Fri, Jul 10, 2020 03:26होमपेज › Kolhapur › शहरातील रस्त्यांची लागली ‘वाट’!

शहरातील रस्त्यांची लागली ‘वाट’!

Published On: Sep 26 2019 2:23AM | Last Updated: Sep 26 2019 2:23AM
कोल्हापूर : प्रतिनिधी 

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बिंदू चौक, सीबीएस, गंगावेस, चप्पललाईन, बसंत-बहार रोड, गोखले कॉलेज चौक, मिरजकर तिकटी ते संभाजीनगर, आरटीओ ते जिल्हा परिषद, लक्ष्मीपुरी ते हॉकी स्टेडियम चौक, महावीर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय, स्टेशन रोड, साईक्स एक्स्टेंशन, परीख पूल परिसर, फुलेवाडी ते रंकाळा स्टँड चौक, गंगावेस ते शिवाजी पूल हे शहरातील प्रमुख रस्ते आता खड्ड्यांत गेले आहेत. गल्ली-बोळांची तर अवस्था यापेक्षाही वाईट आहे. शहरातील रस्त्यांवरील वाहतूक हाडे खिळखिळी करणारी ठरत आहे. शहरातील रस्त्यांची सद्यस्थिती मांडणारी मालिका आजपासून...

महापालिका कार्यक्षेत्रामधील शहर परिसरातील 630 किलोमीटर लांबीचे रस्ते खराब झाले आहेत. अतिवृष्टी आणि महापुरामुळे यंदा रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबतचा अहवाल महापालिका प्रशासनाच्या वतीने राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. तसेच यासाठीच्या निधीची मागणी जागतिक बँकेच्या पाहणी समितीसमोरही करण्यात आली आहे. 

शहर परिसरातील रस्त्यांची एकूण लांबी 850 कि.मी. इतकी आहे.  यंदा अतिवृष्टीचे प्रमाण मोठे आहे. यासह गेल्या शंभर वर्षांतील सर्वाधिक आपत्तीजनक महापूर यंदा शहर परिसराने अनुभवला. महापुराचे पाणी बराच काळ शहर परिसरात राहिले होते. याचा परिणाम रस्त्यांवर झाला आहे. दरवर्षी निकृष्ट दर्जामुळे पावसाळ्यानंतर रस्ते खराब होण्याचे प्रमाण असतेच. परंतु, यंदा महापुरामुळे हे प्रमाण लक्षणीय आहे. शुक्रवार पेठ पोलिस चौकी ते शिवाजी पूल, जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज, बसंत-बहार रोड, गंगावेस ते रंकाळा, शिवाजी चौक ते पापाची तिकटी या रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे असे चित्र आहे.

यासह शहरातील शुक्रवार पेठ ते शिवाजी पूल आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज चौक आदी  मार्गांवर पावसाळ्यात सतत पाणी साचलेले असते. त्यामुळे संबंधित 25 कि.मी.चे रस्ते सिमेंट क्राँकीटचे करावेत, अशी मागणीही महापालिकेने अहवालातून केली आहे. जागतिक बँकेच्या पाहणी समितीला दिलेल्या अहवालात शहरातील रस्त्यांच्या रुंदीचा थर वाढवण्याची सूचना नोंदवण्यात आली आहे. कारण, शहरात दरवर्षी तुलनेने पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे पावसातही रस्त्यांचा टिकाऊपणा जास्त वर्षे राहावा, यासाठी ही सूचना करण्यात आली असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

एमआयडीसी, न्यायसंकुल, शैक्षणिक संस्था, 

राजाराम कारखाना, शासकीय कार्यालयांतील कामांनिमित्त कसबा बावडा मार्गावर वाहनांची संख्या लाखाच्या घरात आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ते महावीर कॉलेज, बसंत-बहार रोड, आरटीओ कार्यालय ते रमणमळा हे बावड्याकडे जाणारे रस्ते खड्ड्यात गेले आहेत. खड्डा चुकवून वाहनधारक जाऊच शकत नाही, अशी अवस्था आहे. हाडे खिळखिळी करणारे रस्ते कधी दुरुस्त होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिरोली औद्योगिक वसाहत, पोलिस अधीक्षक कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कृषी विभाग, सेवा रुग्णालय, राजाराम काराखाना, वन विभाग, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्था, विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, जीएसटी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, सार्वजानिक बांधकाम विभाग, मुख्य पोस्ट ऑफिस, सिंचन भवन, जिल्हा दूध उत्पादक संघ आदी जिल्ह्यातील सर्वच प्रमुख कार्यालयांत जाण्यासाठी महावीर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय, बसंत-बहार रोड, रमणमळा ते विवेकानंद कॉलेज-जिल्हा परिषद, सीबीएस-सासने मैदान-आदित्य कॉर्नर या प्रमुख मार्गांचा वापर केला जातो. जिल्हाधिकारी कार्यालय ते धैर्यप्रसाद हॉल हा एकच रस्ता सुस्थितीत आहे. मात्र, या रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे आहेत. 

जयंती नाला ते महावीर कॉलेज हा मार्ग ड्रेनेज कामामुळे बंद आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयामार्गे महावीर कॉलेज यामार्गे वाहतूक वळविली आहे. बाळकृष्ण हवेलीच्या दारात सुमारे तीन फूट इतके खड्डे आहेत. पुढे केव्हीज पार्कपासून महावीर कॉलेजपर्यंत रस्त्याची अक्षरश: पाणंद झाली आहे. रोज एखादा तरी दुचाकीस्वार या खड्ड्यांमुळे आपटतो. बसंत-बहार रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात रस्त्याची चाळण झाली आहे. जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्चून रस्ते करणार्‍या पीडब्ल्यूडी कार्यालय ते आरटीओपर्यंतचा रस्ता खड्ड्यात गेला आहे. या प्रमुख रस्त्यांची किमान डागडुजी करण्याची नितांत गरज आहे.
-------------
पावसात होतात हाल
पावसाचे पाणी साचल्याने या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. काही खड्डे दोन-दोन फूट खोल आहेत. पावसामुळे दुचाकीस्वार या मोठ्या खड्ड्यात गेल्यास एकतर कसरत करून बाहेर पडतो किंवा खाली पडतो. सरासरी दोन तरी वाहनधारक महावीर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गावर खड्ड्यांमुळे अपघातात जायबंदी होतात. परिसरातील शाळांत लहान मुलांना सोडण्यासाठी येणार्‍या महिलावर्गाला या रस्त्यावरून मुलांना घेऊन जाताना अक्षरश: कसरत करावी लागते.
===========
अनवाणी जाणार्‍या भाविकांचे काय?
कसबा बावडा, लाईन बाजार, रमणमळा या भागातून नवरात्रौत्सवात पहाटे अंबाबाईच्या दर्शनासाठी शेकडो महिला पहाटे अनवाणी येत असतात. या काळात या महिलांना अनवाणी महावीर कॉलेज ते जिल्हाधिकारी कार्यालय या खड्ड्यांतील रस्त्यातून अनवाणी जावे लागणार आहे.
==========

गंगावेस-शिवाजी पूल
गंगावेस-रंकाळा
बिंदू चौक-पापाची तिकटी
मिरजकर तिकटी-संभाजीनगर
कलेक्टर ऑफिस- महावीर कॉलेज