. महाद्वार रोडमध्ये पापाची तिकटी येथून अनेक वाहनधारक घुसतात. हीच स्थिती शिवाजी रोडची आहे. हाच  प्रकार बिंदू चौक ते मिरजकर तिकटी मार्गाचा आहे.