होमपेज › Kolhapur › पुरातून वाहून आलेल्या मृत जनावरांची विल्हेवाट (VIDEO)

पुरातून वाहून आलेल्या मृत जनावरांची विल्हेवाट (VIDEO)

Published On: Aug 14 2019 2:59PM | Last Updated: Aug 14 2019 6:17PM
कोल्हापूर : पुढारी ऑनलाईन

पुराच्या फटक्यात अनेक जनावरे मृत झाली असून गावाशेजारीच मृत जनावरांचा खच पडून आहे. आठवड्याभरापासून पाण्यात ही जनावरे सडली असून याची विल्हेवाट लावायची तरी कशी, असा प्रश्‍न प्रशासनासमोर आहे. मृत जनावरांची विल्हेवाट वेळीच न लावल्यास मानवी आरोग्याला मोठा धोका संभवत आहे. याची गंभीर दखल दैनिक पुढारीने घेतली असून बुधवारपासून ही जनावरे पाण्याबाहेर काढून विल्हेवाट लावण्यास सुरूवात झाली आहे. 

कोल्हापूर-रत्नागिरी हा मार्ग मंगळवारी वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. रत्नागिरी मार्गावरील रेडेडोहामध्ये पुरात वाहून आलेल्या जनावरांचा खच पडला होता. दोन दिवसांपासून या मार्गावर व आसपासच्या गावात मृत जनावरांची दुर्गंधी पसरली होती. यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. दैनिक पुढारीने मंगळवारी याबाबतचे सविस्तर वृत्त प्रसिद्ध दिले होते. 

याची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारपासून ही जनावरे पाण्याबाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली. ग्रुपचे सदस्य श्री. शिवराज नाळे यांनी या कामासाठी पोकलेन मशिनरी पुरवली. जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर विनोद पवार व त्यांची टीम सकाळपासून या ठिकाणी कार्यरत आहे. 

तसेच अर्थमुव्हिंग मशिनरी ओनर्स ग्रुपचे संजय चौगुले, शिवराज नाळे, अरुण हत्ती, किशोर शहा, संजय नाळे, संतोष पाटील, जालिंदर गावडे, विकास कामीरे, सतिश घाटगे, सुरज बोडके, शिवाजी जाधव, विद्यानंद पाटील, महादेव कुंभार, सुंदर तोरस्कर, सचिन काशीद, प्रताप जाधव,  शितल पाटील, किर्तीकुमार पाटणे, इंद्रजित जाधव व इतर सदस्यांनी उपस्थित दर्शवली होती. 

विल्हेवाट लावण्याची पद्धत

मनुष्यवस्तीपासून दूर जागेत 6 फूट खोली, 8 फूट रुंदी व 4 फूट लांबीचा खड्डा खणावा. यामध्ये मृत जनावर पुरावे; जंतू संसर्गाचा धोका टाळण्यासाठी जंतूनाशक फवारणी करावी. त्या जागेभोवती ब्लिचिंग पावडर, जंतूनाशक फवारणी करावी, असे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे.