होमपेज › Kolhapur › शिरोळ भागात हेलिकॉप्टरने 12 टन वस्तू पुरवठा

शिरोळ भागात हेलिकॉप्टरने 12 टन वस्तू पुरवठा

Published On: Aug 14 2019 12:16AM | Last Updated: Aug 14 2019 12:11AM

file photoकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरातील पूरस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मंगळवारी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. पंचगंगा नदीची पाणी पातळी 44 फूट 5 इंचांवर असून पंचगंगा अद्याप धोक्याच्या पातळीवर आहे. जिल्ह्यातील 15 गावांचा अद्यापही संपर्क तुटलेला आहे. दरम्यान, शिरोळ तालुक्यातील  पूरग्रस्तांना वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून मंगळवारी कुरुंदवाड, कवठेगुलंद आणि कनवाड गावात सव्वाबारा टन अन्‍न, पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा येथे करण्यात आला. शहरात पेट्रोलचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असून गॅस सिलिंडरसाठी अजूनही ग्राहकांच्या रांगा कायम आहेत.

आतापर्यंत 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील 3 लाख 36 हजार 297 व्यक्‍तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. याकामी 86 बोटी आणि 497 जवान कार्यरत आहेत. शिरोळमधील नौदलाच्या 14 बोटी परत पाठवण्यात आल्या आहेत. बुधवारी विशाखापट्टणम येथील नौदलाचे पथक परत पाठवण्यात येणार असून शिरोळमध्ये एनडीआरएफचे पथक बचाव कार्यासाठी थांबणार आहे.

40 टन मदत साहित्याचे वाटप ः स्कॉड्रन लीडर संदीप पोवार सकाळी 11 वाजता वायुदलाचे एमआय 17 व्ही 5 हे हेलिकॉप्टर शिरोळकडे जाण्यासाठी हवेत झेपावले. हेलिकॉप्टरमध्ये दूध, बिस्किटे व इतर जीवनावश्यक साहित्य उजळाईवाडी येथील विमानतळावर भरण्यात आले.वायुदलाच्या ज्या हेलिकॉप्टरमधून पूरग्रस्तांना सध्या मदत पोहोचवण्यात येत आहे, त्यासाठी ग्रुप कॅप्टन श्रीधर, पायलट कृष्णन, सहपायलट नवाज, स्कॉड्रन लीडर संदीप पोवार, फ्लाईट गनर जे. डब्ल्यू. गुप्ता, फ्लाईट इंजिनियर साजन गोगोई हे वायुदलाच्या एमआय 17 व्ही 5 हेलिकॉप्टरसाठी कार्यरत आहेत. अवघ्या 15  मिनिटांत कुरुंदवाड येथील सैनिकी पॅटर्न निवासी शाळेच्या प्रांगणात हे हेलिकॉप्टर उतरले. या ठिकाणी हेलिकॉप्टरमधील साहित्य उतरवून शाळेमध्ये ठेवण्यात आले. या ठिकाणावरून कुरुंदवाड आणि तेरवाड येथील पूरग्रस्तांसाठी बोटीतून, वाहनातून तर काही ठिकाणी चालत जाऊन ही मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवण्यात येत आहे.

मदत साहित्य वाटपासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची नियुक्‍ती

पुरामुळे बाधित झालेल्या गावातील लोकांना मदत म्हणून बाहेरच्या जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक साहित्यांची आवक होत आहे. प्राप्त झालेल्या साहित्याचे नियंत्रण, नियोजन व वाटप करण्यासाठी अधिकारी-कर्मचार्‍यांची आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये नियुक्‍ती करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

नियंत्रक अधिकारी पुणे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्र. 13 चे अजय पवार यांची शिवाजी मोहिते गोडाऊन, वडगाव रोड, अंबप फाटा वाठार येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे. याठिकाणी संपर्कासाठी 8856801708 हा क्रमांक आहे.  पुणे उपजिल्हाधिकारी (भूसंपादन)क्र. 3 चे श्रीमंत पाटोळे यांची प्लॉट नं. 1, हिंद गेअर इंडस्ट्रीज, मयूर फाटा, फोर्ड शोरूम, शिरोली एमआयडीसी येथे नियुक्‍ती करण्यात आली आहे. येथील संपर्क क्रमांक 9075748361 हा आहे. सहायक अधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे के. एस. सायमोते व सासवडचे एम. ए. टोणपे यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. अवर कारकून उल्हास कांबळे, मनोज पाटील, राहुल कोळी, राजाराम आरगे, बजरंग मुगडे, बंडगर, विनोद वस्त्रे व चंद्रकांत यादव तसेच लिपिक राहुल पाटील, प्रकाश दावणे, आर.आर. पाटील, विजय कांबळे, शिवाजी इटलावार, माधव इगवे, सचिन कांबळे, बाळासो कागलकर यांची सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत नियुक्‍ती करण्यात आली आहे. संबंधित कर्मचार्‍यांनी नियंत्रक अधिकार्‍यांकडे नेमून दिलेल्या गोडावूनमध्ये उपस्थित राहून नियंत्रक अधिकार्‍यांनी सोपविलेले काम करायचे आहे. सोपवलेल्या कर्तव्यात कसून केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे.

पाणी पातळीत झपाट्याने घट

गेल्या सहा दिवसांपासून पूर्णपणे बंद असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर आज दुपारपर्यंत एकेरी वाहतूक सुरू होती. दुपारनंतर दुसर्‍या बाजूवरही वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र एका बाजूने केवळ जड वाहने सोडण्यात येत आहेत. महामार्ग खुला झाल्यामुळे पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडर, पाण्याचे टँकर शहरामध्ये दाखल झाले. त्यामुळे आता पूरस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत आहे.

एसटी वाहतूक सुरू

महामार्ग खुला झाल्याने परिवर्तन, शिवनेरी या राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यातील गाड्याही शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. कोल्हापूरमधून पुणे, मुंबई, बेळगाव एसटी वाहतूक आज सुरू झाली. कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी हे दोन मार्ग अद्यापही बंद आहेत. आंबोलीपर्यंत वाहतूक सुरू आहे. परंतु पुढे बंद आहे. तसेच जयसिंगपूरपर्यंत वाहतूक सुरू असून पुढे बंद आहे.

मदत स्वीकारण्यासाठी शिरोली आणि अंबप फाटा येथे मदत केंद्र

जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मदतीचा मोठा ओघ सुरू झाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी शिरोली एमआयडीसी प्लॉट क्रमांक 1 येथे स्वीकारण्यात येत आहे. येथील संपर्क क्रमांक 9075748361. दुसरे मदत केंद्र अंबप फाटा 8856801708 या क्रमांकावर स्वयंसेवी संघटनांनी मदत देण्यासाठी संपर्क करावा. ही मदत प्रशासनामार्फत पूरग्रस्तांना वितरित करण्यात येईल, असे आवाहनही जिल्हाधिकार्‍यांनी केले. नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावर प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व विमा कंपन्यांनी सर्वच कागदपत्रांचा पाठपुरावा न करता विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए)च्या निर्देशानुसार 15 दिवसांत आपले दावे निर्गत करावेत, याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रही सर्व विमा कंपन्यांना आज देण्यात आले आहे.

स्थलांतरित लोकांची आकडेवारी

जिल्ह्यातील 321 गावांमधून 81 हजार 88 कुटुंबातील सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या 3 लाख 36 हजार 297 व्यक्‍तींची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे. शिरोळ - 42 गावांतील 40 हजार 452 कुटुंबांतील 1 लाख 62 हजार 210 सदस्य, कागल - 35 गावांतील 1 हजार848 कुटुंबांतील 8 हजार 192 सदस्य, राधानगरी - 21 गावातील 746 कुटुंबातील 3 हजार 615 सदस्य, गडहिंग्लज - 15 गावातील 936 कुटुंबातील 4 हजार 3 सदस्य, आजरा - 24 गावातील 97 कुटुंबातील 374 सदस्य, भुदरगड - 19 गावातील 234 कुटुंबातील 972 सदस्य, शाहूवाडी - 24 गावातील 427 कुटुंबांतील 1 हजार 962 सदस्य, पन्हाळा - 44 गावांतील 879  कुटुंबातील 4 हजार 188 सदस्य, हातकणंगले - 23 गावांतील 21 हजार 329 कुटुंबातील 93 हजार 608 सदस्य, करवीर - 55 गावातील 8 हजार 227 कुटुंबातील 33 हजार 315 सदस्य, गगनबावडा - 2 गावांतील 50 कुटुंबांतील 241 सदस्य, चंदगड - 16 गावातील 222 कुटुंबातील 1 हजार 284 सदस्य. महापालिकेच्या माध्यमातून 5 हजार 641 कुटुंबातील 22 हजार 333 जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.

