Thu, Sep 24, 2020 16:44होमपेज › Kolhapur › निखिल खाडे मास्टरमाईंड असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्‍न

निखिल खाडे मास्टरमाईंड असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्‍न

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:50AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

येथील राजाराम माने आत्महत्या प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या चारपैकी संशयित निखिल बाबुराव खाडे (रा. घालवाड) याच्या अचानक छातीत दुखू लागल्याने, तसेच अशक्‍तपणामुळे त्याला कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा खाडेच असल्याचे प्रथमदर्शनी तपासात पुढे आले आहे. 

हे प्रकरण अतिसंवेदनशील असल्याने खाडे याच्यावर चांगले उपचार करावेत, असा आदेश जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी दिले आहेत. मृत माने प्रकरण शिरोळमधील असले तरी त्याचा तपास दुसरीकडे म्हणजे इचलकरंजी गुन्हा अन्वेषण विभाग व कुरूंदवाड स. पो.नि. कुमार कदम या टीमकडे सोपविला आहे. दरम्यान, अटकेत असलेले दोन संशयित इचलकरंजी येथील गावभाग, तर अन्य दोघा संशयितांना शिवाजीनगर पोलिस कोठडीत ठेवले आहे. 

संशयितांचे जबाब नोंदविले आहेत. या प्रकरणातील शिंदे नामक अधिकारी नेमके कोण आहेत, शिंदेच्या फोनवरील क्लिप कोणाकडे मिळेल, याचा तपास सुरू आहे. संशयित शिंदेची गेली दोन दिवस चौकशी सुरू आहे. शिंदे नावाने आलेले दोन फोन कॉल नेमके कुणाच्या मोबाईलवरून कोणी केले याची खातरजमा करण्यात येत आहे. 

दरम्यान, जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक दिनेश बारी यांनी शुक्रवारी सायंकाळी मृत माने याचे नातेवाईक व ग्रामस्थांबरोबर चर्चा केली. पत्रकारांशी बोलताना बारी म्हणाले, मृत माने याच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शिंदेविषयी मिळेल तो पुरावा भक्‍कम असला पाहिजे, नाही तर याचा फायदा इतर संशयित आरोपींना होतो. 

पो.कॉ. कांबळेच्या गाडीवर निखिल खाडे
राजाराम माने मृत प्रकरणाचा मास्टरमाईंड व संशयित आरोपी निखिल खाडे यांच्याशी स्वाती माने हिचे सूत जुळल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. त्यानंतर पोलिस चौकशीत खाडे हा माहिती देताना तपास यंत्रणेची दिशाभूल करीत आहे. पोलिसांसोबत त्याचा झीरो पोलिस म्हणून वावर राहिल्याने पोलिसांची कार्यपद्धत तो जाणतो. त्याचा फायदा खाडे हा घेत आहे. तपासातील प्रत्येक घटनेत घुमजाव करीत आहे. पो.कॉ. भूजंगा कांबळे हा याच खाडेला सतत गाडीवर घेऊन फिरत होता, हे स्पष्ट झाल्याचे पोलिस तपास यंत्रणेने सांगितले.