Sat, Jul 11, 2020 09:45होमपेज › Kolhapur › 63 कोटींचा घरफाळा थकीत 26 हजार मिळकतींना जप्‍तीच्या नोटिसा

63 कोटींचा घरफाळा थकीत 26 हजार मिळकतींना जप्‍तीच्या नोटिसा

Last Updated: Jul 01 2020 1:17AM
कोल्हापूर : सतीश सरीकर 

घरफाळा थकबाकी तब्बल 63 कोटींवर गेली आहे. थकबाकी वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे. त्यांतर्गत कोल्हापूर शहरातील तब्बल 26 हजारांवर थकबाकीदार मिळकतधारकांना थेट मालमत्ता जप्‍तीच्या नोटिसा पाठविण्याची कारवाई मंगळवारपासून सुरू केली. लॉकडाऊनमुळे पोस्टाद्वारे नोटिसा न पाठविता थेट घरफाळा बिलावरच जप्‍तीच्या नोटिसीचा शिक्‍का मारण्यात येत आहे. थकबाकी न भरल्यास संबंधित मिळकतींवर महापालिकेचा बोजा चढविण्यात येणार आहे. 

घरफाळा महापालिकेच्या उत्पन्‍नाचा मुख्य आर्थिक स्रोत आहे. आर्थिक अरिष्टातून मार्गक्रमण करणार्‍या महापालिकेचा आर्थिक गाडा घरफाळ्यातून मिळणार्‍या कराच्या रकमेतूच चालतो. सद्यस्थितीत घरफाळा विभागाला चालू आर्थिक वर्षासाठी 73 कोटींचे टार्गेट देण्यात आले आहे. मात्र, साधारण त्या बरोबरीनेच थकबाकीही आहे. 2010 पासून वर्षागणीक थकबाकीचा आकडा फुगून तो 63 कोटी 65 लाखांवर गेला आहे. त्याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत आहे. 

महापालिकेच्या घरफाळा विभागाने थकबाकीदारांचे टप्पे केले आहेत. त्यानुसार 5 लाख ते 3 कोटींपर्यंत 162 मिळकतधारक आहेत. त्यांच्याकडे तब्बल 29 कोटी 65 लाख थकबाकी आहे. 1 ते 5 लाखांपर्यंत थकबाकीदार 854 असून, त्यांच्याकडे 16 कोटी 3 लाख थकबाकी आहे. 10 हजार ते 1 लाख थकबाकीदारांची संख्या 24 हजार 998 असून, त्यांच्याकडे 14 कोटी थकबाकी आहे. या सर्व मिळकतधारकांकडून वसुलीसाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. 

महापालिकेच्या कराधान नियम 45 अन्वये थकबाकीसाठी मिळकत जप्‍त करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मिळकतधारकांना जप्‍तीपूर्व नोटिसा लागू करणार नाही. घरफाळ्याचे पाठविण्यात येत असलेले बिल म्हणजेच नोटीस असणार आहे. बिल मिळाल्यापासून 15 दिवसांत मिळकतधारकांनी प्रतिसाद दिला नाही, तर त्यांच्यावरील कारवाई टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे. सिटी सर्व्हेकडे (नगरभूमापन) मिळकतीवर बोजा नोंद करत असल्याचा हुकूमनामा रजिस्टर एडीने मिळकतींना लागू करणार आहे. सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने जागेवर पंचनामा करणार नाही. त्यानंतरही 15 दिवसांत थकबाकी न भरल्यास सिटी सर्व्हे कार्यालयातून संबंधित मिळकतींवर थेट बोजा चढविण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे कर निर्धारक व संग्राहक संजय भोसले यांनी सांगितले.