यासाठी शिरोळ तालुक्यात 65 बोटी व 385 कर्मचारी, करवीर तालुक्यात 3 बोटी व 25 कर्मचारी, हातकणंगले तालुक्यासाठी 2 बोटी व 15 कर्मचारी, महापालिका क्षेत्रात 8 बोटी व 32 कर्मचारी, गडहिंग्लजसाठी 2 बोटी व 10 कर्मचारी तसेच आजरा व चंदगड तालुका वगळता उर्वरित तालुक्यांसाठी प्रत्येकी एक बोट व 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यामध्ये लष्कर, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड, जिल्हा प्रशासन, सामाजिक संस्था, महानगरपालिका, नगरपालिका यांचा समावेश आहे.

नौदलाच्या 14 बोटी परत

बचावाचे काम पूर्णत्वास आल्याने बाहेरून मागविण्यात आलेली मदत आता परत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. आज नेव्हीच्या 14 बोटी परत पाठविण्यात आल्या. विशाखापट्टण येथील बोटी बुधवारी पाठविण्यात येतील. केवळ एन.डी.आर.एफ.च्या बोटी वगळता बहुतांशी सर्व दल परत पाठविण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील अजूनही काही गावांना पाण्याचा वेढा आहे. मात्र या गावांतील पाणी उतरू लागल्याने ते लोक बाहेर येण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांना हेलिकॉप्टरद्वारे अन्‍नधान्य पुरविण्यात येत आहे.

आरोग्य संचालकांनी घेतला आढावा

आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील मंगळवारी कोल्हापूर दौर्‍यावर आल्या होत्या. त्यांनी आरोग्य विभागाची बैठक घेतली. गावात जाऊन सर्वेक्षण करावे, पाणी शुद्धतेकडे लक्ष द्यावे. त्याकरिता आवश्यकतेनुसार पथके स्थापन करण्याच्या सूचना दिल्या. यासाठी राज्यातून 50 आरोग्य सेवक व मलेरिया विभागाकडून 100 आरोग्य सेवक असे 150 जादा आरोग्य सेवक पूरग्रस्त भागातील कामाकरिता देण्यात येतील. ते घरोघरी जाऊन आरोग्य सर्वेक्षण, उपचार आणि आरोग्य शिक्षणाचे काम करतील. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी पाटील, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. योगेश साळे, डॉ.  हर्षदा वेदक उपस्थित होते.

जिल्हा परिषद राबविणार स्वच्छता मोहीम

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले. पूरस्थिती गंभीर झाल्याने समाजातील विविध घटक मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. शहरामध्ये व्यापक स्वरूपात महापालिकेच्या वतीने आरोग्य मोहीम राबविण्यात येत आहे. त्याप्रमाणे पूरबाधित गावांमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषेदतील कर्मचारी संघटनांसह सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू सभागृहात मंगळवारी जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचार्‍यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मित्तल बोलत होते. पूरबाधित क्षेत्रातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ व कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे दुर्गंधीबरोबर अस्वच्छतेचे साम—ाज्य या परिसरात निर्माण झाले आहे. त्यामुळे ओराग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ नयेत म्हणून गावामध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पूरबाधित गावातील पुराचे पाणी  ओसरल्यानंतर तातडीने नियोजन करावे. त्यासाठी लागणारे साहित्य गटविकास अधिकारी उपलब्ध करतील, असेही मित्तल यांनी सांंगितले.  बैठकीस प्रकल्प संचालक माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ, प्रियदर्शनी मोरे, वित्त अधिकारी संजय राजमाने, कृषी अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी तसेच विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. आभार सचिन मगर यांनी मानले.