Tue, Jul 07, 2020 19:29होमपेज › Kolhapur › शिवाजी पूल अवजड वाहनांना बंद करा

शिवाजी पूल अवजड वाहनांना बंद करा

Published On: Mar 22 2018 1:32AM | Last Updated: Mar 22 2018 1:31AMकोल्हापूर : सुनील सकटे

प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघाताने चर्चेत आलेल्या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील पंचगंगा नदीवरील शिवाजी पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचा अंतिम अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभागास मंगळवारी प्राप्‍त झाला आहे. या अहवालानुसार कमानींसह पुलास कुठेही तडा जाणे अथवा खचणे, असा प्रकार झाला नसल्याचे म्हटले आहे. पुलावरून अवजड वाहतूक तातडीने बंद करून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरू ठेवा, असा स्पष्ट अभिप्राय अहवालात दिला आहे.

अपघातानंतर मुंबईतील ध्रुव कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम देण्यात आले होते. ध्रुव कन्सल्टन्सीने नवी मुंबई येथील स्ट्रकवेल डिझायनर्स या कंपनीस हे काम दिले आहे. स्ट्रकवेल कंपनीचे प्रकल्प संचालक जितेंद्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली दहा ते बारा अधिकारी, कर्मचार्‍यांच्या पथकाने मेजर ब्रीज इन्स्पेक्शन युनिट मोबाईल व्हॅनबरोबरच अत्याधुनिक यंत्रणेसह पाच ते दहा फेब्रुवारीदरम्यान पुलाचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले. प्रोफाईल मॅनेजमेंट, जीपीआर टेस्ट (रडार इन्स्पेक्शन) आणि एंडोस्कोपी अशा तीन टप्प्यात सूक्ष्म पद्धतीने तपासणी करण्यात आली आहे. ध्रुव कन्सल्टन्सीच्या तज्ज्ञ पथकाने आपला अंतिम अहवाल कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग कोल्हापूर यांना नुकताच सादर केला आहे. या अहवालात कंपनीने पुलाच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटवेळी केलेल्या विविध तपासण्यांचा सविस्तर लेखाजोखा मांडला आहे. तब्बल 22 पानी अहवालात पुलाच्या विविध भागाची छायाचित्रे समाविष्ट करण्यात आली आहेत.

अहवालात दिलेल्या निष्कर्षानुसार दृश्यस्वरूपात केलेल्या पाहणीत पुलाच्या कोणत्याही कमानीत अथवा खांबामध्ये कुठेही खचणे अथवा तडा आढळून येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. एंडोस्कोपीच्या चाचणीत पुलाच्या कमानी आणि खांबातील दगडांतील दरजा निघाल्या आहेत. दरजा निघाल्याने काही ठिकाणी दगड हलले असल्याचे स्पष्ट केले आहे.  जीपीआर मोर्टर या तांत्रिक चाचणीद्वारे पुलाच्या कमानीचा खालील भाग आणि रस्ता यामधील भरावाचे विश्‍लेषण केले आहे. हा भराव काही ठिकाणी पोकळ झाला आहे. काही ठिकाणी भराव पोकळ झाल्याने पुलाचे आयुष्यमान विचारात घेता अवजड वाहतुकीचा धोका आहे. पुलावरून एखादे अवजड असो अथवा हलके वाहन मोठ्याने आदळल्यास पुलास धोका पोहोचू शकतो, असा स्पष्ट अभिप्राय दिला आहे. पावसाळ्यात या पुलावर पाणी येणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना अहवालात केली आहे.

अंतिम अहवालानुसार या पुलावर विविध ठिकाणी झुडपे वाढल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. तसेच पूल जुना असल्याने दगडी बांधकामातील दरजातील मटेरियल कमी झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. रत्नागिरीकडील बाजूला शेवटच्या भागात पुलाच्या भिंतीजवळ भगदाड पडल्याचे नमूद केले आहे. पुलावरून  सर्व प्रकारच्या वाहनांची गती मर्यादित ठेवा, वाढलेली झुडपे तातडीने काढून टाकण्यासह दोन दगडांतील निघालेल्या दरजा त्वरित भरण्याची सूचनाही केली आहे.दुरुस्तीचे अंदाजपत्रककरण्यासंबंधी आदेशया अहवालानुसार राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे यांनी दरजा भरण्यासह अन्य कामांचे अंदाजपत्रक  तयार करण्याचे आदेश दिले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे. अंदाजपत्रकास वरिष्ठ कार्यालयाकडून तातडीने मंजुरी घेऊन अहवालातील सूचनांनुसार शिवाजी पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, पर्यायी पुलाचेही स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात आले असून, या ऑडिटचाही अहवाल प्राप्‍त झाला आहे. पर्यायी पुलाचे काम दर्जेदार झाल्याचा अभिप्राय दिला आहे.

Tags : Kolhapur, Kolhapur News, kolhapur shivaji bridge, closed, heavy veichales