Sat, Feb 29, 2020 12:42होमपेज › Kolhapur › दै. ‘पुढारी’मुळे ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ चळवळीला गती(Video)

दै. ‘पुढारी’मुळे ‘अ‍ॅम्ब्युलन्स’ चळवळीला गती(Video)

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:36AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’च्या मंगळवारच्या (दि. 8) अंकात ‘वाहतूक कोंडीमुळे हसर्‍या ‘सोनू’चा बळी’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या हृदयस्पर्शी वृत्ताने समाजमन खडबडून जागे झाले. अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन ‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या,’ या संकल्पनेने रस्त्यावर वाहनधारकांची जनजागृती सुरू केली. हे लोण जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतही पसरू लागले आहे. सोशल मीडियातूनही याबाबत उत्स्फूर्तपणे लोकप्रबोधन सुरू आहे. दै. ‘पुढारी’च्या वृत्तामुळे एक सकारात्मक चळवळ यानिमित्ताने सुरू झाली असल्याच्या लोकांच्या भावना आहेत. 

सोशल मीडियावर कॅम्पेन
सोशल मीडियावर आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या आणि वाहतुकीचे नियम पाळा, ही संकल्पना घेऊन जोरदार कॅम्पेन सुरू आहे. या कॅम्पेनमध्ये राज्यभरातील तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग दिसून येतो. डावी बाजी मोकळी सोडा, ट्रिपल सीट नको रे, भावा, हेल्मेट वापरा... असे आवाहन करण्यात आले आहे. स्वत:ला जपा म्हणूनच वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळा, असे आपुलकीचे सल्ले मोठ्या प्रमाणावर दिले जात आहेत. 

तरुणाईचा सक्रिय सहभाग 

अनेक संस्था, संघटना, मंडळांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. आता सोशल मीडियावरून एकमेकांशी संपर्क साधून अनोळखी तरुणही कल्पक उपक्रम राबवण्याचे नियोजन करत सक्रिय होऊ लागले आहेत.

नव्या वाहनधारकांची जागृती
नवे वाहन खरेदी करणार्‍या ग्राहकांना त्याक्षणी संबंधित शोरूममध्येच अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता देण्याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. याबाबतचे नियोजन सर्वच कंपन्यांनी करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे ही एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल. अ‍ॅम्ब्युलन्स चालकांमध्ये शिस्त आणि वेळेप्रसंगी योग्य निर्णय घेता यावा, यासाठी संबंधितांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. याबाबतचे नियोजन सुरू आहे. 

रिक्षाचालकांचे प्रबोधन
आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या, या संकल्पनेच्या माध्यमातून कॉमन मॅन रिक्षा संघटनेच्या वतीने रिक्षाचालकाचे गुरुवारपासून प्रबोधन केले जाणार आहे. शहरातील सर्व रिक्षा स्टॉपवर जाऊन हे प्रबोधन केले जाणार असून, यामध्ये वाहतूक तज्ज्ञांचा सहभाग असणार असल्याची माहिती ‘कॉमन मॅन’चे बाबा इंदुलकर यांनी दिली. याबाबत मंगळवारी (दि. 15) नियोजनाची बैठक होणार आहे. 

...आणि अ‍ॅम्ब्युलन्सला बघता बघता रस्ता झाला मोकळा!

सायंकाळी सहाची वेळ... उमा टॉकीज् सिग्‍नलच्या चौकात वाहनांची  तुडुंब गर्दी... एखादा सायकलस्वार पुढे जातो म्हटला तरी फूटभरसुद्धा रस्ता मोकळा नाही अशी अक्षरश: आणीबाणी...अचानक लक्ष्मीपुरी मार्गावरून अ‍ॅम्ब्युलन्सचा सायरन वाजू लागला... सायरन कानावर येताच वाहनधारकांनी काही सेकंदात रस्ता मोकळा केला. सोमवारी सायंकाळी हे अत्यंत सकारात्मक चित्र पाहायला मिळाले. 
उमा टॉकीज् सिग्‍नल चौकात लक्ष्मीपुरीमार्गे आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सला वाहनधारकांनी क्षणभरात प्रतिसाद दिलाच. त्याचवेळी या ठिकाणी सेवा बजावत असलेले वाहतूक पोलिससुद्धा अ‍ॅम्ब्युलन्सचा आवाज ऐकल्यानंतर धावतच रस्ता मोकळा करण्यासाठी आले. एकूणच अ‍ॅम्ब्युलन्स चालकालाही त्याच्या वाहनाला ब्रेक लावावा लागला नाही. तो आला तसा सुभाषरोडमार्गे गेला. ‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता द्या,’ या मोहिमेला मिळत असलेला हा प्रतिसाद आहे. एकूणच वाहनधारकांची मानसिकता बदलत चालल्याचे हे समाधानकारक चित्र आहे.