Wed, Sep 23, 2020 21:45होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलावर हजारो टन वाहतुकीचा बोजा

शिवाजी पुलावर हजारो टन वाहतुकीचा बोजा

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:03AMकोल्हापूर : सुनील सकटे

संस्थान काळात कोकणात जाण्यासाठी महत्त्वाचा रस्ते मार्ग असावा, या उद्देशाने ब्रिटिशांनी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीवर शिवाजी पुलाची उभारणी केली. 1878 साली वाहतुकीसाठी खुला झालेला हा पूल तब्बल 140 वर्षे हजारो टन वाहतुकीचा बोजा पेलत उभा आहे. रस्ते विकास महामंडळाने गेल्यावर्षी केलेल्या सर्वेक्षणानुसार या पुलावरून रोज हजारो वाहनांची ये-सुरू असते.

रस्ते विकास महामंडळाने केलेल्या सर्वेक्षणानुसार या पुलावरून रोज दुचाकी 1,471, तीनचाकी 416, जीप-मोटार कार 4,254, मध्यम आकाराची वाहने 641, सरकारी आणि एस.टी. बसेस 437, खासगी बसेस 33, मिनी बसेस 45, ट्रॅक्टर 17, ट्रॉलीसह ट्रॅक्टर 23 एवढी वाहने धावतात. तर टू अ‍ॅक्सल 141, थ्री अ‍ॅक्सल 45 आणि मल्टी अ‍ॅक्सल 29 वाहने धावतात. ही आकडेवारी गेल्या वर्ष-दीड वर्षापूर्वीची असून, यामध्ये वाढीची शक्यता नाकारता येत नाही. उपलब्ध वाहन संख्येच्या आकडेवारीचा विचार करता या पुलावरून रोज तब्बल 25 हजार टन वाहनांचा बोजा पेलला जात असल्याचे स्पष्ट होते. 

ब्रिटिशकालीन असणार्‍या या पुलाने आजपर्यंत कोकणात जाण्यासाठी जनतेला साथ दिली आहे. मात्र, वाढती वाहनसंख्या, पुलाचे आयुष्यमान पाहता या पुलास पर्यायी पूल गरजेचा बनला आहे. या पुलावरून गेली 140 वर्षे अखंड वाहतूक सुरू आहे. काही किरकोळ अपघात वगळता या पुलावर कधीही मोठा अपघात झाल्याचा इतिहास नाही. पूल अरुंद असल्याने अनेकवेळा एस.टी. बसेस अथवा डंपर-ट्रक पुलाच्या कठड्यास घासून जाण्याचे प्रकार घडले आहेत. भोगावती नदीवरील बालिंगा येथील ब्रिटिशकालीन पुलावरून जुलै 1999 मध्ये केएमटी घसरून बुडाली होती. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी झालेला भीषण अपघात पुलाच्या इतिहासातील अपवादात्मक अपघात आहे. एवढ्या वर्षांत महापूर, आपत्तीच्या काळातही पुलावरील वाहतूक कधीही बंद राहिली नाही. केवळ सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पाच ऑगस्ट 2016 पासून पाच दिवस या पुलावरील वाहतूक प्रशासनानेच बंद केली होती. पर्यायी पूल बांधण्यात येत असला, तरी पर्यायी पूल अद्याप पूर्णत्वास न गेल्याने जुन्या शिवाजी पुलावरूनच कोकणात जाणारी वाहतूक सुरू आहे. आयुष्यमान संपलेल्या या जुन्या पुलावरून आणखी किती दिवस रिस्क घेऊन वाहतूक सुरू ठेवणार, असा संतप्‍त सवाल नागरिकांतून व्यक्‍त केला जात आहे.

1978 मध्येच कार्यक्षमता संपली; पण...
ब्रिटिशकालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असणार्‍या या पुलाने जवळपास दीड शतकाची मजल मारली आहे. 1874 ते 1878 या कालावधीत या पुलाचे बांधकाम करण्यात आले आहेे. के.सी.एस.आय. श्रीमंत छत्रपती राजाराम महाराज अल्पवयीन असताना या पुलाचे बांधकाम सुरू केल्याचा उल्‍लेख शिलालेखावर आढळतो. रामचंद्र महादेव आणि कंपनी या कंपनीने या पुलाचे बांधकाम केले आहे. पुलाचे कल्पक मेजर वॉल्टर मार्डन डुकाट-रॉयल इंजिनिअर्स होते. पुलाची लांबी 106.70 मीटर आहे. तर 6.20 मीटर रुंदीचा हा पूल आहे. 21.30 मीटर लांबीचे पाच गाळे आहेत. 1978 साली या पुलास शंभर वर्षे पूर्ण झाली आहे. त्याचवेळी पुलाची कार्यक्षमता संपल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही आज 140 व्या वर्षीही या पुलावरून वाहतूक सुरू आहे.